काश्‍मीर हे भारताचं अविभाज्य अंग - अण्णा - Marathi News 24taas.com

काश्‍मीर हे भारताचं अविभाज्य अंग - अण्णा

झी २४ तास, वेब टीम, राळेगणसिद्धी
 
‘टीम अण्णा’मधील सदस्य प्रशांत भूषण यांनी काश्‍मीरप्रश्‍नी केलेले विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून, काश्‍मीर हे भारताचं अविभाज्य अंग आहे,  असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे सांगितले.
 
काश्‍मीरप्रश्‍नी भूषण यांनी केलेल्या विधानाशी 'टीम अण्णा'चा काहीही संबंध नाही, त्यांचे ते वैयक्तिक मत आहे. भूषण यांनी आपले मत व्यक्त करण्यापूर्वी 'टीम अण्णां'ची चर्चा केलेली नव्हती. मात्र, काश्‍मीर भारताचा अविभाज्य अंग आहे आणि तो अंगच राहणार आहे.
 
‘टीम अण्णां'चा मुख्य दृष्टिकोन ‘लोकपाल बिल' आहे. मी, अनेकदा काश्‍मीरमधील विविध भागांमध्ये संरक्षणाविना फिरलो आहे. काश्‍मीरसाठी बलिदान देऊ, पण झुकणार नाही. काश्‍मीरसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. काश्‍मीरच्या मुद्यावर कोणाचेही दुमत असू शकत नाही, असे अण्णा म्हणाले.
 
दरम्यान, जम्मू-काश्‍मीरमधील नागरिक भारताबरोबर राहण्यास इच्छुक नसतील, तर तेथून सैनिक हटवावे आणि तेथे जनमत घ्यावे, असे मत भूषण यांनी व्यक्त केले होते. या वक्तव्यानंतर भूषण यांना त्यांच्या कार्यालयामध्ये श्रीराम सेनेच्या दोन तरुणांनी बेदम मारहाण केली होती.

First Published: Friday, October 14, 2011, 11:37


comments powered by Disqus