चांडाळ चौकडीचा डाव, अण्णांचा केंद्रावर घाव - Marathi News 24taas.com

चांडाळ चौकडीचा डाव, अण्णांचा केंद्रावर घाव

झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी
 
'टीम अण्णा'वर होणाऱ्या हल्ल्यास केंद्र सरकारमध्ये मंत्री असलेली 'चांडाळ चौकडी' जबाबदार असल्याचा घणाघाती घाव ज्येष्‍ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून केले आहे. बाबा रामदेव यांच्यावर झालेला लाठीचार्जदेखील या चांडाळ चौकडीचा डाव होता, असाही आरोप त्यांनी केला आहे.
'टीम अण्णा'मधील सदस्यांविरूध्द जो कट रचला जात आहे. त्यातही या चांडाळ चौकडीचा हात आहे. देशातील जनतेला हे माहीत असल्याचे अण्णांनी आपल्या ब्लॉगवर लिहिले आहे. अण्णांनी केंद्र सरकार आणि काँग्रेस पक्षातील अन्य नेत्यांना क्लीन चिट देताना म्हटले की, मी काँग्रेस पक्षातील सर्वच मंत्र्यांना आणि नेत्यांना दोषी मानत नाही. सरकारमध्येही काही प्रामाणिक लोक आहेत. परंतु, या चांडाळ चौकडीमुळे ते आपला आवाज उठवू शकत नाहीत. अण्णांनी आपल्या ब्लॉगवर या चांडाळ चौकडीतील नावांचा खुलासा मात्र केलेला नाही.
किरण बेदींवर करण्यात येणारे आरोप असो, अरविंद केजरीवाल यांच्यावर लखनऊमध्ये झालेला हल्ला अथवा रामदेव बाबा यांच्यावरील लाठीचार्ज तसेच मला तुरूंगात टाकण्यामागे सरकारमधील हीच चांडाळ चौकडी आहे.
या चांडाळ चौकडीकडून वारंवार करण्यात येणाऱ्या आरोपांना टीम अण्‍णामधील सदस्यांनी उत्तर देऊ नये, असा सल्लाही अण्‍णांनी आपल्या सहकार्‍यांना दिला आहे. लोकांना खरं काय आहे, ते माहीत आहे. त्यामुळे त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरणार आहेत. लवकरच या चांडाळ चौकडीचे पितळ उघडे पडेल, असेही अण्णांनी स्पष्ट केले.

First Published: Tuesday, October 25, 2011, 09:28


comments powered by Disqus