नगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा - Marathi News 24taas.com

नगरसेविका देताहेत १२वीची परीक्षा

संजय पवार, www.24taa.scom, सोलापूर
 
निवडणुकीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर आता सोलापुरातल्या एक नगरसेविका बारावीची परीक्षा देत आहेत. सोलापूरच्या प्रभाग क्रमांक १६ मधून त्या विजयी झाल्या आहेत. मंगळवारी त्यांनी इंग्रजीचा पेपर दिला.
 
महादेवी अलकुंटे सध्या बारावीची परीक्षा देत आहेत.  त्या सोलापूर महापालिकेतल्या एक नवनिर्वाचित नगरसेविका आहेत. नुकत्याच पार पडलेल्या सोलापूर महापालिकेच्या निवडणूकीत त्यांनी माकप या पक्षाकडून निवडणूक लढवली होती. इतकंच नाहीतर जनतेच्या या परीक्षेत त्या उत्तीर्ण होऊन नगरसेविकाही बनल्या. निवडणूक लढवत असलो तरी शिक्षण सुरु ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. दोन्ही परीक्षांचा काळ एकच असला तरी कोणत्याही परिस्थितीत बारावीची परीक्षा देण्याचा निश्चय त्यांनी केला. त्यामुळे प्रचाराच्या धामधुमीतसुद्धा वेळात वेळ काढून त्यांनी बारावीच्या परीक्षेचा अभ्यास केला. त्यामुळे या दरम्यान थोडी धावपळ झाल्याचं त्यांनी मान्य केलं.
 
 
महादेवी या कामगारवर्गाचे प्रतिनिधीत्व करतात. बारावीची परीक्षा देण्याच्या त्यांच्या या निर्णयाला विभागातल्या मतदारांनीही शुभेच्छा दिल्या आहेत. मतदारराजाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याप्रमाणे बारावीच्या परीक्षेतही उत्तीर्ण होण्याचा विश्वास महादेवी यांनी व्यक्त केला आहे.

First Published: Tuesday, February 21, 2012, 21:36


comments powered by Disqus