पुन्हा पुणेकर, पाणी प्रश्न आणि अजित पवार - Marathi News 24taas.com

पुन्हा पुणेकर, पाणी प्रश्न आणि अजित पवार


नितीन पाटोळे, www.24taas.com, पुणे

 
पुण्यात उद्यापासून पाणीकपात होणार आहे. ऐन उन्हाळ्यात सकाळी एकदाच पाणीपुरवठा होणार आहे. विशेष म्हणजे पुण्यातल्या बड्या प्रकल्पांच्या पाण्यात कपात करण्यात आलेली नाही. पाणीकपात फक्त सर्वसामान्य पुणेकरांसाठी असणार आहे.
 
पुण्यात एक मार्चपासून पाणीकपात करण्यात येणार आहे. पण या पाणीकपातीचा फटका फक्त सर्वसामान्य पुणेकरांनाच बसणार आहे. अमनोरा पार्क, नांदेड सिटी, डी.एस.कुलकर्णी, एल.के.डेव्हलपर्स, पंचरत्न टाऊनशिप अशा फाईव्हस्टार टाऊनशीप तसंच पुनावाला स्टड फार्म, साईजा स्टड फार्म, फोर सिझन वाईन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौंड शुगर कारखाना आणि त्यांचे भाऊ राजेंद्र पवार यांचा बारामती ऍग्रो खाजगी साखर कारखाना या सगळ्यांच्या पाणीपुरवठ्यात मात्र कपात करण्यात आलेली नाही.
 
पाण्याची टंचाई असूनही पुणे महापालिका या बड्या धेंडांसाठी पाणी कपातीचं धाडस करु शकलेली नाही. कारण या सगळ्यांना पाणी देण्याचा निर्णय अजित पवारांचाच आहे. बिल्डरांना आणि बड्या प्रकल्पांना मुक्तहस्ते पाणी द्यायचं आणि सर्वसामान्य पुणेकरांसाठी पाणी कपात यावर पुणेकरांनी संताप व्यक्त केलाय. बिल्डर आणि उद्योगांना शेतीचं पाणी देण्याच्या निर्णयाविरोधात शेतकरी कोर्टात लढा देत आहेत. आता पुरेसं पाणी मिळवण्यासाठी पुणेकरांनाही त्याच मार्गानं जावं लागणार आहे. कारण राजकारणी, प्रशासन आणि बिल्डर्स यांनी मिळून पुणेकरांच्या तोंडचं पाणी पळवलं आहे.
 

First Published: Wednesday, February 29, 2012, 17:58


comments powered by Disqus