Last Updated: Monday, March 25, 2013, 00:07
www.24taas.com, अमरावतीगेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला. सिंचन कामांमधील अर्धवट राहिलेल्या कामांची आणि त्यासाठी खर्च झालेल्या पैशांची यादी राज ठाकरेंनी वाचून दाखवली. गोसी खुर्दसारख्या प्रकल्पांबद्दल बोलत राज ठाकरेंनी सिंचन घोटाळ्यांचे दाखले दिले. सर्व कंत्राटं परराज्यांत जात असल्याचं राज ठाकरे यांनी निदर्शनास आणलं.
दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे, असा सवाल राज ठाकरेंनी केला. राजकीय पक्ष फंड गोळा करण्यात गुंतले आहेत आणि निवडणुकीत याच फंडाचा गैरवापर करून मतदारांना भूलवण्याच काम केलं जात असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. काँग्रेस, राष्ट्रवादीवर घणाघाती टीका करताना लाखो रुपयांचे फंड निवडणुकांसाठी गोळा केले जात असल्याचा आरोप राज यांनी केला आहे.
आजच्या अमरावतीतल्या सभेत राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतीयांना निशाणा केलं. बीड, अमरावती या भागातील मुली गायब होतातच कशा, यामागे नेमकं काय आहे, याकडे सरकार कधी लक्ष घालणार, असा सवाल त्यांनी केला. इंडियाबुल्ससारखे मोठमोठे प्रकल्प उभेराहातात, त्यांच्यासाठी जनतेचं शेतीच, पिण्याचं पाणी दिलं जातं. अशा प्रकल्पाविरोधात आंदोलनाचा इशारा राज ठाकरेंनी दिला. स्थानिकांना नोकऱ्या न मिळण्यामागे परप्रांतचियांचा हात असून स्थानिक आमदारांनाही मॅनेज केलं जात असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
हक्कभंग कारवाईबद्दल बोलताना आमदारांना त्यांचेच हक्क प्रिय असल्याची टीका राज ठाकरेंनी केली. सामान्य माणसांच्या हक्काची गोष्ट सरकार करतंय, मात्र सरकारला सामान्य माणसाच्या हक्काची जाणिव आहे का, असा सवाल राज ठाकरेंनी केलाय. आरोग्य, शिक्षण, सुरक्षा यांसारखे जनतेचे हक्क डावलले जात असल्याचं राज यांनी म्हटलं.
वाघांच्या सुरक्षेसाठी आणि विदर्भाच्या विकासासाठी रतन टाटांशी चर्चा करून ताडोबा येथे रिसॉर्ट उभारण्याची संकल्पना राज यांनी व्यक्त केली. टाटांना विदर्भाच्या विकासासाठी आणि तेथे रोजगार उपलब्ध करून देण्यासांबंधी आवाहन राज ठाकरे यांनी टाटा यांना केलं असल्याचं सांगितलं. याशिवाय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा स्थापन करण्याचा आपला मनसुबा राज ठाकरेंनी व्यक्त केला.
First Published: Monday, March 25, 2013, 00:07