Last Updated: Monday, January 14, 2013, 12:40
www.24taas.com, यशवंतराव चव्हाण नगरी (चिपळूण)महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.
पत्रकार सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी संपादन केलेल्या `महानामा` या पुस्तकाचं कोत्तापल्ले आणि माजी संमेलनाध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते प्रकाशन झालं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संत साहित्याचे अभ्यासक उल्हासदादा पवार, कवयित्री प्रभा गणोरकर, `कलमनामा`चे संपादक युवराज मोहिते, मनोविकास प्रकाशनचे आशीश पाटकर, अमोल पाटकर आणि मान्यवर उपस्थित होते.
कोत्तापल्ले पुढं म्हणाले, संत नामदेव हे आद्यसाहित्यिक, आद्य कवी, आद्य आत्मचरित्रकार, आद्य प्रवासवर्णनकार. पण त्यांच्याकडं आपलं दुर्लक्ष झालं. या पुस्तकाच्या निमित्तानं पुन्हा एकदा नामदेवरायांच्या कार्याला उजाळा मिळेल.
डहाके म्हणाले, `महाराष्ट्राबाहेर जाऊन संपूर्ण देशावर प्रभाव टाकणाऱ्या नामदेवांचं कर्तृत्व फार थोर होतं. या काळात त्यांच्या कर्तृत्वाचं स्मरण करणं गरजेचं आहे.`
प्रभा गणोरकर म्हणाल्या, `संत नामदेव हे माझे आवडते कवी. एक सर्वसामान्य माणूस ते महान संत असा त्यांचा प्रवास अचंबित करणारा, मोहून टाकणारा आहे.`
उल्हासदादा पवार म्हणाले, `नामदेवमहाराजांचा अधिकार फार मोठा आहे. त्यांना आयुष्यही मोठं मिळालं. त्यांनी २० वेळा भारतभ्रमण केलं. त्यापैकी १२ वेळा ते उत्तरेत गेले आणि ८ वेळा दक्षिणेत गेले. पंजाबमधील घुमानमध्ये नामदेवरायांचं मोठं मंदिर आहे. शीखांच्या गुरू ग्रंथसाहेब ग्रंथात नामदेवांच्या ६३ अभंगांचा समावेश करण्यात आलाय.
आजही आपल्याकडं जातीपातींचं राजकारण केलं जातं. अगदी साहित्य संमेलनाच्या मांडवातही त्याचे पडसाद उमटतात. अशा वेळी ८०० वर्षांपूर्वी संत चोखोबांची समाधी पंढरीच्या पांडुरंगाच्या मंदिरासमोर उभारणाऱ्या नामदेवांचं स्मरण करणं आवश्यक आहे. ते स्मरण हे महानामा पुस्तक नक्कीच करून देईल, असं पवार म्हणालेत.
नामदेवांच्या कार्याचा परिचय या पुस्तकात करून दिला आहे, असं पुस्तकाचे संपादक सचिन परब आणि श्रीरंग गायकवाड यांनी स्पष्ट केलं. तसंच दरवर्षी एका संताच्या कार्याचा असाच आढावा घेण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. मनोविकास प्रकाशचे आशीश पाटकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.
First Published: Monday, January 14, 2013, 12:30