संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे, marathi sahitya sammelan, Usha Tambe,

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे
www.24taas.com,यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी, चिपळूण

यंदाच्या साहित्य संमेलनात वेगळे प्रयोग केले गेले. विदेशी लेखकांना आणलं, मुलांसाठी कार्यक्रम आणि नवोदितांना जास्त संधी दिली, असा दावा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केला.

अनेक वादांमुळे गाजलेल्या चिपळूणच्या८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप झाला. संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांच्या भाषणानं संमेलनाचा समारोप झाला. यावेळी बोलताना कोत्तापल्ले यांनी संमेलनाआधी वाद निर्माण करणा-यांचा खरपूस समाचार घेतला. तर विनोद तावडेंनी आपल्या भाषणात जलसंपदामंत्री सुनील तटकरेंवर टीका केली.

साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी मात्र नेमाडेंच्या भूमिकेपेक्षा वेगळं मत मांडलंय. मराठी साहित्याच्या प्रसारासाठी अशी राज्यस्तरीय संमेलनं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. तर, या संमेलनाला आलेल्या इतर साहित्यिकांनी आणि रसिकांनी संमेलन व्हायला पाहिजे असं मत केलयं.

या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार होते. मात्र, ऐनवेळी या दोघांनीही समारोपाच्या कार्यक्रमाला दांडी मारली. हा पूर्वनियोजित कार्यक्रम असूनही प्रमुख पाहुणे म्हणून हजर राहणार असलेल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्यानं एवढ्या वर्षांची परंपरा खंडीत झालीये. त्यामुळे साहित्यप्रेमींमध्ये नाराजी होती.

दरम्यान, तीन दिवस चाललेल्या या संमेलनात साहित्य प्रेमींना आपल्या लाडक्या साहित्यिकांच्या सहवासात राहता आलं. अनेक विषयांवर चर्चा, परिसंवाद तसंच कविसंमेलनांची रेलचेल या संमेलनात होती.

First Published: Monday, January 14, 2013, 11:32


comments powered by Disqus