Last Updated: Saturday, December 14, 2013, 16:33
www.24taas.com, झी मीडिया, ठाणेप्रेमविवाह करण्याआधीच एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना शहापूर-चेरपाली इथं घडलीय. तो एका दलित मुलीशी प्रेमविवाह करू इच्छित होता.
हत्या झालेल्या तरुणाचं नाव संदीप सखाराम भेरे असून तो चेरपोली इथला रहिवासी आहे. संदीपचा आंतरजातीय विवाह होण्याच्या आदल्या रात्री त्याची हत्या करुन त्याचा मृतदेह गावाजवळील शेतात फेकून देण्यात आला. या आंतरजातीय विवाह हत्याकांडमुळं शहापूरसह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
संदीपची त्याच्या मैत्रिणीनं एका मातंग जातीतील एका मुलीशी ओळख करून दिली होती. कालांतरानं त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. तीन वर्षांपूर्वी नाशिक जवळील वणी इथल्या सप्तशृंगी मंदिरात देवीच्या साक्षीनं दोघांनी एकमेकांशी पती-पत्नीचं नातं जोडलं होतं. परंतु त्यांचा विवाह संदीपच्या कुटुंबियांना मान्य नव्हता. म्हणून त्याच रागातून संदीपला घरात कोंडून जबरदस्त मारहाण करण्यात आली आणि युवतीला टिटवाळ्यात जाऊन धमकावण्यात आलं होतं.
कालांतरानं त्यांची प्रेमकथा संपुष्टात आली. संदीपनं कुटुंबाच्या भीतीमुळं हा निर्णय घेतला होता. काही महिन्यांपासून दलित युवती कल्याणला संगणक प्रशिक्षणासाठी जाऊ लागल्यानं संदीपचा तिच्याशी पुन्हा संपर्क वाढला आणि पुन्हा त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. युवतीच्या घरातील लोक तिचा विवाह संदीपबरोबर करून देण्यास राजी होते. त्यानुसार, संदीपनं विवाहासाठी ठाण्याच्या जांभळी नाक्यावरील ओमसाई विवाह कार्यालयात ११/१२/१३ चा मुहूर्त निश्चिित करुण नोंदणीही केली होती. पण विवाह मुहूर्त येण्यापूर्वीच संदीपची निर्घृण हत्या करण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार त्यांना संदीपचा मृतदेह गावाजवळील शेतात आढळून आला. संदीपची वायरच्या साहाय्यानं गळा आवळून हत्या केली असं पोलीस तपासात उघडकीस आलंय. या प्रकरणी शहापूर पोलिसांनी चौघा संशयितांना ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी चालू आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, December 14, 2013, 16:28