Last Updated: Saturday, April 13, 2013, 15:49
www.24taas.com, नवी दिल्ली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी आपण आगामी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा केलीय. २०१४ च्या निवडणुकीसाठी तिसऱ्या आघाडीची चर्चा सुरू असताना पवारांनी ही घोषणा केलीय.
समाजवादी पार्टीचे अध्यक्ष मुलायम सिंह यांनी अनेकदा तिसऱ्या आघाडीची वाच्यता केलीय. पवारांनी मात्र अशा कोणत्याही तिसऱ्या आघाडीच्या स्थापनेची शक्यता फेटाळून लावलीय. राष्ट्रवादीमध्ये मात्र पवार यांच्यानंतर पक्षाची सूत्रं कुणाच्या हातात जाणार, यावर जोरदार चर्चा झडतेय.
यूपीए सरकारनं आपल्या सहयोगी पक्षांची बैठक बोलावून त्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधान पदाबाबत चर्चा करावी, असा सल्लाही पवारांनी दिलाय. डिएमकेसारख्या महत्त्वाच्या पक्षानं पाठिंबा काढल्यानं यूपीए डळमळीत झालंय, असंही पवार म्हणाले.
मोदींचा विषय म्हणजे ‘बाजारात तुरी’ पंतप्रधानपदाचा विषय सुरू असताना मोदींचा विषय निघाला तेव्हा पवारांनी मोदींचा विषय म्हणजे ‘बाजारता तुरी’ असल्याचं पवारांनी म्हटलंय. ‘मोदींबाबत एनडीएमध्येच एकमत नाही… आधी भाजप - एनडीएनं पंतप्रधानपदासाठी उमेदवाराचं नाव नक्की करावं’ असं म्हणत पवारांनी मोदींचाही समाचार घेतला.
First Published: Saturday, April 13, 2013, 15:49