Last Updated: Wednesday, May 16, 2012, 16:14
WWW.24taas.com, शहापूर ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.
पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी य़ा टाक्याचं उद्घाटन केलंय. हा प्रश्न सोडवल्याबद्दल ग्रामस्थांनी झी 24 तासचे आभार मानलेत. डेंगनमाळ गावात ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी तासनतास प्रतीक्षा करावी लागते. अक्षरश: विहिरीत शिडीच्या सहाय्यानं उतरून पाणी भरण्याची वेळ इथल्या ग्रामस्थांवर आलीय.
डेंगनमाळ गावात फेब्रुवारीपासून पाण्याचं दुर्मिक्ष आहे. पण इथल्या जनतेच्या व्यथांची दखल प्रशासनानं घेतली नव्हती. झी 24 तासनं इथली व्यथा मांडल्यानंतर आता तिथल्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे.
दुसरीकडे डेंगनमाळ या गावातील पाणीटंचाई दूर करण्याचं आश्वासन देत ढोबळे परतत असताना आणखी एका रोषाचा सामना त्यांना करावा लागला. पांचाळ आणि सासरवड गावातल्या नागरिकांनी पाणीटंचाईच्या प्रश्नावरुन रास्तारोको करत पाणीपुरवठा मंत्र्यांचा ताफा अडवला.
यावेळी या गावातल्या ग्रामस्थांनी घेराव घालत पाणीपुरवठा मंत्र्यांपुढं समस्यांचा पाढा वाचला. पाणीपुरवठा मंत्र्यांनी रस्त्यावर बसून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या.
First Published: Wednesday, May 16, 2012, 16:14