'झी २४तास'चा छडा; सिडकोनंही घेतला धडा - Marathi News 24taas.com

'झी २४तास'चा छडा; सिडकोनंही घेतला धडा

 www.24taas.com, नवी मुंबई
 
‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर अखेर नवी मुंबईतल्या सिडको भवनात फायर ऑडिट झालं. शिवाय इमारतीमधल्या कुचकामी कालबाह्य अग्निशमन उपकरणंही तातडीने बदलण्याचे आदेश देण्यात आलेत.
 
नवी मुंबईतल्या सिडको भवनात आग सुरक्षा यंत्रणेचे तीनतेरा वाजल्याचं वृत्त झी 24 तासवर प्रसारीत झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालंय. सिडको भवनात कशाप्रकारे नियम धाब्यावर बसवले होते याचा पर्दाफाश ‘झी 24 तास’नं केला होता. लोकांची वर्दळ असलेल्या सिडको इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातल्या कालबाह्य अग्निशमन उपकरणांबाबतचं वृत्त प्रसारीत झालं होतं. त्यानंतर जाग आलेल्या सिडको प्रशासनानानं या इमारतीचं तातडीने फायर ऑडिट केलं. शिवाय आग नियंत्रण यंत्रणेत बदल करण्याचे आदेश दिलेत. तसंच कालबाह्य अग्निशमन उपकरणंही बदलण्यात येणार आहेत, अशी माहिती सिडकोचे मुख्य अभियंता केशव वरखडकर यांनी दिलीय.
 
सोबतच सिडको अग्निशमन अधिका-यांनी प्रशासनाला काही सूचना केल्यात. मंत्रालयाला लागलेल्या आगीनंतर सिडकोसारख्या सर्वच महत्त्वाच्या निमशासकीय संस्थांनी धडा घेणं गरजेचं आहे. ‘झी 24 तास’च्या दणक्यानंतर सिडकोनंही फायर ऑडिटबाबत पाऊलं उचललीत. मात्र हा निव्वळ फार्स ठरु नये अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय.
 
.

First Published: Wednesday, June 27, 2012, 09:06


comments powered by Disqus