श्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी - Marathi News 24taas.com

श्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी

 www.24taas.com , रत्नागिरी
 
कोकणातील राजापूर येथील प्रसिद्ध गंगेचे सुमारे एक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आगमन झाले. हा चमत्कार मानला जातो. मात्र भूकंपाचा दाखला दिला गेल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. असे असले तरी गेल्या काही वर्षांचा विक्रम यावर्षी गंगा मोडण्याची शक्यता आहे. गंगेच्या आगमणाला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. तर श्रावण महिन्यात गंगा राहिल्याने भाविकांना श्रावण सोमवारी गंगा स्नान करण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.
 
अनपेक्षितपणे आलेल्या या गंगामाईच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढू लागला आहे. राजापूरजवळ उन्हाळे येथे चौदा कुंडे असून त्यामध्ये विशिष्ट कालावधीनंतर गंगा अवतरते. पूर्वी सर्वसाधारणपणे हा कालखंड तीन वर्षांचा असे. पण अलीकडील काळात त्याहीपेक्षा लवकर गंगा अवतीर्ण होऊ लागल्यामुळे भाविकांमध्ये कुतूहलाचा विषय झाला आहे.
 

यापूर्वी १९१८ ते १९३६ या अठरा वर्षांच्या काळात गंगा प्रकट झाली नव्हती. गेल्या वर्षी १० फेब्रुवारी २०११ रोजी गंगेचे आगमन झाले होते. त्यामुळे पुन्हा एवढय़ा लवकर ही गंगा प्रकट होणे अपेक्षित नव्हते.  याआधी १०५  दिवस गंगेचे वास्तव्य होते. गतवर्षी ११५ दिवस गंगा राहिली. आज तर गंगेचे वास्तव्य १०० दिवस झाले आहे. त्यामुळे ऐन श्रावण महिण्यात गंगा असल्याने श्रावण स्नान करण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
 
गंगेचा आतापर्यंतचा सव्वाशे वर्षांचा इतिहास उपलब्ध आहे.  गंगा दर तीन वर्षांनी प्रकटते अशी भाविकांची वर्षानुवर्षांची श्रद्धा आहे. गतवर्षी  उच्चांक नोंदवत  ११५ दिवस गंगा होती. यापूर्वी  गुजरातमध्ये २६ जानेवारीला झालेल्या भूकंपाच्या दिवशीच गंगेचं आगमन झाल होतं तर २००५च्या भूकंपानंतरही गंगेचं आगमन झाल होते.  इंडोनेशियातील भूकंपानंतर  (११ एप्रिल २०११) ही गंगा प्रकटल्याने याचा संबंध  भूकंपाशी जोडला गेला.

First Published: Thursday, July 19, 2012, 17:55


comments powered by Disqus