Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:52
झी २४ तास वेब टीम, नवी मुंबई नवी मुंबईच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या परिसरातल्या प्रत्येक प्रवेशद्वार आणि सार्वजनिक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. यात २४८ हाय डेफिनेशन आणि ३४ पीटीझेड कॅमेऱ्यांचा समावेश आहे. या सुरक्षा व्यवस्थेसाठी पहिल्या टप्प्यात आठ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर दुस-या टप्प्यात आणखी काही महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत जेणेकरून शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची नोंद केली जाणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतली गुन्हेगारी रोखण्यास मदतही होणार आहे.
देशात होणाऱ्या घातपाती कारवाया लक्षात घेता नवी मुंबईच्या सुरक्षेसाठीही काही महत्त्वाची पावलं उचलण्यात आली आहेत. यासाठी महापालिकेनं महासभेत तसा प्रस्तावही मंजूर केला आहे. या अंतर्गत शहराच्या प्रवेशद्वारावर ऐरोली-मुलुंड पूल, ठाणे दिघा रोड, शिळफाटा, वाशी टोल नाका, किल्ले गावठाण इथं सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसंच मॉल्सबाहेरही हे कॅमेरे बसवण्यात येणार असून त्यांचं कनेक्शन महापालिका आणि पोलीस मुख्यालयांशी जोडण्यात येईल.
First Published: Tuesday, November 22, 2011, 13:52