रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप - Marathi News 24taas.com

रिक्षाचालकांचा संप, नागरिकांना कंप

www.24taas.com, नवी मुंबई
 
रिक्षा भाडेवाढीसाठी ऑटो रिक्षा मेन्स युनियननं पुकारलेल्या बंदमुळे नवी मुंबईतल्या प्रवाशांचे हाल होत आहेत. रिक्षाचालकांच्या बेमुदत संपावरुन शरद रावांनी माघार घेत आज लाक्षणिक संप पुकारला आहे. सीएनजीपाठोपाठ पेट्रोल रिक्षाच्या दरातही वाढ करण्यात यावी, अशी मागणी ऑटोरिक्षा मालक-चालक संघटना कृती समितीनं केली आहे.
शिवसेनेच्या महाराष्ट्र रिक्षा संघटनेनं या बंदमध्ये सहभाग घेतला नसल्यामुळे प्रवाशांना काही अंशी दिलासा मिळाला असला तरी रस्त्यावर तुरळक रिक्षा धावतांना दिसत आहेत. त्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनं, टॅक्सीचा आधार घ्यावा लागतोय. रिक्षाची बराच वेळ वाट पहावी लागत असल्यानं अनेक प्रवासी पायी चालत नियोजित ठिकाण गाठणं पसंत करत आहेत.
 
भाडेवाढीसाठी रिक्षाचालकांचा हा संप असला तरी प्रवाशांचे मात्र संपामुळे अतोनात हाल होतायत. त्यामुळे संपाबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
 

First Published: Monday, April 16, 2012, 16:21


comments powered by Disqus