नव्या सिनेमांमधली देशभक्ती
भारतीय सिनेमांना देशभक्ती हा विषय नवीन नाही. देशप्रेम व्यक्त करण्याचं आणि वृद्धिंगत करण्याचं काम भारतीय सिनेमांनी वेळोवेळी केलं. पण, पूर्वी पाहायला मिळायचे ते वेगळ्या पद्धतीचे देशभक्तीपर सिनेमे.. पूरब और पश्चिम, क्रांती, मेरा गांव,मेरा देस या प्रकारचे सिनेमे आता दिसत नाही. आता देशाशी संबंधित असणाऱ्या सिनेमाची पद्धत आणि तंत्र संपूर्णपणे बदलून गेलंय. त्याला शहरी आणि स्टाइलिश चेहरा मिळालाय.
रंग दे बसंती
नव्या जमान्यातील नव्या पिढीचं देशाशी जुळलेलं नातं राकेश ओमप्रकाश मेहरा रंग दे बसंतीमध्ये पाहायला मिळतं. सिनेमात बेपर्वा तरुणांच्या जत्थ्याला जेव्हा आपल्या एका लष्करातील मित्राच्या मृत्यूची होत असलेली विटंबना दिसते, तेव्हा त्यांच्यातील भारयत्व उफाळून येतं. ज्या क्रांतीकारकांवर सिनेमा तरूण करत असतात, त्यांचाच आदर्श घेऊन ते देशासाठी बलिदान करतात. आमिरखान, शर्मन जोशी, सोहा अली खान, सिद्धार्थ, कुणाल कपूर आणि माधवन यांचा अभिनय तुफान होता. मुळात यात देशाचं गुणगान गाण्याऐवजी ‘कोई भी देश परफेक्ट नही होता, उसे परफेक्ट बनाना पडता है’ या संवादाने हिंदी सिनेमांना नव्या देशभक्तीचा रस्ता दाखवला.
अ वेनस्डे
मुंबईतील ७/११ रेल्वे बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर आधारित ही एक अद्भूत कथा रंगवली गेली होती. प्रशासन जेव्हा लाचार बनतं, तेव्हा आतंकवादाशी लढायला वेगळा मार्ग निवडणं कसं भाग पडतं, हे या सिनेमात दिसलं. सामान्य माणून भडकला, की तो काय करू शकतो, याचं भन्नाट चित्रीकरण या सिनेमात होतं. नसरुद्दिन शाह आणि अनुपम खेर यांच्यासारखे बुजुर्ग आणि सशक्त अभिनेत्यांच्या जुगलबंदीतून सामान्य माणूस सीमेवर न जाताही आतंकवादाशी कसा सामना करतो, याचं प्रत्यकारी चित्रण उभं राहिलं
कहानी
‘कहानी’ हा खरंतर थ्रिलर टाइपचा सिनेमा.. लंडनहून आपल्या हरवलेल्या नवऱ्याला शोधायला आलेली गरोदर बाई आणि तिचा शोध ही या सिनेमाची कथा... पण, तिचा हा वैयक्तिक पातळीवरचा शोध हळूहळू राष्ट्रीय घटनेचं स्वरूप कसं घेतो, आणि भारतीय इंटेलिजन्सलाही न सुटलेलं कोडं कसं सोडवतो याचं वैशिष्ट्यपूर्ण चित्रण या सिनेमात केलं गेलं आणि शेवटाकडे येता येता हा सिनेमाही देशभक्तीपर सिनेमा ठरला.
चक दे! इंडिया
भारतीय महिला हॉकी संघाला आंतरराष्ट्रीय स्तरावर विजय मिळवून देण्यासाठी चाललेली एका हॉकी प्रशिक्षकाची धडपड असा या सिनेमाचा विषय होता. सत्यघटनेवर आधारीत या सिनेमात शाहरुख खानने वेगळीच भूमिका सादर केली. आपल्या नावावरील कलंक पुसण्यासाठी इरेला पेटलेला प्रशिक्षक, भारताच्या राष्ट्रीय खेळाबद्दलची अनास्था, आणि महिलांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन यामुळे सिनेमा देशातील तरुणाईला भावला.
लक्ष्य
आयुष्यात काय करायचं आहे याबंद्दल गोंधळलेला तरुण सैन्यात भरती होतो आणि आयुष्याचं ध्येय त्याला उमगतं. कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय यामध्ये सहभागी झाल्यामुळे हा तरुण नखशिखान्त बदलून जातो. ऋतिक रोशनने संभ्रमित तरुणाची आणि त्यानंतर बदल घडत एका जबाबदार आर्मी ऑफिसरची भूमिका अत्यंत समजुतदारपणे निभावली होती. यामुळेच या सिनेमातील देशभक्तीचा संदेश तरुणांपर्यंत सहज पोहोचला
लगान- वन्स अपॉन अ टाइम इन इंडिया
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक काल्पनिक कहाणी म्हणून आलेला `लगान` हा सिनेमा एक दंतकथा ठरला. ऑस्करपर्यंत जाऊन आलेल्या या सिनेमामधून देशभक्ती, खेळ, जातीव्यवस्था, धर्म यांसारख्या सगळ्याच विषयांची एकत्रित गुंफण केलेली होती. आशुतोष गोवारीकरचं दिग्दर्शन आणि आमिर खानची उत्तुंग निर्मिती असलेल्या सिनेमाने इतिहास घडवला
स्वदेस- वी द पीपल
नासासारख्या आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करणाऱ्या मोहन भार्गवला भारतातील एका गावात यावं लागतं. गावामधून आपल्या दाईला अमेरिकेत नेण्यापूर्वी त्याला काही अटींची पुर्तता करावी लागते. या काळात त्याला आपल्या मायभूमीचे वेगळे पैलू दिसतात. आणि तो भारतातच कायमचा स्थायिक होऊन आपरल्या शिक्षणातून गावाचा विकास करतो. हा एक महत्वाचा देशभक्तीपर सिनेमा आहे
मिशन काश्मिर
काश्मिर प्रश्न हा कायम धगधगणाऱ्या लाव्यासारखा ज्वलंत प्रश्न बनून भारताला चटके देत असतो. मात्र, इथल्या लोकांचं जीवन कसं आहे, त्यांचं भारतीय लष्कराबद्दल मत काय आहे, भारतीय लष्कराला काश्मिरमध्ये कशा प्रकारे वागावं लागतं याचं चित्रीकरण या सिनेमात होतं. ऋतिक रोशनचा कसदार अभिनय आणि नकारात्मक छटा असणारा अभिनय, संजय दत्त याचा भारून टाकणारा आर्मी ऑफिसर आणिकाश्मिरचं सौंदर्य या सिनेमांमुळे मिशन काश्मिर देशभक्तीपर सिनेमांत आपलं स्थान पटकावू शकला.
सरफरोश
सीमेलगतच्या गावांमध्ये असलेलं दहशतवादी कारवायांचं केंद्र, शेजारी राष्ट्रातील कलाकारांचं वास्तव असा वेगळा विषय असलेला सरफरोश... गजल गायक असणाऱ्या नसिरुद्दिन शाहचा जबरदस्त अभिनय आणि त्याचा फॅन पण देशासाठी वाट्टेल ते करू शकणारा निडर आयपीएस अधिकारी आमिर खान यांच्या अभिनयाच्या जुगलबंदीतून सरफरोशला वेगळं महत्व प्राप्त झालं. नव्या जमान्यातील देशभक्तिपर सिनेमांच्या यादीत या सिनेमाचं नाव आवर्जून घ्यावं लागेल.
/marathi/slideshow/हिंदी-सिनेमातील-देशभक्तीची-नवी-लाट_104.html/6