Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई २६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली. कारण, याच दिवशी त्यांच्यावर जणू काही अस्मानी संकट कोसळलं. त्याला आज २४ वर्ष पूर्ण झालीत.
तारीख २४ जुलै १९८९... रायगडकरांच्या काळजात धस्स करुन जाणारी तारीख... हीच तारीख त्यांच्या अंगावर काटा आणते. रायगडच्या आंबा नदीला पूर आला... नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. जांभूळपाड्यातील गावकरी साखरझोपेत होते. मात्र, ती रात्र त्यांच्यासाठी जणू काळरात्र ठरली. कारण आंबा नदीचं पाणी मध्यरात्रीच्या सुमारास थेट त्यांच्या घरात शिरलं. बघता बघता पाण्याची पातळी वाढली आणि होत्याचं नव्हतं झालं. महापूराचा तांडव इतकं महाभयानक होतं की कुणाचं घर, तर कुणाचे नातेवाईक डोळ्यादेखत पाण्यात वाहून गेले. यात ८४ जणांचा बळी गेला.
या घटनेला २४ वर्ष पूर्ण झालेत. मात्र, आजही त्या पूराच्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या अंगावर शहारे आणतात. या महापूरापासून प्रशासनानं आजही कोणताही धडा घेतला नसल्याची खंत त्यांना बोचतेय. २४ वर्षानंतरही आंबा नदीपात्राचं रुंदीकरण आणि नदीतील गाळ काढण्याची मागणी प्रलंबितच आहे.
या महापूराच्या काळ्या आठवणी इथल्या ग्रामस्थांच्या डोक्यात आजही घोंगावतात. प्रशासनानं अशा घटनांपासून बोध घेत खबरदारीचे उपाय करावेत, अशी माफक अपेक्षा इथल्या ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, July 24, 2013, 09:28