Last Updated: Friday, November 1, 2013, 16:32
www.24taas.com, झी मीडिया, पाटणा पाटण्यात झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील प्रमुख संशयित आरोपीचा मृत्यू झाल्यानं बॉम्बस्फोटाच्या चौकशीला मोठा धक्का बसलाय.
इंदिरा गांधी आयुर्विज्ञान संस्थान हॉस्पीटलमध्ये पाटणा बॉम्बस्फोटातील संशयित आरोपी ऐनुल ऊर्फ तारिकचा काल रात्री उशीरा मृत्यू झालाय. हॉस्पीटलचे अधिकारी अरुण कुमार सिंह यांच्या म्हणण्यानुसार तारिकला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. त्याच्या मेंदूमध्ये बॉम्बस्फोटावेळी छर्रे घुसले होते. हे छर्रे लोखंडाच्या तुकड्यांचे होते. या परिस्थितीत त्याच्यावर ऑपरेशन करणं शक्य नव्हतं.
२७ ऑक्टोबर रोजी गांधी मैदानात भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रॅलीच्या काही वेळ अगोदर पाटणा रेल्वे स्टेशनच्या शौचालयात पहिला बॉम्बस्फोट झाला. यानंतर तिथल्या प्लॅटफॉर्म नंबर १० वरून पळताना तारिकला अटक करण्यात आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित आरोपीजवळून काही टेलिफोन नंबर आणि दस्तावेज ताब्यात घेण्यात आले होते आणि याच आधारावर दहशतवाद्यांकडून रचण्यात आलेल्या संपूर्ण कटाचा उलगडा झाला होता.
जखमी तारिक कोम्यात असल्यानं पोलीसांना त्याची चौकशी करणं शक्य झालं नाही किंवा त्याला न्याय दंडाधिकाऱ्यांसमोरही हजर करण्यात आलं नव्हतं. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, पाटण्यात झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात सहा लोक मारले गेले होते तर जवळजवळ ८२ जण जखमी झाले होते.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 1, 2013, 16:32