तिचा लढा व्यर्थ जाणार नाही – सोनिया गांधी, Sonia condoles rape victim’s death, assures fitting punishment

तिचा लढा व्यर्थ जाणार नाही – सोनिया गांधी

तिचा लढा व्यर्थ जाणार नाही – सोनिया गांधी
www.24taas.com, नवी दिल्ली

पीडित मुलीचा मृत्यू ही धक्कादायक घटना आहे... तिला न्याय मिळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील, असं आश्वासन देत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गानं आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे.

पीडित मुलीला जरुर न्याय मिळेल आणि तिची लढाई व्यर्थ जाणार नाही कारण बलात्कार करणाऱ्यांना कठोरातली कठोर सजा दिली जाईल, असं वनच आंदोलनकर्त्यांना सोनियांनी दिलंय. सोनियांनी या घटनेनंतर पहिल्यांदाच टीव्हीवर ही घोषणा केलीय. ‘आज प्रत्येक भारतीय दु:खी आहे कारण त्यानं जणू काही आपली मुलगीच हरवली आहे. पीडित २३ वर्षांच्या मुलीचा मृत्यू ही धक्कादायक गोष्ट आहे. तीचं संपूर्ण आयुष्य अनेक आशा, महत्त्वकांक्षेनं भरलेलं होतं. आम्ही मनापासून तिच्या आई-वडिल आणि कुटुंबासोबत आहोत. संपूर्ण देशाला त्यांची पिडा काय असेल याची जाणीव आहे’

या घटनेनंतर देशात शांती कायम राखण्याचं आवाहन करताना सोनियांनी ‘या मुलीचा लढा व्यर्थ जाणार नाही, तिला जरूर न्याय मिळेल’ असा संकल्प केलाय. याचबरोबर ‘देशातील महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही आमची पूर्ण शक्ती लावू... कायदे-प्रशासनाबरोबर आम्हीही लढा देऊ, आणि अशी कृत्यं करणाऱ्या दोषींना कठोरातील कठोर सजा मिळावी अशी तरतूद करू’ असा संकल्पदेखील सोनियांनी बोलून दाखविलाय.

‘आपल्या लाजिरवाण्या सामाजिक नजरा आणि मनोवृत्तींना तोंड देण्याची आपली तयारी असती तर आज देशातील पुरुषांकडून महिलांवर आणि मुलींवर एवढ्या घृणास्पदरित्या बलात्कार आणि छेडछाडीच्या घटनांना आळा बसू शकला असता. या घटनेनंतर सर्व देश संतापलेला आहे पण, जे जे लोक या मुलीच्या समर्थनासाठी रस्त्यावर उतरले त्यांना मी आश्वासन देऊन इच्छिते की तुमचा आवाज सरकारपर्यंत पोहचलाय. एक महिला आणि एक आई असल्यामुळे तुम्हाला आज काय वाटत असेल याची जाणीव मलाही आहे. पण, माझी तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही प्रकारच्या हिंसेचा मार्ग न स्वीकारता तुम्ही महिलांवरील अत्याचाराचा निषेध करावा’ असं सोनियांनी म्हटलंय.

First Published: Saturday, December 29, 2012, 16:54


comments powered by Disqus