Last Updated: Thursday, July 18, 2013, 09:15
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली लग्न आणि घटस्फोटासंबंधी ही एक महत्त्वाची बातमी... महिलांसाठी ही एक खुशखबच म्हणता येईल. लग्न आणि घटस्फोटासंदर्भातले कायदे विशेषतः महिलांच्या दृष्टीनं सुटसुटीत होणार आहेत. घटस्फोट घेताना पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीतही पत्नीला वाटा मिळू शकेल.
होय, आता केवळ आपल्या पित्याच्याच नाही तर पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीमध्ये महिलांना वाटा मिळू शकणार आहे आणि तशाप्रकारे हिस्सा मिळणं शक्य नसेल तर पतीच्या वडिलोपार्जित संपत्तीच्या किंमतीनुसार तिला योग्य मोबदला मिळणंही शक्य होणार आहे. यासंदर्भातली शिफारस मंत्रिगटानं केली होती. त्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिलीय.
`विवाहविषयक कायदे घटनादुरुस्ती विधेयका`चा अभ्यास करण्यासाठी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या मंत्रिगटाने कायद्यांना महिलांच्या अधिकाधिक हिताचे करण्यासाठी काही शिफारसी केल्या होत्या. त्यांना सरकारने मंजुरी दिली आहे. हिंदू विवाह कायदा आणि विशेष विवाह कायद्यात दुरुस्तीच्या उद्देशाने तयार केलेल्या या विधेयकावरून मंत्रिमंडळाच्या एप्रिलमधील बैठकीत मतभेद झाल्याने हे विधेयक मंत्रिगटाकडे सोपवण्यात आले होते. मंत्रिमंडळाने चौथ्यांना या विधेयकाला मंजुरी दिली आहे.
आतापर्यंत घटस्फोटावेळी पतीच्या स्व:कमाईच्या मालमत्तेतून पत्नीला पोटगी दिली जायची. पण आता पतीच्या वडिलोपार्जित मालमत्तेचा वाटाही मोबदल्याच्या रुपात पत्नीला मिळणार आहे. त्यासाठी विवाह कायद्यामध्ये १३ – एफ या कलमाची नव्यानं तरतूद करण्यात आलीय. त्या मोबदल्याची रक्कम घटस्फोटाच्या सुनावणीवेळी न्यायाधीश ठरवणार आहेत.
त्याचबरोबर परस्पर सहमतीनं घटस्फोटासाठी अर्ज करणाऱ्या जोडप्यांना घटस्फोट मिळण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी बंधनकारक असतो, तो कालावधी कमी करण्याचे अधिकार कोर्टाला द्यायचे का? यावरही कॅबिनेटच्या बैठकीत चर्चा झाली.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, July 18, 2013, 09:10