Last Updated: Thursday, October 3, 2013, 13:23
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई रेल्वे... मुंबईची लाईफलाईन... मात्र, ही लाईलाईन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचं जीवन अत्यंत विदारक आहे. गेली अनेक वर्षे हे कर्मचारी मुंबईतल्या रेल्वे कॉलन्यांमध्ये रहातात. पण जीव मुठीत धरूनच...
लोकल ट्रेन म्हणजे मुंबईकरांची लाइफलाइन... पण, ही लाइफलाइन चालवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची लाईफ किती विदारक आहे हे इथली दृश्यं स्पष्टपणे सांगतात. जुन्या, मोडकळीला आलेल्या इमारती... जागोजागी इमारतींना पडलेले तडे... इमारतीवर उगवलेली मोठी मोठी झाडं... ठिकठिकाणी पडलेले स्लॅब... घाणीचं साम्राज्य... आणि कधीही कोसळतील अशा धोकादायक इमारती... हे चित्र पाहिल्यानंतर अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. वर्षानुवर्ष ओसाड पडलेल्या इमारतींचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र, हे चित्र आहे वांद्रे आणि खारमधल्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतीचं... याच इमारतींमध्ये वर्षानुवर्षे जीव मुठीत घेऊन रेल्वेचे कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय राहतायत.
वांद्रे आणि खारमधल्या या रेल्वे वसाहतीतल्या इमारती प्रातिनिधीक आहेत. मुंबई शहर आणि उपनगरात अनेक ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या अशा वसाहती आहेत. प्रत्येक ठिकाणी याच नरकयातना कमी अधिक प्रमाणात रहिवाशांना भोगाव्या लागतायत. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील काहीच उपयोग होत नाही, अशी इथल्या रहिवाशांची तक्रार आहे.
जी गत मुंबईकर रेल्वे प्रवाशांची आहे, तीच गत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांचीदेखील आहे. रेल्वे प्रशासनाने वसाहतींच्या या बकाल अवस्थेकडे साफ डोळेझाक करतेय. इमारतींच्या दुरूस्तीकडे प्रशासनाचं पूर्णत: दुर्लक्ष झालंय.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, October 3, 2013, 12:54