Last Updated: Sunday, March 10, 2013, 18:59
www.24taas.com, मुंबईविधीमंडळ अधिवेशनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलवली. या परिषदेत युपीएससी परीक्षांमधून प्रादेशिक भाषांची झालेली हद्दपारी या विषयावर ही पत्रकार परिषद आयोजित केली होती.
युपीएससी परीक्षांमधून मराठी आणि इतर प्रादेशिक भाषा डावलण्याचा निर्णय हा अन्यायकारक असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यामुळे ग्रामिण भागातून या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, असं मत राज ठाकरेंनी मांडलं. तसंच यावेळी इतर भाषांना डावलल्यावर हिंदी भाषेला का वगळलं नाही, असा प्रश्न राज ठाकरेंनी केला. हिंदी भाषा ही राष्ट्रभाषा नाही. ती ही राज्यभाषाच आहे, हे दाखवणारे सरकारी पुरावे या वेळी राज ठाकरेंनी सादर केले. तसंच पंडीत जवाहरलाल नेहरु यांच्या वक्तव्याचा दाखला देत हिंदीइतक्याच इतर प्रादेशिक भाषाही राष्ट्रभाषा असल्याचं सप्रमाण सिद्ध केलं.
हा विषय केंद्रातला असल्यामुळे युपीएससी परीक्षा प्रकरणी महाराष्ट्राच्या ४८ खासदारांनी अधिवेशनात हा विषय उचलून धरावा, अशी विनंती राज ठाकरेंनी केली. त्यांचं नशिब चांगलं म्हणून युपीएससीचं ऑफिस महाराष्ट्रात नाही. असंही इशाऱ्यात राज ठाकरेंनी म्हटलं.
रतन टाटांसोबत झालेली भेट ही राजकीय दृष्टिकोनातून नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं. रतन टाटांसारख्या व्यक्तींची भेट हा मला मिळालेला आशिर्वाद असल्याचं मी समजतो, असं राज ठाकरे म्हणाले. रतन टाटांशी दुष्काळ तसंच महाराष्ट्राच्या विकासाबाबत चर्चा केल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. ताडोबा जंगलात वाघ वाचवण्यासाठी काय प्रयत्न करता येईल, यावर दोघांमध्ये चर्चा झाली होती. टाटांनी ताडोबामध्ये रिसॉर्ट्स सुरू करावीत, तसंच कोकण किनारपट्टीवरही व्यापार वाढेल आणि विकास कसा होईल याबद्दल बोलणी झाल्याचं राज ठाकरेंनी सांगितलं.
स्वबळावर लढण्यावरही राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसला टोमणा मारला. सकाळी स्वबळावर लढण्याची भाषा करायची आणि संध्याकाळी सेटिंग करायचं ही राष्ट्रवादी काँग्रेसची पद्धत असल्याचं राज ठाकरे म्हणाले. एकनाथ खडसे मनसे मदारांना बोलू देत नाहीत असा आरोपही त्यांनी केला.
First Published: Sunday, March 10, 2013, 18:14