लॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटील - Marathi News 24taas.com

लॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटील

www.24taas.com, मुंबई
 
राज्यात असणाऱ्या लॉजवर फार मोठ्या प्रमाणात अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. आणि यालाच पायबंद घालण्यासाठी आर. आर. पाटील यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत. पावसाळी अधिवेशनात सेक्स स्कँडलचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. लॉजवर मोठ्या प्रमाणात अश्लिल चित्रफीती रेकॉर्ड केल्या जातात आणि अल्पवयीन मुलींचे शोषण केले जाते. आणि त्यामुळे गृहमंत्र्यांनी लॉजवर नजर ठेवणाऱ्या 'तिसऱ्या डोळ्याची' (सीसीटीव्ही) विधानसभेत घोषणा केली.
 
सेक्‍स स्कॅंडल हा विषय विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी मांडला असता त्यावर आबा पाटील यांनी उत्तर दिले. सटाण्याच्या घटनेची सरकारने गंभीर नोंद घेतली असून, आरोपींना अटक केल्याची माहिती गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली. ज्या लॉजवर हा प्रकार घडला, त्याला परवाना नसल्याची माहिती तपासात समोर आल्याने त्या लॉजवर बंदी घातल्याचे त्यांनी सांगितलं.
 
मुलींना आमिष दाखवून अथवा दमदाटी करून त्यांच्यावर जबरदस्ती करणाऱ्या तसेच मुलींच्या अश्‍लील चित्रफिती काढणाच्या समस्येला आळा बसावा म्हणून लॉजवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री पाटील यांनी केली.
 
 
 

First Published: Wednesday, July 11, 2012, 12:33


comments powered by Disqus