विदर्भात पाण्यासाठी वणवण - Marathi News 24taas.com

विदर्भात पाण्यासाठी वणवण

www.24taas.com, नागपूर
 
वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही होतोय.
 
विदर्भात सध्या सूर्य आग ओकतोय. सरासरी ४१ डिग्री तापमान असल्यानं दिवसा घराबाहेर पडणंही अवघड झालंय. अशा स्थितीत उन्हाबरोबरच पाणीटंचाईचे चटकेही नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामस्थांना सहन करावे लागत आहेत. गावातल्या विहिरी, बोअरवेल असे तळाला गेले आहेत. कुठे एक- दोन किलोमीटरची पायपीट, तर कुठे सायकलवर पाण्याची ने-आण, तर तर कुठे बैलगाडीतून पाण्यासाठीची वणवण, ग्रामीण भागात सध्या सगळीकडे हेच दिसून येतंय.
 
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक ठिकाणी विहिरी आणि बोअरवेल हेच पाण्याचे मुख्य स्त्रोत आहेत. उन्हाळ्यात हे स्त्रोतच आटत चालल्यानं पिण्याच्या पाण्यासाठीचा संघर्ष तीव्र झालाय. पुरेसं पाणी नाही, टँकर गावात कधी येईल याचा नेम नाही. या सगळ्याचा फटका विद्यार्थ्यांनाही बसतोय.
 
जिल्ह्यातल्या १३ तालुक्यांपैकी ५६२ गावांमध्ये पाणीटंचाई आणि पर्यायाने दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यातही हिंगणा, करोल, नरखेड आणि कामठी तालुक्यातील परिस्थिती अधिक चिंताजनक आहे. डोंगराळ भागात परिस्थिती अधिक भीषण आहे. जिल्हा प्रशासन मात्र परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा करण्यात मग्न आहे. किती कोटींच्या कामांना मंजुरी दिलीय, हे सांगण्यातच धन्यता मानण्यात येतेय.
 

सरकारी अधिकारी आकडेवारीत काहीही सांगत असले, तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक भीषण होतेय. अजून ६० दिवस कसे काढायचे हा प्रश्न गंभीर झालाय. सरकार, राजकारणी याकडं गांभिर्यानं कधी बघणार, असा सवाल विचारण्यात येतोय.

First Published: Tuesday, April 10, 2012, 13:11


comments powered by Disqus