भंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी' - Marathi News 24taas.com

भंडारा: जिद्दीने दुष्काळाला पाजलं 'पाणी'

माधव चंदनकर,www.24taas.com, भंडारा
 
महाराष्ट्राचा अवघ्या ग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरु असताना भंडारा जिल्ह्यातील बीड सीतेपार या गावानं मात्र दुष्काळाचा यशस्वी सामना केलाय. भंडाऱ्यापासून 12 किलोमीटरवर असलेले हे बीड सीतेपूर गाव चार वर्षांपूर्वी या गावाची स्थिती इतर दुष्काळग्रस्त गावांप्रमाणेच होती. उन्हाळा सुरु झाला की, पाण्यासाठीची वणवण पाचवीला पुजलेली.
 
परंतु आता ते आता दिवस गेलेत. या गावात आता भर उन्हाळ्यातही प्रत्येकाला पुरेसं पाणी मिळतं. केवळ पाणीच नव्हे तर विकासाच्या दृष्टीनंही गावानं चांगलीच प्रगती केली. चार वर्षांपूर्वी सरपंच झालेल्या देवदास बांते यांनी प्रथम गावकऱ्यांना विश्वासात घेऊन  विकास  आराखडा आखला आणि कामाला सुरुवात केली. पावसाळ्यात वाहून जाणा-या पाण्याचा साठा करण्यासाठी प्रथम तलाव बांधला आणि ठिकठिकाणी विहिरी खोदल्या. पर्यावरण संतूलन राखण्यासाठी झाडे लावली. हि सर्व कामे रोजगार हमी योजनेतून करण्यात आली. त्यामुळं गावातल्या लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आणि विकासकामेही झाली.
 
दिड हजार लोकवस्तीच्या या गावात शाळा, समाज मंदिरंही रोहयोतून बांधण्यात आलीयत. चार वर्षांपूर्वी कंगाल असलेल्या ग्रामपंचायतीकडं सध्या आठ लाखांची रोकड शिल्लक आहे. गावानं केलेल्या या प्रगतीबद्दल शासनाकडून सन्मानही करण्यात आलाय. राजकारणाऐवजी समाजकारण हा दृष्टीकोन ठेवून काम केल्यास ग्रामविकासाचे स्वप्न सत्यात उतरायला वेळ लागत नाही. हेच या छोट्या गावानं दाखवून दिलंय. आता गरज आहे ती, या गावाचा आदर्श इतर गावांनी घ्यायची.
 
 

First Published: Wednesday, May 9, 2012, 19:24


comments powered by Disqus