Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08
www.24taas.com, नाशिकनागरिकांना पाणी बचतीचं आवाहन करणाऱ्या नाशिक महापालिका प्रशासनाच्या वतीनेच आज शहरात हजारो लीटर पाण्याची नासाडी करण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी हेल्पलाईनवर नागरिकांना माहिती देण्याचं आवाहन केलंय. मात्र महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी पाण्याची नासाडीच केली. नाशिककरांची धुळवडही यंदा कोरडीच साजरी झाली. मात्र या घटनेला 2 दिवसही होत नाहीत. तोच पालिकाच पाण्याची नासाडी करत असल्याचं दिसून आलं. गंगाघाटावर पे एँड पार्क धुण्यात आला तोही पालिकेनं बोलावलेल्या टँकरच्या पाण्याने. शहरात एकवेळ पाणीकपात सुरु आहे. अनेकांना कमी दाबाने पाणीपुरवठा सुरु आहे. अशावेळी पालिकेकडून होत असलेल्या या पाण्याच्या नासाडीवर लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केलाय.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सध्या पाण्याची बचत केली जात आहे. आवाहनं केली जात आहेत. मात्र हे उपदेशाचे डोस फक्त नागरिकांसाठीच का असा सवाल उपस्थित होत आहे. ज्या पद्धतीने पार्किंगच्या साफसफाईसाठी पाण्याची नासाडी झाली त्यावर प्रतिक्रिया द्यायला पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी तयार नाही. पाणी कुणाच्या सांगण्यावरून फवारण्यात आलं, पाणी कुठून आणलं याविषयी अधीक्षक अभियंताही अनभिज्ञ होते. त्यामुळे लोकांना ब्रह्मज्ञान देण्याबरोबर पालिकेने स्वतःच्या कारभाराकडेही जरा लक्षपूर्वक पाहिलं पाहीजे.
First Published: Thursday, March 28, 2013, 22:08