सचिन तेंडुलकर मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक, Sachin Tendulkar`s 200th Test in Mumbai

सचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक

सचिन आऊट : मास्टर इनिंग झोकात, चाहते भावूक
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मास्टर इनिंग सचिन तेंडुलकर याने शेवटच्या कसोटीत खेळली. १२ खणखणीत चौकार ठोकत ७४ धावा केल्या. त्यामुळे एकीकडे चाहते खूश असले तरी त्याच्या अखेरच्या कसोटीमुळे चाहते भावूक झालेत. वाडखेडेवरील चाहत्यांनी उभे राहून सचिनला मानवंदना दिली.

दुसऱ्या दिवशी सचिनने अर्धशतक ठोकत, धावांची भूक संपली नसल्याचे दाखवून दिले. सचिनचे कसोटीतील हे ६८ वे अर्धशतक होते. वानखेडेवर सचिन सचिनचा नारा घुमत आहेत. सचिनने दमदार अर्धशतक झळकावल्यानंतर वानखेडे स्टेडियमवर उत्साहाला ऊधाण आल्याचे पाहायला मिळत होते. मात्र, एक चेंडू अलगत स्लीपमधून बाहेर काढण्याच्या नादात नरसिंह देवनारायणच्या बॉलिंगवर झेल आऊट होत सचिन माघारी परतला आहे. सचिन बाद झाल्याने वानखेडे स्टेडियमवर सन्नाटा पसरला होता.

२०० व्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी चेतश्वर पुजाराने आपले शानदार अर्धशतक झळकावले. त्याधी पहिल्या दिवशी प्रज्ञान ओझाने पाच बळी आणि आर अश्‍विनने तीन बळी घेत पाहुण्या विंडीज संघाचा फास १८२ धावांतच खुर्दा केला. वानखेडे स्टेडीयमवर उठलेल्या टाळय़ांच्या प्रचंड कडकडाटात आणि प्रतिस्पर्धी संघाचा गार्ड ऑफ ऑनरचा स्वीकार करीत चाळीस वर्षीय सचिन तेंडुलकर फलंदाजीस उतरला. अखेरचा कसोटी सामना असल्याने सचिनप्रेमींनी वानखेडे गर्दी केली होती.

सचिननेही चाहत्यांना निराश न करता पहिल्या दिवशी संयमी खेळी करत नाबाद ३८ धावा केल्या होत्या. आज सकाळी सामन्याला सुरुवात होताच सचिनने एकाच षटकात लागोपाठ चौकार ठोकत आपणच क्रिकेटचे बादशाह असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले. सचिनने अर्धशतक झळकावताच वानखेडे स्टेडियममध्ये उपस्थित असल्याने प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात सचिनला शुभेच्छा दिल्या.

सचिन बाद झाल्यावर स्टेडियममध्ये शांतता पसरली. तर काहींच्या डोळ्यात भावनाश्रु होते. पॅव्हेलियनमध्ये परतत असताना सचिनने बॅट उंचावून पाठिंबा दर्शवणा-या चाहत्यांचे आभार मानले. आज सचिनचा खेळ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी, अभिनेता आमिर खान, किरण राव , ऋतिक रोशन आणि सचिनचे संपूर्ण कुटुंब स्टेडियममध्ये उपस्थित आहे.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, November 15, 2013, 11:24


comments powered by Disqus