Last Updated: Tuesday, March 26, 2013, 10:13
www.24taas.com, मुंबई मुंबईत १९९३ साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणात दोषी आढळलेल्या संजय दत्तला सुप्रीम कोर्टानं पाच वर्षांची सजा सुनावल्यानंतर एकच खळबळ उडाली. ‘संजय दत्तला माफ करा’ असं म्हणणाऱ्या लोकांची संख्याही वाढत चाललीय. याच दरम्यान, याच बॉम्बस्फोटाप्रकरणातील एक दोषी जैबुनिसा कादरी हिच्या मुलीनंही आपल्या आईच्या सुटकेची मागणी पुढे केलीय. संजय दत्तला माफी मिळू शकते, तर माझ्या आईला का नाही? असा सवालच तीनं केलाय.
एका न्यूज चॅनलशी बोलताना जैबुनिसा हिच्या मुलीनं आपल्या आईच्या सुटकेची मागणी केलीय. ‘माझी आईलाही माफी मिळायला हवी. माझ्या आईची तब्येतही सध्या स्थिर नसते अशातच तिला जेलमध्ये जायला लागणार आहे. पण, संजयच्या माफीच्या मागणीमुळे मला आशेचा किरण दिसतोय. कारण, संजय दत्तवर माझ्या आईवर असलेल्या गुन्ह्यांपेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल असताना त्याला माफी मिळण्याची मागणी केली जातेय... त्याला माफी मिळणार असेल तर माझ्या आईलाही मिळायलाच हवी’ असं जैबुनिसा हिच्या मुलीनं म्हटलंय.
जैबुनिसा हिच्यावर १९९३ बॉम्बस्फोटाप्रकरणी आर्म्स अॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले होते. अबु सालेम आणि अनीस इब्राहिम यांच्या सांगण्यानुसार एके-५६ आणि हॅन्ड ग्रेनेडस् तिनं आपल्याकडे ठेवले होते, असा आरोप तिच्यावर होता. त्यानुसार जैबुनिसालाही पाच वर्षांची सजा ठोठावण्यात आली. जैबुनिसा हिच्यावर दहशतवादाला पाठिंबा देण्याचाही आरोप ठेवण्यात आलाय.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, संजय दत्त यालाही आर्म्स अॅक्टनुसार सजा ठोठावण्यात आलीय. जैबुनिसा हिच्यापेक्षा संजय दत्तवर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.
First Published: Tuesday, March 26, 2013, 10:09