उस्मानाबाद : नागरिक- पोलिसांमध्ये हाणामारी - Marathi News 24taas.com

उस्मानाबाद : नागरिक- पोलिसांमध्ये हाणामारी


www.24taas.com, उस्मानाबाद
 
उस्मानाबाद जिल्ह्यात मतदानाला हिंसक वळण लागलं आहे. नागरिक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. जहांगीरवाडी तांडा या गावात हा प्रकार घडला. पोलिंग एजंटच्या बसण्याच्या जागेवरून वादावादीला सुरुवात झाली आणि अखेरीस हाणामारीपर्यंत वाद गेला. यात एका पोलीस उपनिरीक्षकालाही मारहाण करण्यात आली आहे. या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेव्हणे निवडणुकीत उभे आहेत.
 
याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीसाठी सकाळपासून शांततेत सुरु असलेल्या मतदानालाही गालबोट लागले. शेकाप आमदार जयंत पाटलांनी पोलिसांना अरेरावी करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. अलिबाग तालुक्यातील थळ जिल्हा परिषद मतदार संघातील नऊगाव इथं शेकाप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत जोरदार बाचाबाची झाली. शेकापचा कार्यकर्ता मतदान केंद्रात लॅपटॉप घेऊन बसला असताना राष्ट्रवादीला त्यावर आक्षेप घेतला आणि त्यानंतर बाचाबाची सुरु झाली.
 
त्याचदरम्यान शेकापचे आमदार जयंत पाटील आले. त्यानंतर जयंत पाटलांनी राष्ट्रवादी आणि पोलिसांना अरेरावी, दमदाटी कऱण्यास सुरुवात केल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला. हा सर्व प्रकार मतदान केंद्राच्या आवारात घडला. सध्या इथली परिस्थिती नियंत्रणात असून शांततेत मतदान सुरु आहे.

First Published: Tuesday, February 7, 2012, 14:43


comments powered by Disqus