.
.
माणसाच्या बाह्य स्वरुपावरून म्हणजे त्याने घातलेल्या कपड्यांवरून आपण तो कोण असेल त्याला किती समजत असेल याचा अंदाज बांधत असतो. काळवटलेला चेहरा, मळकट बनियान, निळ्या रंगाची पॅन्ट, खांद्यावर एक फडकं. अंगाच्या रोमारोमातून वाहणारे असंख्य धर्मबिंदू, पातेल्यातील चहा चमच्याने लिलयापणे वर-खाली करणारा तो चहावाला चहाबरोबर जीवनाचे असे काही बाळकडू पाजेल की त्याने जीवनाकडे पाहण्याचा आणि छोट्या छोट्या गोष्टी न मिळाल्याने सदैव भोकाड पसरणारी आपली शहरी वृत्ती गळून पडल्याचा प्रत्यय पंढरीच्या वाटेवर आला.पंढरीच्या सावळ्या विठ्ठलाला भेटायला चाललेला वैष्णवांचा थवा... ज्ञानोबा माऊली तुकाराम असा अखंड गजर... वातावरणात चैतन्य, उत्साह आणि भक्ती यांची चहूऔर झालेली शिंपण...रस्त्याचा दुतर्फा माऊलींच्या भक्तांची जमलेली गर्दी...असमंतात एक विलक्षण पावित्र्याचा अनुभव... तळपत्या सूर्यानेही दिवसभर वारक-यांबरोबर राहून या अनुपम सोहळ्याला लावली हजेरी... आळंदीहून पंढरपूरला वारक-यांबरोबर वारीचं वार्तांकन करण्यासाठी चालत होतो. पहिलीच वेळ असल्याने उत्साह होता. त्यामुळे वारक-याबरोबर चालण्यात आनंद वाटत होता. पण आता बातमी देण्याची धावपळ सुरू होती, त्यामुळे थोडे टेन्शन आले होते. उतरतीच्या उन्हाने अंगातून श्वेतगंगा वाहू लागल्या होत्या. पायात गोळे आले होतं. अंगही दुखायला लागलं होतं. डोकं जरा किणकिण दुखतं होतं. तेवढ्यात ‘प्रातः’ या वृत्तपत्राचे माझे मित्र शंकर गिरमिरे म्हणाले, केशवराव चला एकदम फक्कड चहा पिऊ या. तशी मला काही करण्याची इच्छा नव्हती बातमीचं टेन्शन होतं. त्यामुळे मी मान हालवून आणि खिशातून रुमाल काढत घामाने डबडबलेला चेहरा पुसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागलो. वारीच्या वाटेवर सागर चहा हा फेमस चहा आहे. तब्बल ८० ते ९० गाड्या एकट्या सागर चहा नावाची पाटी लावून वारक-यांच्या या महासागरात त्यांची चहाची तल्लफ भागवतात. त्यामुळे त्या गाड्यांवर नेहमी प्रमाणे झुंबड लागली होती. त्यामुळे मी शंकर आणि त्याचेच कार्यालयीन सहकारी विलास बोचरेंना म्हणालो, ‘चला, लवकर बातमी द्यायची की नाही? त्या साध्या गाडीवर चहा घेवू.

शंकर आणि विलास यांनाही बातम्या द्यायच्या होत्या त्यामुळे त्यांनी लगेचच माझ्या सूचनेला सहमती दर्शवली आणि साध्या हातगाडीवर लावलेल्या एका चहाच्या टपरीकडे आगेकूच केली. काळवंटलेला चेहरा, अनेक दिवसांपासून पुरेशी झोप नसल्याने डोळे सुचलेले, डोळ्याच्या कडा लालबुंद झालेल्या, गेल्या १० दिवसांपासून वारीत चालत असताना डोक्यावर तेलाचं टिपूसही न पडल्याने अस्थावस्थ आणि विचित्र वाढलेले केस, दररोज तोच बनियान घातल्याने त्याला आलेला पिंगटपणा आणि त्यात उठून दिसणारे ते चहाचे आणि स्टोव्हच्या काजळीचे काळे डाग, असा अवतार असलेल्या एका साध्या चहाच्या गाडीवर आम्ही तिघे थडकलो. पातेल्यातला चहा चमच्या लिलयापणे वर-खाली करून कडांना लागलेली चहाची भुकटी पातेल्यात सरकवताना तो सराईत चहावाला असल्याचे आमच्या लक्षात आले. हे सर्व करत असताना त्याचा तोंडाचा पट्टाही चालू होता. ‘चला चहा गरम, चहा गरम’ ‘पंढरीची गोडी चहामध्ये थोडीथोडी’ असे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मोठमोठ्याने ओरडत होता.
आम्ही तिघे त्याच्या गाडीजवळ गेल्यावर त्याने आम्हाला विचारले साहेब, किती बोला. त्यावर विलास बोचरे म्हणाले, फक्कड तीन स्पेशल करं. त्याच्या स्टोव्हवर साधा चहा उकळ्या घेऊन थुईथुई नाचत होता. तो म्हणाला, साहेब पाच मिनिटं! मी म्हटलं अरे यार लवकर कर बातमी द्यायची. तुला शक्य नसेल तर दुसरीकडे जातो. तो म्हणाला, साहेब पाच मिनिटं द्या लगेच देतो. त्याने जर माझ्यासारखा उध्दटपणा दाखवला असता तर पुढे त्याने जे काही सांगितलं त्यापासून मी वंचित राहिलो असतो. पण पंढरीच्या पांडुरंगाला थोडी असं होवू द्यायचं होतं. शंकरराव म्हणाले, मस्त चहा कर दिवसभराचा थकवा निघायला पाहिजे. मागच्या गावाला जाऊन बातमी द्यायची आहे. जरा डोकं चालायला पाहिजे. बातमी द्यायची आहे, हे म्हटल्यावर त्याचे ते लालबुंद डोळे जरा चमकले होते. त्याच्या चेह-यावर एक प्रश्न दिसत होता. तो या पत्रकारांना विचारावा का असे त्याला वाटत होते. मग त्याने विचारूनच टाकलं.
साहेब, तुम्ही पत्रकार का? कोणत्या पेपराचे? विलास बोचरे म्हणाले, मी आणि हे (शंकररावांकडे बोट दाखवून) ‘प्रातः’ या वृत्तपत्राचे बातमीदार आहोत. तर (माझ्याकडे बोट दाखवून) हे मुंबईवाले ‘जनता टाइम्स’चे पत्रकार आहेत. वा वा, साहेब हे भलतं भारी झालं. मला सांगा, बी फॉर्मसीचा निकाल लागला का हो? मी म्हटलं काय माहिती नाही. तो म्हणाला, काय साहेब पत्रकार ना तुम्ही तुम्हाला येवढं माहित नाही. शंकरराव म्हणाले, असे पत्रकार आहोत पण आता गेल्या दहा दिवसांपासून वारीच चालतो आहे. त्यामुळे जरा अपडेट नाही. विलास बोचरेंना हे ऐकून राग आला. ते म्हणाले, तुला काय हवं ते सांग. तो म्हणाला बी फॉर्मसीचा निकाल लागला का हे पाहायचं होतं. मी त्याला म्हटलं बी फॉर्मसी आणि तुझा काय संबंध?
त्यावर तो म्हणाला, साहेब बी फार्मसीची परीक्षा दिली आहे. त्याचा निकाल लागला असेल तर पास-नापास कळालं असतं. त्याच्या या उत्तरावर आम्ही तिघेही आवाक झालो. एकमेकांच्या चेह-याकडे पाहून काही क्षण काय बोलावं हे समजत नव्हतं.
मी म्हणालो, काय, तू आणि बी फार्मसीची परीक्षा दिली आहे?
तो म्हणाला, हो साहेब.
अरे बाबा तू बी फार्मसी करतोय मग इथं काय करतोय, चहा आणि असा हा अवतार, शंकरराव म्हणाले.
साहेब, काम कोणतही छोटं नसतं, मला हे जमतं म्हणून मी हे करतोय. परिस्थितीनं गांजलेलाय. पण, या त्यावर मात करण्याची तयारी आहे. त्याचा हा छोटा प्रयत्न आहे.
अरे तुझं नाव काय, कुठं राहतो हे व इतर प्रश्न आमच्या तिघांच्या ओठांवर पटापट आले. तिघेही पत्रकार त्यामुळे यात बातमी शोधण्याचा प्रयत्न करत होतो.
तो म्हणाला, माझं नाव सुनील देविदास नौगण, मी सातारचा. सातारच्या पुसेगावचा.
अरे, सुनील मग तू चहाचा धंदा का करतो. तुला नोकरी नाही का? माझा त्यावर प्रश्न.
गेली अठ्ठावीस युगं पंढरीचा पांडुरंग त्या वीटेवर उभायं. तवापासून आमच्या घरात दारिद्र्याने ठाण मांडलेलंय. पंणजा-आजाच्या वाट्याला जी पाच- दहा बिघे जमीन आली, तीच कसण्यात आमच्या खानदानानं हायत घालविली. आज्यानं स्वर्गाचं दार ठोठवल्यानंतर माझ्या बाच्या वाटेला आलेल्या पाच बिघे कोरडवाहू जमीनीत वर्षानुवर्ष काबाडकष्ट आणि जीवाचं रान करत त्यानं मला व माझ्या तिघा बहिणींना शिकवलं. मी हुशार असल्यानं स्कॉलशीपच्या जीवावर आणि पडेल ते काम करुन पै-पै जमविण्याच्या स्वभावामुळे बारावीनंतरही शिकत राहिलो. हे सांगत असताना त्याचे हात फटाफट चालत होते. स्टोव्ह आमच्यासाठी स्पेशल चहा करत तो आपली काहणी सांगत होता.
बारावीनंतर बी फार्मसीला नंबर लागला. स्कॉलरशीप आणि कमवा शिकाच्या आधारे तीन वर्ष काढल्येत. दोन टाइमच्या मेसचे पैसे नसल्यानं एक टाइमच जेवून वडा पाव आणि पाण्यावर दिवस काढले. पण, त्याचं काही वाटत नाही साहेब. आपल्या नशिबात तेच असेल. पण यापुढे मी ते बदल्याचं ठरवलंय, सुनील सांगत होता. माझ्या डोळ्यासमोरून चित्रपटाचा रिळ फिरावा तशी त्याचं जीवन मनाच्या पटलावर चालू झाले होते. मोबाइलचा रेकॉर्ड सुरू केला होता. तरी संदर्भासाठी डायरीत मी लिहून घेत होतो.
पुण्यात कॉलेजची तीन वर्ष झाल्यावर नोकरीसाठी अनेक कंपन्यांच्या दारी जोडे झिजवले. शेवटी मित्राच्या ओळखीने एका कंपनीत एमआरच्या (मेडिकल रिप्रेझेन्टिटिव्ह) जॉबसाठी अर्ज केला. मुलाखत झाली... पण... पण त्यांनी तुमच्याकडे टू व्हिलर नाही म्हणून मला नोकरी नाकारली. मी निराश झालो नाही. मी त्यांच्याकडून सवलत मागितली. माझे दुस-या वर्षांचे मार्क आणि बोलणं त्यांना खूप आवडलं. त्यांनी मला दोन महिन्यांची मुदत दिली. दोन महिन्यात कुठून तरी पैसे गोळा करून आपण टू व्हिलर घेतली तर आपल्याला १० हजारापर्यंत नोकरी लागेल. आई-बाला तेवढाच आधार होईल. अजून घरात दोन बहिणी लग्नाच्या बाकी आहेत. एका बाईकने आपले पुढेच प्रश्न तात्परते तरी सुटणार होते, सुनीलच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू होता. त्याने त्यावेळेत आठ-दहा गि-हाईकांना साधा चहा दिला होता.
सेकंड हॅन्ड बाइक घ्यायची तर किमान १२ ते १५ हजार रुपये पाहिजे, घरातली परिस्थिती एकदम बिकट गावाकडं असल्याने दोन टाइम ते कसे बसे भागवत होते. त्यात माझ्या १२-१५ हजारांचं ओझं त्याच्या मोडक्या कंबरड्यावर कशाला टाकायचं म्हणून मी विचार करत बसलो. आता पर्यंत कोणाकडं हात पसरले नाहीत. त्यामुळे कर्जातून गाडी घायची नाही, ही मनाशी खूणगाठ बांधली. त्यामुळे दोन महिन्यात आपल्याला कमवायला पाहिजे हे ठरवलं, पण आपल्या शिक्षणाचा उपयोग फक्त मेडिकल क्षेत्रात मग काय करायचं हा प्रश्न पडला. पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी गावात आलो. पांडुरंगालाच सर्वांची चिंता असते आणि तोच मार्ग दाखवतो तसाच काहीसा प्रकार घडला. पैशांचा बंदोबस्त करण्यासाठी गावात गेलो असता सखारामबुवा विठ्ठल मंदिराजवळ भेटले. त्यांनी विचारपुसू केली. बुवा दरवर्षी वारीला न चुकता येतात. आळंदी ते पंढरपूर गेल्या २५ वर्षांपासून ते वारीत सहभागी होत आहेत. बोलण्या-बोलण्यात त्यांनी विषय काढला की पुढच्या महिन्यात वारीला जायचं आहे. मी माझ्या डोक्यात ट्यूब पेटली, आपण वारीत कशाची तरी गाडी लावू या. आणि बाइकसाठीचे पैसे जमवू या, मग ठरलं, चहाची गाडी लावून पैसे कमवू या.
चहाच्या धंद्यात दिवसाला हजार पंधराशे जमा होतील असा अंदाज केला. तो खरा ठरला. बाराशे रुपयांच्या आसपास धंदा होता. आळंदीपासून आता पंढरपूरपर्यंत या वारक-यांबरोबर जायचं. वारी पण होते आणि गाडीसाठी पैसे पण मिळताहेत.
अरे, पण वारीच का निवडली तू कुठेही चहाची गाडी लावू शकला असता, असा प्रश्न मी सुनीलाला टाकला.
साहेब, मला पटकन पैसा कमवायचा होता. त्यामुळे वारीचा मार्ग योग्य वाटला. मी वारीत चाललो आहे ना कुठं तमाशाच्या बारीला तर नाही जात आहेत. त्यामुळे कर्माबरोबर थोडा देवधर्मही होऊन जाईल म्हणून मी वारीत आलो आहे.
वारीत मला खूप चांगले-वाईट अनुभव आले आहे, साहेब. वारक-यांची चिकाटी आणि त्या विठ्ठलाप्रती प्रेम पाहून कोणी किती चिवट बनावे याची शिकवण मिळाली आहे. तुम्हांला सांगतो साहेब, या वारीने मला वागायला नाही तर जगायला शिकवलं आहे. ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता, हे वारकरी त्या पंढरीच्या सावळ्याला भेटायला जातात. त्यांना त्या केवळ दर्शनाची आस असते. ती ओढ मला माझ्या पुढील आयुष्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरेल, सुनीलचे हे शब्द ऐकून माझ्या अंगातून वीज जावी तसे शहारे येत होते. सुनीलचे वय असेल केवळ २२-२५ च्या दरम्यान पण त्याचे प्रत्येक वाक्य एखाद्या तत्वज्ञ किंवा खूप जीवन जगलेल्या जख्खड म्हाता-यासारखे वाटत होते. त्याच्या साधलेला संवाद हा खूप इंटरेस्टिंग होता, आणि खूप काही शिकवणारा होता.
तुला काही अडचणी आल्या का रे सुनिल, असे विकास बोचरेंनी विचारले.
साहेब, आता १८ दिवसांचा प्रवास म्हटला तर अडचणी येणारच परंतु देव आपली सत्व परीक्षा पाहतोय, हे समजून मी ही चहाची गाडी हाकत राहिलो. हडपसरला मला पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला. पण मला काही वाटलं नाही. कारण साहेब, ते त्यांच कामच होतं. आता एवढ्या गर्दीत मी माझी गाडी दामटतोय, ट्राफिक जाम झाली आहे. तर पोलिस मामांना संताप येणारच ना? त्यामुळे त्यांनी दोन-चार दांडुके माझ्या पायावर हानले. दिवेघाट चढताना जरा त्रास झाला, पण जीवनात असे लोकं फटके मारतात, तेव्हा आपण जगायचं सोडतो का. नाही ना? त्यामुळे गरम चहाच्या किटलीला फडकं लावून हिरवा निळ्या झालेल्या पायांना दिवेघाटात शेकून पुढे चालू लागलो.
सुनीलने त्याची प्रेरणादायी कहाणी सांगता सांगता स्पेशल चहा तयारही केला होता. त्याने तो स्पेशल चहा एका भांड्यात ओतला आणि वाफळेला चहा तीन कपांत ओतून आमच्यासमोर पेश केला. सुनीलच्या बोलण्याने आणि हुशारीने आम्ही तिघेही प्रभावीत झालो होतो. आमचे चहाकडे लक्ष नव्हते, तसे आम्हांला बातम्या द्यायच्या आहेत. याचेही भान राहिले नाही.
साहेब चहा घ्या, असे म्हटल्यावर आम्ही जरा भानावर आलो. चहाचे कप उचलले. तो चहा एकदम फक्कड झाला होता. सकाळपासून चालण्याने जो थकवा आला होता. यासाठी हा स्पेशल चहा मागवला होता. पण, सुनीलच्या बोलण्याने आमचा थकवा कुठेच पळू गेला होता. चहा मात्र त्यावर अजून एक सुखद धक्का होता. सुनील ज्या गोड पद्धतीने आमच्याशी बोलत होता. तसा गोडवा त्याच्या चहामध्येही होता. चहाच्या पेल्यातून त्याने जे तत्वज्ञान आम्हांला पाजले होते. ते आयुष्यभर आठवणीत राहण्यासारखे आणि प्रेरणादायी होते. सुनीलच्या संघर्षाच्या कहाणीने आपण शहरातील लोकं किती आळशी आणि परिस्थिती समोर आल्यावर रडणारे आहोत याची मला खात्री पटली. मराठी माणूसाला छोट्या कामाची लाज वाटते, असे म्हणणा-यांना सुनीलची ही चपराक आहे.
सुनीलचा मोबाईल नंबर मी त्यावेळी घेतला होता. ही कथा लिहताना त्याची आठवण झाली म्हणून त्याला फोन केला. त्याने वारीत जमलेल्या पैशातून १२ हजार रुपयांची सेकंड हँड बाईक घेतली आणि उरलेले पैसे वडिलांना शेतीसाठी दिले. सुनील आता एका बड्या कंपनीत एमआर म्हणून कामाला असून त्याने दोन वर्षांत आपल्या एका बहिणीचं लग्न केलं आहे. साहेब, अजून खूप मोठं व्हायचं, वारीनं मला वागायला नाही पण जगायला शिकवलं हे त्याचे वाक्य आजही कायम होतं.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 1, 2013, 20:26