Last Updated: Monday, November 4, 2013, 15:32
.
.
उठा, उठा... दिवाळी आली...
मोतीस्नानाची वेळ झाली...टीव्हीवरची ही जाहिरात पाहिली आणि मला आमच्या जुन्या घरांची आठवण आली... एक घर शिवडीचं आणि दुसरं परळ भोईवाड्यातलं... दोन्ही बैठी घरं... आमच्या घरी कुणी अलार्म काका यायचे नाहीत... पहाटे पहाटे भांड्यांचा आवाज सुरू झाला की, कळायचं नळाला पाणी आलंय. दिवाळीच्या दिवसात सकाळी सकाळी पाच-साडे पाचला बीएमसीच्या नळाला पाणी यायचं. तेव्हा घरात नळ वगैरे चैन नव्हती. घरासमोरच्या गल्लीत एक सार्वजनिक नळ असायचा. त्याला पाणी यायचं. मग आम्हा सगळ्या कच्चाबच्चांना बायाबापड्या धो धो नळाखाली बुचकळून काढायच्या. तीच आमची पहिली आंघोळ... उटणं वगैरे अंगाला फासून थंडगार पाण्याखाली आंघोळीला बसावं लागायचं. थंडीत कुडकुडत आंघोळ करायची... मग डाव्या पायाच्या अंगठ्यानं कारेटं फोडायचं. कडू कडू कारेट्याच्या दोन-तीन बिया खायच्या. कसंनुसं व्हायचं. एखादी बी डोक्याला लावायची. नवीन कपडे घालायचे आणि फटाके फोडायला रस्त्यावर जायचं...
एव्हाना उजाडलेलंही नसायचं. कच्चेलिंबू असल्यानं फुलबाजे, पाऊस, चक्र आमच्या वाट्याला यायचे. त्यातही ज्याच्याकडे लवंगी बार असायचा, तो मोठ्ठा. हे लवंगी बारही एकदम वाजवायचे नाहीत, तर एक एक लवंगी वेगळी काढून वाजवायची... कधी कधी लवंगी पेटायची नाही, अशा लवंग्या आम्ही गोळा करायचो... त्यांची पावडर काढायचो आणि मग ती पेपरवर घेऊन जाळायचो. ज्याच्याकडं लक्ष्मी बार किंवा डबल बार असेल तो आणखी भाव खायचा. मोठ्ठी पोरं एटम बॉम्ब फोडायची. त्यातही वेगवेगळे प्रकार असायचे. म्हणजे पिठामध्ये बॉम्ब लावायचा.. म्हणजे तो फुटल्यावर सिनेमात कशा ज्वाळा येतात, तसा फिल यायचा. काही अतिहुश्शार पोरं नारळाच्या करवंट्या घ्यायची. करवंटीच्या डोळ्यातून वात वर काढायची आणि एटम बॉम्ब फोडायचे... मला आठवतं एकदा पद्या नावाच्या एका मित्राने करवंटीत असाच बॉम्ब लावला. पण बॉम्ब काही फुटलाच नाही. म्हणून जवळ जाऊन तो बघायला गेला आणि.... आणि अचानक बॉम्ब फुटला. करवंटीचे तुकडे थेट डोळ्यात गेले. त्याचा अख्खा डोळा बाहेर आला होता... त्याला तसंच केईएममध्ये नेलं. बिच्चारा पद्या, त्याचा एक डोळा कायमचा बाद झाला...

आम्ही शिवडीला राहत असताना तिथं एक ए वन मित्र मंडळ होतं. ते दीपोत्सव साजरा करायचे. लक्ष्मीची मूर्ती आणून तिची प्रतिष्ठापना करायचे. रात्री रस्त्यावर मोठ्या पडद्यावर सिनेमा लावायचे. प्रोजेक्टर लावून. रस्त्यावर पाटावर किंवा बारदानावर बसून सिनेमा पाहण्याची गंमत असायची. सिनेमा सुरू होण्यापूर्वी ऑपरेटर फोकस एडजस्ट करायचा. त्या प्रकाशझोतामध्ये आम्ही उड्या मारून मारून, किमान आपला हात तरी पडद्यावर दिसेल म्हणून धडपडायचो. पडद्याच्या दोन्ही बाजूने सिनेमा पाहता यायचा. प्रोजेक्टरच्या बाजूने सिनेमा पाहिला की चित्र नीट दिसायचे. पण दुस-या बाजूला बसलो की, धम्माल यायची. म्हणजे हिरो उजव्या हातानं ढिश्शूम ढिश्शूम करायचा, पण आम्हाला तो डावखुरा दिसायचा. हिरोईन साडी नेसली असेल तर ती गुजरातीण वाटायची...
मी आठवीत होतो तेव्हा आम्ही शिवडीचं घर विकलं आणि परळ भोईवाड्यात राहायला आलो. तेव्हा जरा मोठा झालो होतो. नवी मित्र व्हायला वेळ लागला. पण तिथेही हळुहळु रूळायला लागलो. सुभाषदादा नावाचा एक हुश्शार मुलगा आमच्यात मोठा होता. मुलांसाठी तो घरगुती क्लास चालवायचा. त्याचा शब्द म्हणजे आमच्यासाठी अंतिम असायचा. अकरावी-बारावीचा काळ असेल. एका दिवाळीच्या सुट्टीत सुभाषदादाने नवीन टूम काढली. सुट्टीत सकाळी लवकर जॉगिंगला जायचे. त्यामुळे थोडाफार व्यायाम होईल, ही त्यामागची कल्पना. शिवाय सकाळी उजाडल्या उजाडल्या अपना बाजार समोरच्या सदाकांत ढवण मैदानात गेलं की, क्रिकेट खेळायला पीचही अडवता यायचे. सुरूवातीला चांगला उत्साह होता. पण लवकर उठणं जीवावर यायचं. सुभाषदादा अलार्मकाकासारखा प्रत्येकाचा दरवाजा ठोठवायचा. मग नाइलाजाने उठायला लागायचं. दाढी (त्याचं नाव संजय, पण एकदा खेळताना तो पडला आणि हनुवटीला टाके पडून पट्टी लावली, तेव्हापासून त्याचं दाढी नाव पडलं ते आजतागायत...) मात्र रोज न चुकता यायचा.. एन्जॉय करायला. तो जॉगिंगला एन्जॉय म्हणायचा. तर दाढी न चुकता जॉगिंगला यायचा. आम्ही सगळे मैदानाभोवती फे-या मारायचो आणि हा सगळ्यांची नजर चुकवून मैदानाच्या कठड्यावर जाऊन झोपायचा. काही दिवसांनी आमच्या लक्षात आलं की, दाढी मध्येच गायब होतो. एकदा आम्ही कारण विचारलं. तेव्हा त्याने जे सांगितलं, ते ऐकून चक्कर यायचीच बाकी होती.... हा मैदानाच्या कठड्यावर जिथं झोपायचा, तो ‘स्पॉट’ही फिक्स होता. कारण मैदानाशेजारच्या पोलीस लायनीतल्या बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरची खिडकी तिथून दिसायची... पाटकरांच्या ‘आवाज’च्या दिवाळी अंकातली ‘खिडकी चित्रं’ असायची ना, ती म्हणे त्याला तिथून अचूक दिसायची.... एक दिवस हा मार खायला लावणार, अशी आमची खात्री होती. पण दाढीचं दैव बलवत्तर, ती पाळी त्याच्यावर कधीच आली नाही.
आम्ही जिथं राहत होतो, त्या गल्लीच्या आजूबाजूच्या गल्ल्यांमध्ये मंडळ होती. एक होतं श्रीराम लेन. तिथं बहुतेक हिंदूधर्मीय शिवसैनिक राहायचे. ते रामनवमी धुमधडाक्यात साजरी करायचे. आणि दुस-या गल्लीत अंजली स्पोर्टस्.. तिथं बौद्धधर्मीय राहायचे. ते आंबेडकर जयंती दणक्यात साजरी करायचे. दोन मंडळांमधून विस्तवही जायचा नाही. अधुनमधून दोन्ही गल्लीतल्या पोरांचे राडे व्हायचे... मधोमध आमची गल्ली. आमच्या गल्लीत हिंदू आणि बौद्धधर्मीय दोघेही होते. सुभाषदादानेच मग आपणही मंडळ काढूया, अशी आयडिया मांडली. मंडळाचं नाव ठेवलं एकता मित्र मंडळ... आणि सर्वधर्म समभावाचं प्रतिक म्हणून श्री साईबाबांची प्रतिष्ठापना गल्लीच्या तोंडावर करून टाकली. म्हणजे मंदिर वगैरे नव्हतं. गल्लीतल्या पहिल्या घराच्या भिंतीवरच टाइल्स लावून साईबाबांची प्रतिमा बनवली आणि दर गुरूवारी रात्री आरती सुरू केली. आता मंडळ म्हटलं की, काहीतरी सण साजरं करणं आलंच. साईबाबा हीच आमची आयडेंटिटी असल्याने मग दिवाळीला दीपोत्सव साजरा करायचं, असं ठरलं. तेव्हापासून दरवर्षी दिवाळीच्या पहिल्या दिवशी साईपूजा हा नेमच बनला...
पण सण साजरे करणे म्हणजे काय असते, त्याचा अनुभव पहिल्याच वर्षी आला. गल्लीतून पूजेसाठी वर्गणी काढली होती. संध्याकाळी साईपूजा होती. पूजेला येणा-या पाहुण्यांना बसण्यासाठी समोरच्या मोकळ्या मैदानात डेकोरेटर्सकडून भाड्यानं आणून टेबलं-खुर्च्या लावली होती. दिवाळी असल्यानं छान रांगोळी वगैरे काढली होती. साईबाबांचा देखावाही भाड्याने आणला होता. पण काय झालं माहित नाही, पूजेच्या आधी अचानक मोठा वारा सुटला. आमचं डेकोरेशन, मंडप, सजावट सगळं बोंबललं. त्यानंतर अर्धा तास धुवाँधार पाऊस कोसळत होता. दिवाळीत सहसा पाऊस पडत नाही, पण त्यावर्षी हा पाहुणा न चुकता आला होता. तो देखील छप्पर फाड के... सगळ्या उत्साहावर पाणी पडलं. पण तरीही मुलांनी पावसाचं पाणी लोटून काढलं, ब-यापैकी साफसफाई केली. कशीबशी पूजा पार पडली. आजुबाजूच्या एरियातले लोक आवर्जून पूजेला आले. मुळात आमच्या मंडळात दहा-बारा पोरं असतानाही एवढं सगळं केलं म्हणून अनेकांनी कौतुक केलं. त्यामुळे खूप बरं वाटलं. दुस-या दिवशी गल्लीतल्या मुलांसाठी विविध स्पर्धा झाल्या. अगदी बायकांसाठीच्या स्पर्धांमध्ये बायकांनी भाग घेतला. शेवटच्या भाऊबीजेच्या दिवशी हळदी कुंकू आणि बक्षीस समारंभ झाला. स्थानिक नगरसेविका श्रद्धा जाधव आणि किडवाई मार्ग पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख साहेब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तेव्हा पत्रकारितेची नुकतीच सुरूवात झाली होती. नवीनवी नोकरी लागली होती. आमच्या कार्यक्रमाचा फोटो मी जिथे काम करत होतो, त्या दै. शिवनेरमध्ये छापून आणला. सगळी पोरं आणि गल्लीतली मंडळी खूष झाली... तिथून मग हा शिरस्ता सुरूच झाला.

पण मंडळामंडळातली असूयाही वाढू लागली. आमचं मंडळ मागून येऊन चांगलं कार्यक्रम करतं म्हणून फॉर्ममध्ये येतं होतं. ते काहींच्या डोळ्यात खुपत होतं. तिस-या की चौथ्या वर्षी आम्ही प्रश्नमंजुषा स्पर्धा ठेवली. अर्थात मीच संयोजक, सूत्रसंचालक होतो. पण त्यावेळी एका प्रश्नाच्या उत्तरावरून शेजारच्या मंडळाच्या मुलांनी गोंधळ घातला. म्हणजे त्यांना उत्तर येत नव्हतं, स्टेजच्या खालून कुणीतरी प्रॉम्प्टिंग केलं. म्हणून मी तो प्रश्नच बाद केला. तर त्या मंडळाची पोरं भडकली. अंगावर धावून आली. त्यांच्यापुढं आमच्या मंडळाचे कार्यकर्ते काहीच नव्हते. त्यात आमचा स्वभाव पडला मवाळ. या गोंधळात स्पर्धा तर बोंबललीच. पण यापुढे मैदानात कुठलाही जाहीर कार्यक्रम करायचा नाही. जे काही करायचे ते गल्लीतल्या गल्लीत असा नियम मोठ्या लोकांनी बनवून टाकला. पण गल्ली तर गल्ली... आमचा दीपोत्सव धुमधडाक्यात सुरू झाला.
कधीकधी चांगलं चाललेलं असताना हरी हरी सुचते... (हा खास परळमधला वाक्यप्रचार. त्याचा नेमका अर्थ सांगणं कठीण आहे...) कुणीतरी साईबाबांचा भंडारा घालूया अशी आयडिया सुचवली. काहींचा विरोध होता. कारण आमची मुलं काही चांगली कामाधंद्याला नव्हती. शिवाय एरियातून दुकानदारांकडून वर्गणी वगैरे जमवायची आमची ताकदही नव्हती. गल्लीतून जमा केलेल्या वर्गणीतून काय भंडारा (महाप्रसाद) घालणार? पण एकदा प्रयत्न करू, असं ठरलं. सगळे आपापल्या ऐपतीप्रमाणे कामाला लागले. पण सगळी सोंगं घेता येतात, पण पैशाचं सोंग घेता येत नाही... दिवाळीच्या दोन दिवस आधी कार्यकर्त्याँची मिटिंग झाली. भंडारा घालण्याएवढी रक्कम जमली नव्हती. तेवढे बजेट नव्हतं. भंडारा कॅन्सल करायचा, तर इज्जतचा भाजीपाला होण्याची वेळ आली... तेवढ्यात गुरू धावून आला. गुरूचा अनिल नावाचा एक मित्र होता. त्याला अन्या म्हणून सगळे ओळखायचे. तो म्हणाला, मी देतो तुम्हाला एक वर्गणीदार... भंडा-यासाठी 5 हजार रूपयांची मदत तो करेल. फक्त त्याचा एक गेट मैदानात लावायला लागेल, एवढी अट अन्याने घातली. संध्याकाळीच अन्याने 5 हजार रूपयेही आणून दिले. आमच्यासाठी तर तो देव म्हणूनच धावून आला होता. ही तर साईबाबांची कृपा म्हणून सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला. दिवाळीच्या आदल्या दिवशी आम्ही भंडा-याची तयारी करत होतो आणि अन्या टेम्पोमधून गेटसाठीचे सामान घेऊन आला. त्याने सामान उतरवले आणि आमच्या सगळ्यांचे चेहरेच उतरून गेले... कारण मैदानात जो गेट लावायचा होता, त्यावर ‘समाजसेवक सुरेश मंचेकर’ यांचा फोटो होता. सुरेश मंचेकर म्हणजे त्याकाळचा कुख्यात गुंड. तो जेलमध्ये होता, पण जेलमध्ये बसून त्याची गँग चालवत होता. अन्याही बहुतेक त्याच्याच गँगचा मेंबर असावा. सुरेश मंचेकरचा गेट पाहून आमच्या सगळ्यांचीच पाचावर धारण बसली. आम्ही नाही हा गेट लावणार, असं आम्ही अन्याला कळवळून सांगितले. तर त्याने धमकावलंच. आता गेट लावावाच लागेल. आमच्यातला एकाने तर गळ्यातली सोन्याची चैन, हातातली अंगठी काढली आणि 5 हजार रूपये परत देतो, म्हणूनही सांगितलं. पण अन्या हटूनच बसला. गेट लावला नाही तर तुमचा गेमच करतो, अशी धमकी त्याने दिली. आता काय करायचं..? सॉल्लिड ‘लागली’ होती.
कुणीतरी ही ‘टीप’ स्थानिक पोलीस स्टेशनला दिली. दोन पोलीस कधी नव्हे ते वेळेवर घटनास्थळी हजर झाले. आल्या आल्या ‘मंडळाचा अध्यक्ष सेक्रेट्री कोण हाय, पोलीस स्टेशनला चलायचं...’ त्यांनी समन्स बजावलं. सगळ्या पोरांना दरदरून घाम फुटला. गुरूच अध्यक्ष होता. पोलिसांनी त्याला बरोब्बर कोप-यात घेतलं. सुरेश मंचेकरशी तुमचा काय संबंध, केव्हापासून त्याच्या टचमध्ये आहात, कोण कोण पोरं आहेत, अशी सरबत्तीच पोलिसांनी केली. गुरूने आमचा काही संबंध नाही, वगैरे पालूपद ऐकवलं. पण पोलीसच ते... सहज विश्वास थोडाच ठेवणार आहेत. त्यांनी ‘महाप्रसाद’ द्यायला सुरूवात केली... एव्हाना गल्लीतल्या आयाबायाही पोलीस स्टेशनला पोहोचल्या होत्या. ‘आमची पोरं चांगली आहेत हो... कुणावर साधी एनसीपण नाय कधी... भंडा-यासाठी त्यांनी मदत घेतली... मंचेकरशी त्यांचा काय संबंध नाय...’ असं त्या काकुळतीला येऊन सांगत होत्या. अखेर पुन्हा अशी कम्प्लेन्ट येता कामा नये, अशी तंबी देऊन पोलिसांनी सोडलं. अन्यालाही पोलिसांनी खडसावलं. पण त्याला घंटा फरक पडणार होता. रात्रीच्या रात्री 5 हजार रूपये अन्याला देऊन आम्ही आमची उरलीसुरली मानही सोडवून घेतली. दुस-या दिवशी दिवाळीला साई महापूजा आणि महाप्रसादाचा कार्यक्रम यथासांग पार पडला. पण आदल्या रात्रीचा कार्यक्रम जास्त आठवणीत राहिला...
दीपोत्सवाच्या एका कार्यक्रमात एकदा फिश पाँडचा खेळ खेळायचं ठरलं. कुणी मनावर लावून घ्यायचे नाही, ही अट होतीच. त्यातले अनेक फिश पाँड मीच लिहिले होते. वाचून दाखवायलाही मीच होतो. गल्लीतल्या एकेका माणसावर टिच्चून टिच्चून कॉमेंट केल्या होत्या. त्यात माझ्याच वयाच्या एका मुलीवरही कॉमेंट होती. तिची शरीरयष्टी किरकोळ होती. म्हणून ‘पुढून सपाट, मागून सपाट, जसं काही गोदरेजचं कपाट...’ असा फिश पाँड लिहिला होता. कार्यक्रमाची सांगता झाल्यानंतर त्या मुलीच्या आईने मला घरी बोलवून घेतलं. एव्हाना काय वाढून ठेवलंय, याची कल्पना आली होती. मी पोरांना म्हटलं, यार माझ्याबरोबर चला... तर साला एकही सोबत आला नाही. त्या मुलीच्या आईने असे काही फटाके लावले की, तिचे शब्द अजूनही कानशीलं तापवतात. सगळ्या मूडची आयझेड झाली... मान खाली घालून गल्लीच्या तोंडावर आलो तर पोरं खो खो हसत होती. त्यांना उकळ्या फुटल्या होत्या... मग मी देखील भच्या भाषेत पोरांवर सगळा राग काढला... तर पोरं आणखीच फुटून फुटून हसायला लागली...
तारूण्यातल्या उमेदीचा तो काळ होता. गल्लीत मी आणि रोहिणी शेजारीशेजारी राहत होतो. सख्खे शेजारी, पण पक्के वैरी. म्हणजे आमच्या घरच्यांचं फारसं पटायचं नाही. या ना त्या कारणानं कुरबुरी व्हायच्या. पण आम्ही दोघे एकमेकांच्या प्रेमात पडलो होतो. घरच्यांना ही गोष्ट कळल्यावर आमच्या प्रेमात ‘दिवार’ उभी राहिली. दोघांनाही घरातून तंबी देण्यात आली. मग काय आमचा प्रेमभंग झाला... पुन्हा आमचं जुळण्याची शक्यता जवळपास नव्हतीच. रोहिणी नर्सिंग शिकण्यासाठी तीन वर्षं हॉस्टेलला राहत होती. दिवाळीमध्ये ती क्वचित घरी राहायला यायची. ती घरी आली की, माझ्या काळजाचा ठोकाच चुकायचा. कसंतरी व्हायचं. नेमके दिवाळीत मंडळाचे कार्यक्रम असायचे. रात्री प्रोग्राम संपले की आम्ही सगळी मुलं गल्लीतच झोपायचो. सतरंज्या अंथरून... एकदा भाऊबीजेच्या रात्री बक्षीस समारंभ आटोपला आणि मी देखील गल्लीतच झोपलो. दिवाळीनंतरची पहिली पहाट होती. सकाळचे सात वाजले असतील... मी जागा झालो तर समोरून चक्क रोहिणी चालत येत होती. आमचा अबोला होता. काळजात पुन्हा एकदा चर्रर्रर्रर्र... झालं. मी गल्लीच्या तोंडावर साईबाबांच्या तसबिरीजवळच उभा होता. रोहिणी जवळ आली आणि कानात काहीतरी पुटपुटली... माझा माझ्या कानांवर आणि डोळ्यांवर विश्वासच बसेना. रोहिणी खरंच बोलली की मला भास झाला? ती दुकानात गेली होती. मी तिथंच खिळल्यासारखा उभा होतो. ती परत आली, पुन्हा जवळ येऊन पुटपुटली, ‘9 वाजता परळ व्हिलेजच्या बसस्टॉपवर भेट...’ ओ माय गॉड, रोहिणी माझ्याशी बोलली. तिनं मला चक्क भेटायला बोलावलं होतं. मी एवढी वर्षे साईबाबांची श्रद्धेने पूजा केली... त्या सबुरीचंच हे फळ होतं. मी साईबाबांना हात जोडले... कारण दिवाळीला साईबाबांनी पाण्याने दिवे उजळवल्याचा चमत्कार ऐकून माहिती होता. रोहिणीने माझ्याशी पुन्हा बोलणं, हा त्या चमत्कारापेक्षा कमी चमत्कार नव्हता...
आयुष्यात एक दिवाळी मात्र कधीच विसरता येणार नाही... बारावीचं वर्षं होतं. नेमकं त्याचवर्षी वडिलांच्या कंपनीत लॉकआऊट झाला. वडिलांची नोकरी गेली, ते बेकार झाले. घरात कमवते ते एकटेच. आभाळ कोसळणं काय असतं, हे तेव्हा कळलं. पै पै करून साठवलेल्या पैशांवर कशीबशी गुजराण सुरू होती. त्यात दिवाळी आली. घरात गोडधोड करण्याचा काही प्रश्नच नव्हता. फटाके वगैरे तर खूप लांबची गोष्ट. अशी वेळ आयुष्यात कुणावरही येऊ नये. दिवाळीच्या दिवशी आजुबाजूचे सगळे मित्र नवे कपडे घालून, फटाके फोडत होते. आणि आमच्या घरी दिवाळं वाजलं होतं. शेजा-यापाजा-यांनी फराळ आणून दिला होता, पण त्यांच्याकडे द्यायला घरात साधी शंकरपाळीही नव्हती. दोन दिवस असेच गेले. परिस्थिती समजून आम्ही वागत होतो. आमची ही अवस्था, मग माझ्या आईवडिलांची काय स्थिती असेल? भाऊबीजेच्या दिवशी सकाळी माझे वडाळ्याचे काका घरी आले. संध्याकाळी काकीने तुला घरी बोलावलंय, असा निरोप त्यांनी दिला. माझा जायचा मूडच नव्हता. पण आई म्हणाली, जाऊन ये... मी गेलो. तर वडाळ्याच्या काकीने सुखद धक्का दिला. मला घेऊन ती दादरला कपड्याच्या दुकानात गेली. माझ्यासाठी नवीन पँट शर्ट तिने घेतला. मला तर रडू आवरतच नव्हते... मलाच नाही, माझ्या मोठ्या बहिणीला बाबीला आणि धाकटा भाऊ पंकूलाही तिनं कपडे घेतले... काकीचे ते उपकार कधीच फेडता येणार नाहीत. आज काकी हयात नाही. पण दिवाळी आली की, ते दिवस अजूनही आठवतात.. ते कपडे दिसतात...
मग डोळे पाण्याने भरून येतात. आताही आलेत...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 1, 2013, 22:07