.
.
‘झाडीपट्टीची मुंबई’ म्हणून ओळखलं जातं ते गडचिरोली जिल्ह्यातलं देसाईगंज वडसा हे गाव... ऐकून तुम्हाला जरा नवल वाटेल... पण हे खरं आहे... खरोखरच हे मुंबई पेक्षा काही कमी नाही... इथं गेल्यानंतरच तुमचा यावर विश्वास बसेल... मी हे असं का सांगतेय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल... याचं कारण म्हणजे दिवाळी!
दिवाळी जशी जवळ येते तसं झाडीपट्टीला वेगळंच तेज येतं. कारण इथं रंगतात झाडीपट्टीची बहारदार नाटकं... हे सगळं असलं तरी महाराष्ट्रातल्या लोककलांमध्ये अजूनही झाडीपट्टीला स्थान मिळालेलं नाही. महाराष्ट्राची लावणीच सगळ्यांना माहितीय, पण त्या व्यतिरिक्तही अनेक लोककला आहेत. त्यामुळंच विदर्भातल्या या प्राचीन कलेची.. झाडीपट्टी, तिथली नाटकं आणि ‘दंडार’ या लोककलेची माहिती देण्याचा हा छोटासा प्रयत्न... राज्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात दिवाळी उत्साहात साजरी केली जाते. या दिवाळीनिमित्तच विविध कार्यक्रम आणि लोककलाही सादर केल्या जातात. कोकणात जसं दशावताराचं महत्त्व आहे तसंच विदर्भात आहे झाडीपट्टी रंगभूमीचं...
सुरूवातीला झाडीपट्टी म्हणजे काय हे जाणून घेऊया...झाडीपट्टी... वर्धा नदीमुळं विदर्भाचे दोन भाग होतात. एक पश्चिम विदर्भ आणि दुसरा पूर्व विदर्भ... पश्चिम विदर्भाला म्हणतात वऱ्हाड तर पूर्व विदर्भ म्हणजे झाडीपट्टी... झाडीपट्टीत पूर्व विदर्भातल्या भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वर्धा आणि नागपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. या झाडीपट्टीचा उल्लेख आपल्याला पुराण काळापासून आलेला दिसतो. ‘लीळा चरित्रा’तही झाडीपट्टीचा उल्लेख आहे.
झाडीपट्टीचं नाटक आणि दंडार“आली दसरा, दिवारी, किती रोज?
केला डंडारीचा साज
माज्या गावून डंडारी गेल्या बहू
जानार माजा भाऊ”
दसरा, दिवाळी येतेय, मंडई लागेल, दंडार ( हाती दंड म्हणजेच काठी घेऊन केलं जाणारं नृत्य म्हणजे ‘दंडार’) असेल... माझा भाऊ तिथं येईल, असे भाव एक बहिण या गीतातून व्यक्त करतेय. या गीतातूनच आपल्याला दंडार आणि नाटकांचं झाडीपट्टीतलं महत्त्व दिसून येईल. म्हणूनच इथली प्रत्येक व्यक्ती दरवर्षी या दिवसाची वाट पाहत असते...सुगीचे दिवस आले, धान निघालं की इथल्या गावातल्या प्रत्येकाला वेध लागतात ते दंडारचे आणि झाडीपट्टीच्या नाटकांचे... याची सुरुवात होते ती भाऊबीजेच्या दिवसापासून... बहीण आपल्या भावाला ओवाळायला माहेरी आलेली असते. लहानग्यांपासून वृद्धांपर्यंत सगळेच जण उत्साहात असतात... त्यामुळंच मनोरंजन आणि भेटीगाठीचा हा रम्य सोहळा सुरू होतो... आणि भाऊबीजेपासून तो पुढचे दोन महिने असाच अविरत सुरू असतो. या गावावरुन त्या गावी... विविध विषय, विविध कल्पना, नृत्य, गायनाची मेजवानीच प्रेक्षकांना मिळते.
मात्र यासाठी तयारी ही दिवाळीआधीपासूनच सुरू होते. प्रत्येक गावातल्या पाटलाच्या वाड्यात दंडारसाठी लागणारं सगळं साहित्य ठेवलेलं असतं. त्यात पडदे, कलाकारांचे कपडे, दागिने इत्यादी वस्तू असतात. शिवाय स्टेजसाठी लागणारं लाकूडही असतं. ते आणून स्टेजची तयारी केली जाते आणि पडदे, वाद्य साहित्य धुवून वाळवलं जातं.
तर झाडीपट्टीची नाटकं ही एखादा निर्मात्याचं प्रॉडक्शन हाऊस जसा चित्रपट बनवतो. त्यापद्धतीनंच तयारी केली जाते. त्यात नाटकाचा डायरेक्टर, कलाकार, डान्सर या सर्वांचाच समावेश असतो. नाट्य कलाकारांची प्रत्येक टीम आपल्या विषयासह सज्ज असते.
दिवस भाऊबीजेचा भाऊबीजेचा दिवस उजाडतो आणि मंडईला सुरुवात होते. मंडई म्हणजे एक प्रकारची जत्राच जिथं दंडार सादर करणारी वेगवेगळी मंडळं येतात आणि नाटकासाठीची सुपारी घेतात. कोणत्या गावात कधी मंडई होणार हे पूर्वापर ठरलेलं आहे. त्याबाबत कोणत्याही प्रकारची जाहिरात केली जात नाही. तरीही दरवर्षी लोक तिथं हजर असतात. गावांमध्ये भरणाऱ्या या मंडईला लहानग्यांसाठी तर धमाल असते. वेगवेगळी खेळणी, खाऊ घ्यायला मुलं सरसावली असतात.
या मंडईत ठरतात त्या नाटकांच्या आणि दंडारच्या तारखा आणि गाव... कोणत्या गावी, कोणतं नाटक सादर केलं जाईल, त्यासाठी नाटक सादर करणाऱ्या ग्रुपला म्हणजेच निर्मात्याला किती पैसे मिळतील, हे ठरवलं जातं. नाटकाचा विषय आणि नाटकात असलेल्या कलाकारांवरून त्याचे दर ठरतात. एकदा नाटकाचा टाईमटेबल ठरला की मग सुरू होतो धमाल प्रवास आणि मनोरंजन...या सर्वातच भाऊबीजेची संध्याकाळ उजाडते आणि नाटकांच्या तयारीला सुरूवात होते. स्टेज सज्ज झालेला असतो. सर्व कलाकार तयार असतात. जसा चंद्र वर येतो तसं हे नाट्य रंगत जातं आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत हे सुरू राहतं.
कलाकार आणि विषय‘दंडार’सादर करण्यासाठी जवळपास ४०-५० कलाकार सहभागी होतात. त्यात सोंगाड्या, नाचे, “सामने” म्हणणार म्हणजे समोर गाणारी व्यक्ती, मागे म्हणणार म्हणजे कोरस, आसरा म्हणजेच सहकारी, पडदे धरणारा, म्हाली म्हणजे न्हावी, सीन जमवणार म्हणजे आताच्या भाषेत डायरेक्टर यांचा समावेश असतो.
तर झाडीपट्टीच्या नाटकांचंही असंच... नाटकातील मुख्य कलाकार, अभिनेता, अभिनेत्री, खलनायक, डान्सर, वादक, नेपथ्यकार, लाईट्स या सर्वांचा टीममध्ये समावेश असतो. थोडक्यात तुम्ही झाडीपट्टीच्या एका नाटकाला लाइव्ह सिनेमा असंही म्हणू शकता. कारण सिनेमामध्ये दाखविले जाणारे प्रत्येक भाव इथं लाइव्ह नाटकात दाखवले जातात. इतर लोककलांप्रमाणेच दंडार आणि झाडीपट्टींच्या नाटकांमध्ये ढोलकी, डफ, टाळ, छडी, हार्मोनियम या वांद्यासह कलाकारांच्या श्रृंगारालाही खूप महत्त्व आहे.
‘दंडार’ या लोककलेची सुरुवात गणेश वंदनेनं होते. मग विदूषक येतो हसवतो... गण-बतावणी, गोंधळ, लावणी, नाट्य अशी ही मैफल मग रंगत जाते. पूर्वाध आणि उत्तरार्ध अशा दोन अंगांमध्ये ‘दंडार’ सादर केली जाते. दंडार या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. हाती दंड म्हणजेच काठी घेऊन केलं जाणारं नृत्य म्हणजे ‘दंडार’. तर झाडीपट्टीची नाटकांचीही सुरुवात ही गणेश वंदनेनंच होते. मग नाटकाच्या विषयाप्रमाणे ते सुरू होतं. पूर्वी सांगितल्याप्रमाणं झाडीपट्टीचं नाटक म्हणजे लाईव्ह सिनेमाच असतो. यात प्रत्येक रसाचा अनुभव येतो. कधी हास्य तर कधी श्रृंगार, कधी क्रोध तर कधी प्रेम... हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळतं.
आता जसजशी पिढी बदलते चाललीय तसे नाटकांचे विषय आणि सादर करण्याची पद्धतही बदलत चाललीय. पूर्वी ऐतिहासिक आणि धार्मिक विषयांवर सादर होणारं झाडीपट्टीचं नाट्य आता सामाजिक प्रश्न हाताळू लागलंय. रामायण, महाभारत, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबतच आता स्त्री-भ्रूण हत्या, असमानता, बलात्कार, कुटुंबातले कलह, दारूबंदी, स्वच्छता अभियान, शिक्षणाचं महत्त्व या विषयांवरील मोठ्या प्रमाणात नाटकं सादर केली जातात. ‘दंडार’ या लोककलेला अनेक वर्षांची परंपरा लाभलेली आहे. पहिले मनोरंजन म्हणून सुरू झालेला हा प्रकार आज विदर्भातली लोककला म्हणून सादर केली जाते. त्यामुळं दंडार सादर करणारे कलाकार म्हणजे कोणी नामवंत कलाकार नाही तर स्थानिक ग्रामस्थ आणि स्थानिक कलाकार असतात. तसंच झाडीपट्टीच्या नाटकांचंही आहे... स्थानिक कलाकार मोठ्या संख्येनं या नाटकांमध्ये भाग घेतात. यातून त्यांना रोजगारही उपलब्ध होतो.
झाडीपट्टी नाटकांचं आर्थिक गणितझाडीपट्टीचं एक नाटक बॉलिवूडच्या एका सिनेमाला टक्कर देवू शकते, असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण बॉक्स ऑफिसवर एखादा सिनेमा जशी कमाई करतो. तशीच कमाई झाडीपट्टीचं नाटकं अवघ्या दोन महिन्यात करतात. कारण सुगीचे दिवस असतात सर्वांच्या हाती पैसा खुळखुळत असतो. शिवाय मनोरंजन करणाऱ्या कलाकारांवर पैशांची उधळण करण्याचीही आपली जुनी पद्धत आहे. दोन महिन्यात झाडीपट्टीच्या नाटकांची आणि कलाकारांची लाखोंची कमाई होते.
त्यामुळंच झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करण्यासाठी स्थानिक कलाकारांबरोबरच नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि परिसरातले प्रसिद्ध असे कलाकार भाग घेतात. मागील काही वर्षांपासून तर चक्क मराठी फिल्म इंडस्ट्रीतले नामवंत कलाकारही (उदा. गिरीश ओक, रमेश भाटकर) मोठ्या आनंदानं झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये काम करतायेत.
थंडीत कुडकुडीतही झाडीपट्टीच्या नाटकांना प्रेक्षकांची प्रचंड गर्दी असते. शिट्ट्या, टाळ्यांनी आसमंत फुलून जातो. ही नाटकं बाहेर चांदण्यांमध्ये होतात... रात्रभर ती रंगतात... आणि पहाटे-पहाटे संपतात... रात्रभर जागले असल्यानंतरही प्रेक्षकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नसतो. नाटक संपवून प्रेक्षक आनंदी होऊन आपआपल्या घरी निघून जातात. तर कलाकार आपली झोप पूर्ण करुन दुसऱ्या गावात आपली कला सादर करण्यासाठी निघून जातात. अशी रंगते ही झाडीपट्टीची रंगभूमी...
आता वळूया देसाईगंज वडसाकडे... देसाईगंज वडसाला झाडीपट्टीची मुंबई म्हटले जातं. कारण ही आहे या झाडीपट्टीच्या नाटकांची पंढरी... मोठ्या कलाकारांचे, चांगल्या विषयाचे नाटकं आपल्याला या देसाईगंज वडसामध्येच पाहायला मिळेल. याशिवाय परिसरातल्या रेंगेपार (कोहळी), सुरेवाडा, टोला, पोहरा, खोडशिवनी यांच्यासह अनेक गावांमध्ये झाडीपट्टीची नाटकं सादर केली जातात. शिवाय छत्तीसगढ आणि मध्यप्रदेशातल्या काही गावांमध्येही दंडार आणि झाडीपट्टीची नाटकं प्रसिद्ध आहेत.
इतकं सगळं असलं तरी अजूनही सरकारच्या आणि सांस्कृतिक खात्याच्या पटलावर झाडीपट्टीला योग्य ते स्थान मिळालं नाहीय. झाडीपट्टीला हे स्थान मिळावं यासाठी काही तरी प्रयत्न व्हायला हवेत. त्यातलाच हा छोटासा प्रयत्न समजा...कारण विदर्भाव्यतिरिक्त आणि काही नाट्यकलावंत वगळता झाडीपट्टी आणि तिथल्या नाटकांविषयीची माहिती कोणाला असेल, असं वाटत नाही...एकूणच काय, तर ही माहिती वाचून तरी झाडीपट्टीच्या मुंबईत एकदा तरी जाण्याची आणि तिथल्या बॉलिवूडचा अनुभव घ्यायची इच्छा कोणाला झाली तर माझ्या प्रयत्नांची ही पावतीच असेल...
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Friday, November 1, 2013, 16:32