गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग... , agricultural loss in maharashtra due to sno

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय. ऐन मार्चमध्ये अवकाळी पावसामुळं अर्धा महाराष्ट्र गारपिटग्रस्त झालाय. पाहुयात, महाराष्ट्रभरातील सध्याची स्थिती...

अहमदनगर
अहमदनगर जिल्ह्यात गारपिटीनं कहर केलाय. पिकांसह शेतकऱ्यांचं पशुधनही गेलंय. या गारपीटीत पशू-पक्षी दगावले असून फळांच्या बागा आणि भाजीपाल्याचंदेखील नुकसान झालंय. एका शेतकऱ्याच्या तब्बल १०० मेंढ्या गारपिटीमुळं दगावल्य़ा आहेत तर अनेक मेंढ्या वाहून गेल्या आहेत. यामुळं होत्याचं नव्हतं झालंय. 

काल रात्री पाथर्डी तालुक्यात जोरदार गारपीट झाल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गाय, बैल यांसह पक्षी सुद्धा या गारपीटमुळे दगावले आहे. कोट्यावधींचं नुकसान झाल्यानं बळीराजा आता सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना किमान नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

औरंगाबाद
औरंगाबाद, बीड, परभणीसह संपूर्ण मराठवाड्यात गारांचा पाऊस झाल्यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. बीड जिल्ह्यातल्या केजमधल्या रस्त्यांवर गारांचा खचाखच थर दिसत आहेत. अनेक ठिकाणी लिंब, बोराएवढ्या या गारा होत्या. पण मार्चमधल्या या प्रचंड पावसामुळे गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. परभणीमधल्या पाथरी, शेलू, मानवत, सोनपेठमध्ये गारपिटीसह जोरदार पाऊस झाला. पाथरीमध्ये मुतगल गावाला गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय. जवळपास १२ तास जिल्ह्यात पाऊस सुरू होता. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झालीत. तर उस्मानाबादमध्येही गारपिट आणि पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडलाय.

नागपूर
विदर्भातही अवकाळी पावसानं थैमान घातलंय. नागपूर जिल्हात पावसाची रिमझिम अजूनही सुरुच आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात गारपीटीचा तडाखा बसला होता. भंडारा आणि गोंदीयातही मुसळधार पावसामुळे पीक आडवी झालीय. अकोला. चंद्रपूरमध्येही मुसळधार पाऊस झाला. यवतमाळ जिल्ह्याला आठवडाभरात तीन वेळा गारपिटीचा तडाखा बसला. जिल्यात सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रातील रबी पिकाची नासाडी झाली. शासकीय आकडेवारीनुसार नुकसानीचा हा आकडा १७० कोटी रुपयांच्या घरात आहे. प्रत्यक्षात ३०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. 

विदर्भातील बळीराजा गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे हवालदिल झाला आहे. गहू, हरभरा तुडविला गेला तर संत्रा, आंबा आणि भाजीपाला पिकाची नासाडी झाली आहे. शेतकर्‍यांना जबर तडाखा बसलाय.

परभणी
परभणी जिल्ह्यात मानवत, पाथरी, सेलू, सोनपेठ या तालुक्यांना गारपिटीचा सर्वाधिक फटका बसलाय. गारपिटीत अनेक जण जखमी झालेत तर जनावरं दगावली आहेत. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातल्या २५ गावांमध्ये गारपिटीमुळे सर्वाधिक नुकसान झालंय. यात एकट्या सेलू तालुक्यातल्या १० गावांचा समावेश आहे. बळीराजाच्या हाता-तोंडाशी आलेला रब्बीचा हंगाम गारपिटीनं हिरावून नेलाय. यामुळे गहू, ज्वारी, हरभरा, ऊस, केळी, भाजीपाला, फळं, फुलं यांचं अनोतान नुकसान झालंय. विजेचे खांब कोसळल्यामुळे अनेक भागात वीजपुरवठा खंडीत झालाय.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

बुलडाणा
गारपिटीनं बुलढाणा जिल्ह्यालाही चांगलंच झोडपलंय. गारपिटीमुळं कांद्याच्या बिचाचे १०० टक्के नुकसान झालंय तर गहू, हरबरा, मका या पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. काल रात्रीसुद्धा जिल्ह्यामध्ये सर्वदूर विजांच्या कडकडाटासह चोरदार अवकाळी पाऊस झालाय. यावर्षी गावरान आंब्याला चांगला मोहर आला होता परंतु या अवकाळी पावसामुळे हा मोहर पूर्णपणे गळून पडला आहे. त्यामुळे यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळणार नसल्याचं दिसून येतंय. या पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवनही विस्कळीत झालंय.

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. या पावसामुळे शहर भागात जनजीवन विस्कळीत झालं. मात्र, पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यातल्या मिरज, विजयनगर, सावळज या भागात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातही अवकाळी पाऊस झाला. सांगली जिल्ह्यातल्या द्राक्ष बागांना या अवकाळी पावसाचा फटका मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तर कोल्हापुरात अवकाळी पावसामुळे अनेक भागातली ऊस तोडणी थांबवावी लागली.

सांगली
गारपीट आणि पावसाने सोमवारी सांगली मिरजेसह दुष्काळी भागाला चांगलंच झोडपून काढलंय. तासगाव, खानापूर, जत, कडेगाव, मिरज तालुक्यात गारपिटीमुळे १५३३ हेक्टरवरच्या द्राक्षबागांना फटका बसला. सांगलीत सर्वाधिक निर्यातक्षम द्राक्ष होतात. या गारपिटीचा फटका परिपक्व होत आलेल्या द्राक्षघडांच्या मण्यांना बसलाय. अनेक ठिकाणी द्राक्षघड तुटून खाली पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. यंदा केवळ २५ टक्के द्राक्ष निर्यात झाली आहेत. अजून ७० टक्के द्राक्ष निर्यात बाकी आहे. त्यामुळे द्राक्षबागायतदारांना बसलेला हा मोठा फटका आहे. द्राक्षासह बेदाणा उत्पादकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळे सुमारे ६५ कोटींचं नुकसान झालंय. गारपिटीमुळे डाळींब बागा उध्वस्त झाल्या आहेत. काढणीत असलेली रब्बी ज्वारी, गहू हरभऱ्याचीही हानी झालीय. पिकांच्या या नुकसानीसोबतच १३ घरांची पडझड झालीय. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू आहेत.

सोलापूर
सोलापुरातल्या सांगोला तालुक्याला गारपिटीनं चांगलंच झोडपून काढलंय. घेरडी गावात गारपीट आणि वादळाचा तडाखा बसून लहान मुलीसह एका वृद्धाचा मृत्यू झालाय. तसंच ४० मेंढ्या आणि दोन गायींचाही मृत्यू झालाय. अवकाळी पावसामुळे डाळिंबाच्या बागांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 4, 2014, 17:03


comments powered by Disqus