स्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`, Dhoni refuses to comment on spot-fixing scandal

स्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`

स्पॉट फिक्सिंग : धोनी बनला `मौनीबाबा`
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांना चुकवणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आज पत्रकारांना सामोरं जावंच लागलं. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड दौऱ्यावर निघण्यापूर्वी भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनीनं मीडियाशी संवाद साधला.

भारतीय खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी फिट आहेत, असं म्हटलंय. युवा खेळाडुंसाठी ही एक चांगली संधी असू शकेल असंही धोनीला वाटतंय. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी मीडियाला सामोरा गेलेला धोनी थोडा अस्वस्थच होता. त्यानं पत्रकार परिषद सुरू झाल्या-झाल्या पहिल्यांदाच सांगून टाकलं की ‘मी स्पॉट फिक्सिंग प्रकरणावर विचारल्या गेलेल्या प्रश्नांवर कोणतीही चर्चा करणार नाही आणि जे काही प्रश्न विचारायचे असतील ते केवळ चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलच विचारले जावेत’ अशी विनंतीही त्यानं केली.

यानंतरही पत्रकारांनी सध्या क्रिकेटचा ‘मौनीबाबा’ बनलेल्या धोनीला काही प्रश्न विचारलेच. यावर मौन बाळगत धोनीनं केवळ एक छोटंसं ‘स्माईल’ पत्रकारांना दिलं.

यावेळेला धोनीला एका पत्रकारानं आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी प्रश्न विचारला त्यावेळेस प्रवक्यानं ‘हा प्रश्न या प्रेस कॉन्फरन्स’शी संबंधीत नाही असं म्हणत टाळला. पण त्यानंतर या प्रश्नांची सरबत्तीच सुरू झाली. त्यानंतर एकानं विंदूसंबंधीत एक प्रश्न धोनीला विचारला तेव्हाही धोनी चूप्पच राहिला. त्यानं या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही.

टीम चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रवाना होतेय, काय गॅरंटी आहे की तिथं होणाऱ्या खेळात आणखी काही ‘फिक्सिंगचा खेळ’ होणार नाही? असा प्रश्नही धोनीला विचारला गेला मात्र या प्रश्नावरही धोनीनं मौनच बाळगलं.

First Published: Tuesday, May 28, 2013, 20:52


comments powered by Disqus