Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:11
www.24taas.com, झी मीडिया,मुंबईमुंबई काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ता वाहतुकीला बसला आहे. चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान मार्गावर पाणी साचल्याने हार्बरची वाहतूक बंद पडलेय. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ट्राफिक जामचा सामना सहन करावा लागत.
मुंबईतल्या लोअर परेल भागात मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलं आहे. एलफिस्टन ते चिंचपोकळी रस्त्यावर गुडघ्या एवढं पाणी साचलं आहे. त्यामुळे रस्त्यावर गाड्या बंद पडत असून ट्राफिक जामची परिस्थिती निर्माण झालीय. बीएमसीनं पंपिंग मशिन लावूनही पाणी ओसरण्याची चिन्ह नाहीत.
चेंबूर, हिंदमाता, लालबाग, मिलन सबवे, गोळीबार मैदान सांताक्रुज, शिवाजीनगर आणि सेल कॉलनी येथील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुंबईत सुरु असलेल्या संततधारेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. मध्य,पश्चिम रेल्वेच्या लोकलही २० ते ३० मिनिटं उशिरानं धावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत. त्यातच कुर्ला येथे पाणी भरल्याने हार्बर आणि मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे.
अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचल्यानं रस्ते वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा अशी परिस्थिती पहायला मिळतेय. तर दुसरीकडे रेल्वे वाहतुकीलाही पावसाचा फटका बसला असून, रेल्वे वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्यामुळे कामासाठी बाहेर पडणा-यांनाही त्रासाला सामोरं जावं लागतय.
ठाणे, नवी मुंबईत मुसळधारठाणे जिल्ह्यात तसेच नवी मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. नवी मुंबईत दुपारनंतर काही शाळा सोडण्यात आल्या. पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे.
ठाणे, नवी मुंबई परिसरातही सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. पाऊस थांबायचे नावच घेत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, July 23, 2013, 15:54