पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!, rain in western maharashtra, marathwda, vidarbh

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. काही ठिकाणी अगोदर दुष्काळानं हैराण झालेल्या शेतकऱ्यांना पावसानं थोडाफार दिलासा दिला... पण काही दिवसांतच त्यांच्या आनंदावर विरजण पसरलंय.... आता अतिवृष्टीनं शेतकऱ्यांचा घात केलाय... महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हयातल्या पश्चिम भागात पावसाचा जोर सुरुच असल्यानं धरणांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झालीय. दूधगंगा धरण शंभर टक्के भरलं असून पाच दरवाज्यातून ४२०० क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु झालाय तर राधानगरी धरणही शंभर टक्के भरलंय. धरणाचे तीन आणि सहा नंबरचे स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आलेत. त्याद्वारे पाच हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय.

धरण परिसरात सुरु असणाऱ्या मुसळधार पावसामुळं नद्यांच्या पाणी पातळीही मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरची पाणी पातळी ३८ फूट ६ इंचवर पोहचलीय. पंचगंगेची इशारा पातळी ३९ फूट इतकी आहे.

शहरातल्या जामदार क्लबजवळ पाणी आलंय. जिल्हयातले ७० हून अधिक बंधारे पाण्याखाली गेले असून कोल्हापूर - गगनबावडा मार्गावर दोन ठिकाणी पाणी आलंय.

कोयना धरणंही पूर्ण भरलंय. धरणाचे दरवाजे सात फुटांपर्यंत उघडण्यात आलेत. धरणातून ३७१११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

चंद्रपूर
चंद्रपूरमध्ये रात्रीपासून पाऊस सुरू आहे. आत्तापर्यंत १०० मिमी पेक्षा जास्त पाऊस झालाय. १५ पैकी १४ तालुक्यात अतिवृष्टी झालीय. ईरइ धरणाचे सात दरवाजे दोन मीटरनं उघडलेत. पावसामुळं चंद्रपूर शहराच्या सखल भागात पाणी भरण्यास सुरुवात झालीय.

दक्षिण गडचिरोलीच्या पाचही तालुक्यात वीज खंडित झालीय. पावसामुळं सिरोंचा शहराची तर बेटासारखी परिस्थिती झालीय. शहराला चोहोबाजूंनी प्राणहिता नदीनं वेढलंय. गेल्या चार दिवसांपासून बीएसएनएलची सेवा तसंच इंटरनेटची सेवा बंद पडलीय.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

यवतमाळ
यवतमाळ जिल्ह्यात संततधार पाऊस सुरूच आहे. गेल्या ४८ तासांत जिल्ह्यात ४५ मिमी पाऊस झालाय. यंदा वेळेवर आलेल्या पावसानं दिलासा दिला होता. मात्र, आता अतिवृष्टीमुळं इथलं जनजीवन विस्कळीत झालंय. शेतीचंही मोठं नुकसान झालंय.

जिल्ह्यातल्या आर्णी, उमरखेड आणि महागाव तालुक्यात तर पावसानं आत्ताच वार्षिक सरासरी ओलांडलीय. आर्णीत १३५ टक्के, उमरखेडमध्ये १०७ टक्के तर महागावमध्ये १०० टक्के पाऊस पडलाय. जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या तिप्पट पाऊस झाल्याची नोंद असून आतापर्यंत ८५ मिमी पाउस झालाय.

पावसाच्या तडाख्यानं शेतकरी वर्ग सर्वाधिक हवालदिल झालाय. जिल्ह्यातल्या नद्यांना तीनदा पूर येउन गेल्यानं आधीच मोठं नुकसान झालं असून आता सुरू असलेला पाऊसही पूरस्थिती निर्माण करणारा आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.


First Published: Tuesday, July 23, 2013, 16:01


comments powered by Disqus