निरोप घेताना सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या, Sachin Tendulkar`s 200th Test in Mumbai

निरोप : सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या

<B> <font color=red> निरोप : </font></b>   सचिनच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

क्रिकेटच्या मैदानावर आक्रमक असणारा सचिन तेंडुकलर आज भावूक झाला. २००वी कसोटी त्याची अखेरची होती. त्यांने आपला नैसर्गिक खेळही या कसोटीत करताना ७४ धावा कुटल्या. यामध्ये १२ फोर लगावलेत. हाच सचिन भारताने सामना जिंकल्यानंतर भावूक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रु आलेत. प्रेक्षकांची दोन्ही हात उंचावून मानवंदना स्वीकारल्यानंतर त्यांने मैदानावर सर्वांचे आभार मानताना काही क्षण थांबला. काय बोलावे तेच समजेत नव्हते. त्याला दाटून आले....डोळ्यांच्या कडा पाणावल्या...त्यानंतर सचिन बोलला.

मित्रांनों...मला बोलू द्या...मी अजूनच भावूक होईन...मी गेल्या २४ वर्षांपासून फक्त २२ यार्डमध्येच जगलो...आणि आता विश्वासच बसत नाहीए की हा प्रवास संपलाय...आज यावेळी मला अनेकांचे आभार मानायचेत...माझ्या आयुष्यात आज पहिल्यांदाच मी हा कागद जवळ ठेवलाय. या कागदावर त्या सर्वांची नावं आहेत ज्यांचे मला आभार मानायचेत...मला खात्री आहे की तुम्ही आजही मला सांभाळून घ्याल...कारण आता बोलणं जरा अवघड होतं चाललंय....

माझ्या आयुष्यातली सर्वात महत्वाची व्यक्ती, ज्यांची मला आज खूप आठवण येतेय..ते माझे बाबा....१९९९ला ते मला सोडून गेले...त्यांच्या मार्गदर्शनाशिवाय मला नाही वाटत की आज मी इथे तुमच्या समोर उभा असतो...वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं, आणि म्हणाले...'तु तुझं स्वप्न पूर्ण कर पण त्यासाठी शॉटकर्ट घेऊ शकोस...मार्ग खडतर असला तरी हार मानू नको'...मी फक्त त्यांच्या या निर्देशाचं पालन केलं..सर्वात महत्वाचं म्हणजे 'एक चांगला माणूस हो' आणि मी मनापासून त्यांची ही इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आणि यापुढेही करत राहिन...मी जे जे काही केलं, माझे बाबा माझ्या पाठिशी उभे राहिले.. आज मला त्यांची खूप आठवण येतेय...

माझी आई..मला नाही माहित माझ्या सारख्या खट्याळ मुलाला तिनं कसं सांभाळलं?...मी इतका सोपा नव्हतो...तिच्या धैर्याला माझा सलाम...कोणत्याही आईसाठी आपल्या मुलांचं स्वास्थ आणि त्यांची सुरक्षा यापेक्षा काहीच महत्वाचं नव्हतं..आणि माझी आईही तशीच...तीनं माझी खूप काळजी घेतली...गेल्या २४ वर्षांपासून मी देशासाठी क्रिकेट खेळतोय पण माझी आई त्याही आधीपासून ज्या दिवशी मी बॅट हातात घेतली त्या दिवसापासून माझ्यासाठी प्रार्थना करतेय...तिच्या प्रार्थना आणि तिचे आशीर्वाद यामुळेच मला शक्ति मिळाली आणि त्यामुळेच परफॉर्म करु शकलो... आईला माझा प्रणाम...

माझ्या शालेय जीवनात तब्बल ४वर्ष मला माझ्या काका-काकूंकडे रहावं लागलं. कारण घरापासून माझी शाळा लांब होती. त्यांनी मी त्यांच्या मुलासारखाच... खेळून, सराव करुन दमलेला मी जेव्हा घरी यायचो तेव्हा अर्धवट झोपेत असयचा अशा वेळीही काकू मला जेवण भरवायच्या...मी दुस-या दिवशी खेळावं यासाठी त्या मला भरवायच्या...ते क्षण मी कधीही विसरु शकत नाही..मी त्यांच्याही पुत्र आहे...

माझा मोठा भाऊ नितीन आणि त्याचे कुटुंबिय यांनी मला नेहमीच प्रोत्साहन दिलं..दादाला जास्त बोलण्याची सवय नाही पण त्याने मला इतकचं सांगितलं की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तु जे काही करशील ते मनापासून आणि आपलं सर्वस्व झोकून करशील...त्याचे हे शब्द कायमच माझी प्रेरणा ठरलेत.. माझी बहिण सविता तीही अशीच.. माझ्या आयुष्यातली पहिली बॅट तिनचं मला भेट म्हणून दिली होती... आणि तिथूनच माझा प्रवास सुरु झाला.. मी खेळत असताना आजही ती माझ्यासाठी उपवास करते...थँक यू...

अजित.... माझा भाऊ... त्याच्या बद्दल मी काय बोलू? आपण दोघांनी मिळून हे स्वप्न जगलंय... माझ्यासाठी, माझ्या करिअरसाठी त्यानं त्याचं करिअरचा त्याग केला.. माझ्यातला क्रिकेट स्पार्क त्यानं ओळखला आणि हे सर्व वयाच्या अकराव्या वर्षीच... तोच जो मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला आणि माझं आयुष्यच बदलून गेलं... तुम्हाला खरं वाटणार नाही पण काल रात्री त्यानं मला फोन केला आणि तेव्हाही मी बाद कसा झालो त्याबद्दलच आम्ही चर्चा करत होतो... त्याचं आणि माझं हे नातं आमच्या जन्मापासून असंच आहे... आणि ते तसंच राहिलंय.. मी क्रिकेट खेळत नसेन तेव्हाही आम्ही क्रिकेट बद्दलच चर्चा करत असतो... अनेक गोष्टींवर आमच्यात मतभेदही झालेत. त्याच्या अनेक मतांशी मी सहमत नव्हतो आणि तोही माझ्या मतांशी सहमत नसायचा... पण आज मागे वळून पहाताना मला हेच दिसतं की आमच्यात जर हे वाद-संवाद झाले नसते तर आज मी क्रिकेटर म्हणून नक्कीच कमी पडलो असतो...

माझ्या जीवनातील सर्वात सुंदर गोष्ट.. जी १९९१ला घडली, जेव्हा मी अंजलीला भेटलो... ती वेळ खूप सुंदर होती.. ती वेळ आजही तशीच आहे आणि यापुढंही अशीच राहिल... अंजली एक डॉक्टर.. तिच्याकडे करिअर म्हणून हा एक चांगला पर्याय होता. पण जेव्हा आम्ही कुटुंबाबातत चर्चा करायला लागलो तेव्हा तिनं निर्णय दिला की तु क्रिकेट खेळत रहावं आणि घराची जबाबदारी मी सांभाळते... तिच्या या निर्णयामुळं मी मुक्तपणे आणि कोणत्याही दडपणाशिवाय क्रिकेट खेळत राहिलो... अंजली, माझा राग, माझी चिडचिड, माझी नाराजी... माझं बोलणं... हे सर्व तु सहन करत आलीस... माझ्या प्रत्येक चढ-उतारात तु मला साथ दिली... तु सदैव माझ्या बरोबर राहिलीस... तुझ्या सोबतची ही पार्टनरशिप माझी सर्वोत्तम पार्टनरशिप आहे...

माझ्या आयुष्यातले दोन हिरे सारा आणि अर्जुन.. तुम्ही आता मोठे झालात.. मला या दोघांबरोबर भरपूर वेळ घालवायचा होता.. त्यांच्या प्रत्येक विशेष दिवशी मी त्यांच्या सर्व गोष्टी मीस केल्या... तरीही तुम्ही मला समजून घेतलं.. तुम्ही दोघेही माझ्यासाठी किती महत्वाचे आहात याचा तुम्ही विचारही करु शकणार नाही... गेली १४ आणि १६ वर्ष मी तुम्हाला वेळ नाही देऊ शकलो... पण यापुढचा माझा संपूर्ण वेळ तुमचाच...

माझ्या सासरकडच्यांनीही मला नेहमीच मला प्रोत्साहन दिलं... माझ्या सुख-दु:खात माझ्या बरोबर राहिले... आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी मला अंजलीशी लग्नाची परवानगी दिली... यासाठी त्यांचा मी मनापासून ऋणी आहे..

गेल्या २४ वर्षात मला अनेक मित्रांची साथ लाभली. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी मला जी साथ दिली त्याची तुलनाच शक्य नाही. माझं जीवन या सर्व मित्रांच्या ऐवजी अपूर्णचं राहिलं असतं...

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी जेव्हा अजित मला आचरेकर सरांकडे घेऊन गेला तोच क्षण माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला. गेल्या २९ वर्षांत सरांनी मला कधीच 'वेल डन' म्हंटलं नाही कारण त्यांना वाटायचं त्यांची शाबासकी मिळाल्यावर मी मेहतन घेणं सोडून देईन... पण सर यापुढं मी कोणतीच मॅच खेळणार नाही त्यामुळं आता तरी तुमच्या शाबासकिची थाप माझ्या पाठिवर पडायला काहीच हरकत नाही... क्रिकेट माझं जीवन असलं तरी माझ्या जीवनातलं तुमचं योगदान अमुल्य आहे...

मुंबईसाठी मी खेळलो तो याच एमसीएच्या मैदानावर... मला आजही तो दिवस चांगला आठवतोय.. देशासाठी खेळणं हे स्वप्न होतंच आणि माझा बीसीसीआय सोबतच्या प्रवासाला सुरुवात झाली... अवघ्या सोळाव्या वर्षाच्या असताना माझी निवड करण्यात आली. त्यासाठी त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला जो सपोर्ट दिला त्यासाठी सर्वांचेच आभार...

माझ्या कारकीर्दीत मी अनेक क्रिकेटपटूं सोबत खेळलो... ज्या सीनिअर्स सोबत मी खेळू शकलो नाही आणि ज्यांच्या बरोबर खेळण्याचं मला भाग्य लाभलं त्या सर्वांकडून खूप शिकलो... मला योग्य क्रिकेट खेळण्याची प्रेरणा मला मिळाली. त्यासर्वांबद्दल मला मोठा आदर आहे...

राहुल, लक्ष्मण, सौरव... माझे टीममेट्स तुमच्या बरोबर जो वेळ घालवला तो अविस्मरणीय असाच आहे.. ड्रेसिंग रुमचा आता मी भाग नसेन ही कल्पनाच करवत नाही... टीममधल्या माझ्या सर्व सोबत्यांना मी इतकचं सांगेन की आपण खूप नशीबवान आहोत. आपल्याला भारतासाठी खेळण्याची संधी मिळाली.. माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही यापुढेही चांगलं क्रिकेट खेळाल आणि देशाचा अभिमान वाढवाल...

माझे सर्व डॉक्टर्स, फिजिओ यांच्या मेहतनीमुळंच मी इतकी वर्ष मैदानात उभा राहू शकलो.. माझ्या एका हाकेवर ते सदैव तयार असायचे... माझ्या प्रत्येक इंज्युरीत त्यांनी माझी पुरेपुर काळजी घेतली... मला पुन्हा खेळण्यासाठी फिट केलं... त्यांचेही आभार...

मीडिया लहानपनापासूनच माझ्या पाठिशी उभी आहे... त्यांच्या पाठिंब्यामुळंच मी सतत चांगली कामगिरी करत राहिलो आणि जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्यासाठी प्रवृत्त झालो... मी तमाम फोटोग्राफर्सचेही आभार मानतो कारण त्यांनी काढलेले हे फोटोच आता माझ्या बरोबर कायम आठवण म्हणून राहणार आहेत...

मला माहित आहे मी आज खुप बोलतोय... पण मला तुमचे आभार मानल्याशिवाय इथून जाणं शक्यच नाही... जगाच्या कानाकोपऱ्यातून माझी खेळी पाहण्यासाठी, मला सपोर्ट करण्यासाठी तुम्ही नेहमीच गर्दी केलीत... भरभरुन प्रेम केलत... मी शून्यावर बाद झालो काय किंवा सेंच्युरी झळकावली काय... तुमचं प्रेमात कधीच कमतरता आली नाही... तुम्हा सर्वांशिवाय माझं जीवन अपूर्णच आहे... तुमच्या सर्व आठवणी माझ्या मनात अशाच कायम राहतील पण त्यातही तुमच सचिन... सचिन हे शब्द माझ्या अखेरच्या श्वासापर्यंत माझ्या कानात घुमत राहतील.




 
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, November 16, 2013, 16:08


comments powered by Disqus