Last Updated: Thursday, March 21, 2013, 14:49
www.24taas.com, नवी दिल्ली१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोट आणि दंगलीदरम्यान विनापरवाना शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने संजयला पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आपले संजयशी बोलणे झाले असून त्याने या शिक्षेचा स्वीकार केला असल्याचे मानेशिंदे यांनी सांगितले.
सुनावणीच्या काळात संजयने याआधी दीड वर्ष तुरुंगात काढले असल्याने त्याला आता साडेतीन वर्ष तुरूंगात काढावी लागणार आहेत. बॉम्बस्फोटात सहभाग असल्याच्या गंभीर आरोपातून संजयची मुक्तता करण्यात आली होती. मात्र, बेकायदेशीररित्या एके ५६ बंदूक बाळगल्याबद्दल त्याला नोव्हेंबर २००६ साली दोषी ठरवण्यात आले होते.
मी खंबीर राहिन – संजय दत्त निकाल जाहीर झाल्यावर संजय दत्तला अश्रू अनावर झाले. त्याने निराश होऊन आपल्या परिवाराला आलिंगन दिले. यावेळी मान्यता दत्त त्याचा हात पकडून उभी होती. ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’ अशी प्रतिक्रिया संजय दत्तनं सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर दिलीय.
१९९३ बॉम्बस्फोट प्रकरणाचा आज सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिलाय. या निकालासाठी संजय दत्तची बहिण आणि खासदार प्रिया दत्त या निकाल लागण्याआधीपासूनच सर्वोच्च न्यायालयात उपस्थित राहिल्या होत्या. संजय दत्तही चित्रीकरणात व्यस्त होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत असताना मात्र तो अस्वस्थ झाला आणि चित्रिकरण अर्ध्यावरच सोडून तो घरी परतला होता.
निकाल लागल्यानंतर मात्र संजय दत्त धीरानं पत्रकारांना सामोरं गेला. यावेळी त्यानं ‘मी खंबीर आहे आणि खंबीरच राहीन’अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याच्या चेहऱ्यावरची निराशा मात्र वेगळंच सांगत होती.
सध्या बॉलिवूडमध्ये संजय दत्तवर अडीचशे कोटींपेक्षा जास्त पैसे लागले आहेत. अनेक चित्रपटांच्या शुटींगमध्ये तो व्यस्त आहे. परंतू, येत्या चार आठवड्यांमध्ये संजय दत्तनं पोलिसांना शरण यावं, असे आदेश न्यायालयानं दिलेत. त्यामुळे संजयच्या अनेक शुटींग्स रखडण्यात येतील किंवा निर्मात्यांना पर्याय शोधावा लागणार आहे
First Published: Thursday, March 21, 2013, 14:49