भिंत (कथा), Wall

भिंत (कथा)

भिंत (कथा)
.
.




उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...

गावातील लोकसंख्या पाहता हे गाव मुस्लिम बहुल होते. पण, हिंदूही जवळपास तितकेच होते. संख्येने मुस्लिम जास्त होते. तर सधनतेच्या दृष्टीने हिंदू वर होते. हिंदूंच्या प्रचंड जमिनी कसण्याचे काम मुस्लिम शेतमजुर करत. मुस्लिम दुकानदारांचे ग्राहक बहुतांश हिंदू असत. गावात तसा एकोपा होता. पण तो किती खोलवर रुजला होता, याबद्दल शंकाच होती. गाव तसं चिरेबंदी. त्यात नदीकाठी. पुराचा धोका नेहमीचाच. गावाची वस्ती फारशी नव्हती. लहान लहान वाड्या... कौलारू घरं... कोपऱ्यातली मशीद हिच एकमेव मोठी वास्तू. पण, मंदीर म्हणावं, अशी कुठलीच वास्तू नव्हती; याची खंत बऱ्याच हिंदूंना होती. तसं म्हटलं, तर घराघरांत देवतांचं पूजन होई. कोपऱ्या कोपऱ्यांवर शेंदुर फासलेले दगड होते. जाता येता मुस्लिमही सवयीनुसार या कोपऱ्यांवरील अनामिक देवतांना हात जोडून पुढे जात. कुणालाच त्यात काही आक्षेपार्ह वाटत नव्हतं. तरीही, गावात एखादं मोठं मंदीर असावं, अशी बहुतेक हिंदूंची इच्छा होती. भजन, सत्संग यांसारखे कार्यक्रम मंदिरात व्हावेत.आपल्या पोराबाळांना घेऊन तिकडं जावं, मंदिरात भागवतांनी ऐकवलेल्या राम-कृष्णाच्या कथांमधून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत अशी हिंदू स्त्रियांची इच्छा होती. या इच्छेत वाईट काहीच नव्हतं. पण, गावात एक अवाढव्य मशीद मोठी म्हणून, त्याहून मोठं मंदीर असावं हा हट्ट का? आणि हा हट्ट माणसांचाच... देवांचा नाहीच.

मंदीर धार्मिक संस्कारांची बीजं रोवण्यासाठी असावं, कलहाची नव्हे. घराघरांत भगवद् गीता वाचली जाते, ती युद्धाचं उदात्तीकरण करायला तर नाही ना! पण जर गावात मोठं मंदीर नसेल, गाव हिंदूंचं आणि हिंदूंचंच आहे, हे कसं जणवणार? तेव्हा, मंदीर हे हवंच. ते मशिदीहून भव्यही हवं आणि मोक्याच्या ठिकाणीही हवं, म्हणजे गावात आकर्षणाचं केंद्रस्थान हे मशिदीचा घुमट नाही, तर मंदिराचा कळस हेच असावं, अशी मनातल्या मनात सुप्त इच्छांचं स्वरूप अधिकाधिक विकट होऊ लागलं होतं.

पारावरती सभा होऊ लागल्या मुस्लिमही या सभांमधअये सहभागी होत होते. पण जसजसा मंदीर बांधण्याचा विषय वादाचा होऊ लागला, तसतसे मुस्लिम कमी होऊ लागले. काही मुस्लिमांना गावात बांधल्या जाणाऱ्या मंदिराबद्दल आकर्षण होतं. मात्र, ते हळूहळू ओसरू लागलं.

मंदीर बांधायचं, पण ते कुठल्या देवाचं? हा पहिला प्रश्न उभा राहिला. “अर्थातच, शंभू महादेवाचं!... ते किती पवित्र वाटेल... ते शिवलिंग, तो दगडी नाग, ते अभिषेकपात्र... तो दुधाचा ओहोळ”, “त्यापेक्षा रामाचं मंदीर बांधू”, “त्यापेक्षा कृष्णाचं मंदीर बांधूया”

मूर्ती इस्लामला अमान्य असल्याचं मुस्लिमांना अचानक आठवलं. मंदिरावर आक्षेपही घेण्यात आला. हे आक्षेप घेणारे मुस्लिम कुठले होते, हे गावातल्या मुस्लिमांनाही माहित नव्हतं. पण अचानक एक दिवस गावातल्या मौलवी साहेबांनी म्हटले, “आम्हाला गावच्या हिंदूंशी काही देणं-घेणं नाही. त्यांनी कुणाचंही मंदीर बांधावं, आमचा त्याच्याशी संबंध नाही.”
“असं कसं बांधलं जाणारं मंदीर या गावात असणार आहे आणि मुस्लिम या गावातच राहातात. तेव्हा गावात साधा हौद बांधणं असो किंवा मंदीर... मुस्लिमांना सहभाग नसला, तरी संबंध असणारच”- हमीद म्हणाला. दुसऱ्या गावाचे लोक हमीदला शोधू लागले. “दुसऱ्या गावातल्या लोकांना आपल्या गावातल्या गोष्टींशी काय देणं घेणं?”- इसाक म्हणाला.
“दुसऱ्या गावचे मुस्लिम जे काही करत आहेत, त्यांना आपली काळजी आहे म्हणूनच. धर्म वैश्विक आहे. ते जगाचा विचार करतात. आपण फक्त वीतभर गावाचाच विचार करतात. हे चुकीचं आहे.” – सलीम म्हणाला.

इथे गणेश मंदीर बांधण्याचा निर्धार पक्का झाला. मंदीर गावाच्या एका कोपऱ्यात बांधले जाईल. तो कोपरा मशिदीच्या अगदी विरुद्ध दिशेला असणार. गावाच्या भटजींनी तसा सल्ला दिला होता. त्यासाठी त्यांनीवास्तूशास्त्राचे इतर कुणालाही न समजणारे दाखले दिले. पण त्यांच्या या न समजणाऱ्या दाखल्यांमागे जिल्ह्यातून आलेल्या राजकारण्यांचा सल्ला कारणीभूत होता.

जिल्ह्याच्या गावाहून काही मुस्लिम नेते मशिदीची भेट घ्यायला आले होते. हुक्कापाणी चालू असतानाच गावातल्या मुस्लिमांची संख्या कमी असल्याबद्दल त्यांनी काळजी व्यक्त केली. मशिदीच्या जीर्णोद्धारासाठी शासकीय मदतही देण्याचं श्वासन त्यांनी दिलं. ही बातमी ऐकून गावातल्या हिंदूंचा तीळपापड झाला. आपल्याला तर मदतीची जास्त गरज असल्याची जाणीव त्यांना झाली. आर्थिक मदत मागण्यासाठी गावातले काही हिंदू जिल्ह्याच्या गावी गेली. पक्ष कार्यालयातून आश्वासनांची देवाण घेवाण झाली. तुम्ही आम्हाला मतं द्या, आम्ही तुम्हाला मंदीर बांधून देऊ. देणगीच्या नावाने एक सौदा झाला.

मंदीर बांधलं जाऊच नये, असं अचानक मौलवीसाहेबांनी घोषित केलं. मंदीर बनणारच, अशी गर्जना हिंदूंनी केली. हे सर्व आवाज जिल्ह्यातून मिळालेल्या आश्वासनांच्या जोरावर होते. प्रश्न भिजत्या घोंगड्याप्रमाणे भिजतच पडला होता. पारावर चर्चा झडत होत्या. जिल्ह्यातील पक्षांच्या कार्यालयांना फेऱ्या चालू होत्या. बरेच दिवस, बरीच वर्षं...

भिंत (कथा)


ऑगस्ट महिना सुरू झाला होता. पावसाने चांगलाच जोर धरला होता. महापुराची चिन्हं दिसू लागली होती. मुसळधार पाऊस कधी वाढत होता, तर कधी कमी होत होता.पण थांबत मात्र नव्हता. दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांचं पाणी गावात शिरू लागलं. दूरवरचा कचरा गावच्या पाण्यात मिळून गावचं पाणी दुषित करत होता. पाण्याची पातळी प्रमाणाबाहेर वाढली. गावाची चिरेबंदी ढासळू लागली. मंदीर मशीद सगळं नंतर, पण आधी गावाची भिंत मजबूत बांधायला हवी, ही गोष्ट गावकऱ्यांना गावच्या भिंतीला भगदाड पडल्यावर जाणवली. हाहःकार माजला होता. घरच्या घरं वाहून जात होती. हिंदूची वाहिलेली काही घरं मुस्लिम मोहल्ल्यात शिरली. काही तिथेच अडकून पडली. काही मुस्लिमांच्या वाहून चाललेल्या घरांसोबत वाहत होती. त्यांच्यात मिसळून गेली होती. निघून गेली होती. गुरं वाहून गेली होती. दावणीला बांधलेली गुरं तडफडत होती. पुराची शिकार बनलेले गावचे हिंदू मुस्लिम गावातील एकमेव मजबूत वास्तूत काही दिवस मुक्कामासाठी स्थलांतरित झाले. ती वास्तू म्हणजे गावातील मशिद! प्राणांवर बेतलेलं असल्यामुळे मशिदीत आपला संसार हलवायला हिंदूंना संकोच वाटला नाही. आज सर्व गाव अल्लाच्या आश्रयाला आळंय, या गोष्टीचा मौलवीला अभिमान वाटला.

शेवटच्या आठवड्यात पाऊस पुन्हा कमी झाला, आणि शेवटी एकदाचा थांबला. आता गावापुढे नवी समस्या उभी होती. तशा त्या एका समस्येचं बोट धरून इतरही अनेक समस्या गावात शिरल्या. त्यावेळी गावची सर्व मंडळी खांद्याला खांदा लावून उभी राहिली. जिद्दीने, नव्या जोमाने... कदाचित , माणसाचं हेच रूप बघण्यासाठी पाऊस कोसळला असावा. पडलेला पाऊस, आलेला पूर, वाहून गेललेली पीकं, मोडून पडलेली घरं, पसरलेली रोगराई, इ. समस्या उभ्या होत्या. गावाची भिंत आणि एकमेकांबद्दल मनात असलेली भिंत- दोन्हीलाही भगदाड पडलं होतंच. मंदीर नंतर बांधलं गेलं तरी चालेल, मशिदही नीट होईल. पण आधी गाव उभारायला हवं. गाव नव्याने वसवायला हवं, या गोष्टीची जाणीव गावच्या प्रत्येकाला झाली.

घरं उभारण्यात हिंदू मुस्लिम एकमेकांना मदत करत होते. चौधरींच्या गोदामाची भिंत हिंदूंनी बांधून दिली. तर, पुजाऱ्याच्या घराचं बांधकाम मुस्लिम मजुर करत होते. पुजाऱ्याचं घर तर जागेवरच नव्हतं. तुळशी वृंदावन तेवढं उरलं होतं. बाकी भिंती गेल्याच होत्या. छतही राहिलं नव्हतं. दाराची चौकट मोडली होती. बरठा मूळ जागेपासून बराच दूर सरकला होता. मुस्लिम मजुरांनीच सारं पुन्हा उभारून दिलं. नव्या भिंती उभ्या राहिल्या होत्या. नवे रंग चढले होते. पण, दाराची चौकट तशीच आणि तेवढीच राहिली होती, रुंदावली नव्हती. गळक्या छताच्या जागी नवं छप्पर डोक्यावर आलं. पुजारी कौतुकाने हे छत पाहात बसला होता. मशिदीच्या छताखाली काही दिवस काढल्याने आपण भ्रष्ट झालो असल्याची जाणीव आता पुन्हा होऊ लागली.

अल्लाच्या आश्रयाच्या आलेले लोक किती नशिबवान होते. याचा हिशेब मौलवी करत होते. त्याच्या आश्रयाला आल्यावरच कसे प्राण वाचू शकतात, याची जाणीव हिंदूंना झाली असेल, असे मौलवींना वाटत होते. आता हिंदू मंदीर बांधण्याचा ह्ट सोडून कायम अल्लाच्या आश्रयालाच कसे येतील, याचा विचार मौलवी साहेब करत होते. जिल्ह्यातील समितीने प्रत्येक धर्मांतरामागे इनाम देण्याची छुपी हमी दिली होतीच. हिंदू धर्मांतराला सहज तयार होतील, अशी मौलवींना खात्री होती...

****
चिखलाने भरलेल्या रस्त्यातून झपझप पावलं टाकत घाबरलेले मौलवी शकीलच्या घरात शिरले. भांबावलेल्या नजरेने इकडे- तिकडे पाहात होते. काहीतरी गहजब घडल्याचं मोहल्ल्यात जाणवू लागलं. हळूहळू सर्व मोहल्लाच शकीलच्या घरात जमा झाला. कसब्यातील कुणाही हिंदूच्या कानावर घडला प्रकार कळू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली होती. चुकूनही हिंदूंना घडल्या प्रकाराचा सुगावा लागू देऊ नका, म्हणून सर्वांना अल्लाची कसम खिलवण्यात आली होती.

संपूर्ण मोहल्ला शांत बसला होता. घडलेल्या घटनेवर कुणाचा विश्वास नव्हता. जेवण्या-खाण्याची शुद्धही कुणाला राहिली नव्हती. लहान मुलांची चुळबूळ थांबवून त्यांना जबरदस्तीने झोपावलं होतं. शकीलच्या घरात स्मशानशांतता पसरलेली होती. गळक्या छपरातून गळणारे थेंबच काय तो आवाज निर्माण करत होते. शांततेला एका ठराविक लयीमध्ये ओरखाडे पडत होते. ओल लागलेल्या भिंतीवर पाण्याचे विचित्र आकार दिसत होते. तंद्री लागलेले मौलवी शून्य नजरेने त्याच आकारकडे पाहात होते. पण, त्यांना भीती वाटत होती ती वेगळ्याच आकाराची.

पहाटेची बांग देण्यासाठी गेलेले मौलवी साहेब मशिदीतल्या भिंतीसमोर बसले. मिहराबसमोर सजद्यासाठी झुकले होते. उठून अंधुक प्रकाशात त्या भिंतीतीकडे त्यांनी पाहिले आणि त्यांना धक्काच बसला. ते भिंतीकडे पाहातच राहिले. “तौबा! तौबा!” तोंडून शब्द अभावितपणे निघाले. जीर्णोधार व्हावा म्हणून जिल्ह्यातील नेत्यांकडे कितीवेळा मदत मागितली, याचा हिशेब चुकला असावा. पूर, पावसामुळे भिंतीला ओल धरली होती. पोपडे पडले होते. त्यांतून जो चित्र विचित्र आकार पैदा झाला होता, तो अविश्वसनीयच. तृकारण, त्या काराला एक अर्थ प्राप्त झालेला होता. खुद्द मौलवींच्या नजरेनेच तो प्राप्त करून दिला होता.

भरपूर पडलेल्या पावसामुळे ओल लागलेल्या भिंतीवर असा आकार निर्माण होणं विचित्र नाही. त्यात काय विशेष? असे आकार आपल्याला हव्या त्या गोष्टींचे भास निर्माण करण्याची मुभा देतात... शक्ती देतात... कल्पनाशक्ती. पृथ्वीवरील आकार, आकाशातील ग्रह-ताऱ्याच्या समुहाचे आकार... त्या वस्तूंना काहीही फरक पडत नसतो. पण आपली कल्पनाशक्ती आपल्याला स्वस्थ बसू देत नसते. आपण या आकारांवर अनेक अर्थ लादतो. याच शक्तीने देवांना जन्म दिला असावा. पण, या शक्तीला, ही शक्ती धारण करणाऱअया समुहाला जन्म कुणी दिला? अंधारातल्या सावल्या, आकाशातील तारे, झाडांचे आकार याच प्रतकात्मक खेळांचे भाग आहेत. मशिदीच्या त्या भिंतीवर उमटलेला आकारही असाच होता. ते आशीर्वादासाठी उठलेले हात, पद्मासनातील दोन मांड्या, कोपऱ्यात बसलेला छोटासा उंदिर, सुपासारखे कान आणि सर्वांत महत्वाची ती सोंड... सर्व काही हुबेहुब दिसत होतं त्या आकारात. हा आकार भासत होता, तो चक्क गणपतीचा...

याच गोष्टीमुळे मोहल्ल्यात खळबळ माजली होती. मौलवींनी तर भिंतीचा धसकाच घेतला होता. कितीही लपवायचं म्हटलं, तरी गोष्ट लपून थोडीच राहाणार? हिंदूंच्या वस्तीत बातमी केव्हाच पसरली होती. मशिदीच्या बाहेर चमत्काराला नमस्कार करण्यासाठी भाविकांची रीघ लागली होती. मशिदीत हिंदूंची एवढी गर्दी तर महापूराच्या दिवसांतही झाली नव्हती. आज माणसांचाच महापूर जाणवत होता. वाढत होता. आसपासच्या गावचे लोकही या तीर्थक्षेत्राला भेट देण्यास येऊ लागले. “गणेश मंदीर बांधण्याच्या कामात केलेल्या कुचराईचा हा दैवी प्रकोप आहे.” असं भटजी ओरडून सांगू लागले. मशिदीत आश्रय घेऊन भ्रष्ट झाल्याची भावना असलेले भटजीबुवा आता आपल्याच मशिदीतील प्रवेश केल्यामुळेच पावन झालेल्या मशिदीत गणपती अवतीर्ण झाल्याचं वक्तव्य करू लागले.

आपण हिंदूंना आश्रय दिला आणि त्यांनी मशिदच भ्रष्ट केली, अशी भावना मुस्लिमांमध्ये निर्माण केली गेली. जिल्ह्यातून आलेल्या नेत्यांनी या बावना अधिकच भडकावल्या. “मशीद आपली आहे. ती हिंदूंनी भ्रष्ट केली. लवकरच आमचा पक्ष सत्तेवर येईल, तेव्हा या मशिदीची डागडुजी करण्यासाठी शासनातर्फे पैसा पुरवला जाईल.” असे मुस्लिम नेत्यांनी भाषणात सांगितले. डागडुजी म्हणजे गणपतीवाल्या भिंतीवर चुना फासून हिरवा रंग दिला जाणार असल्याचा समज हिंदूंचा झाला. हिंदू नेते गावात प्रक्षोभक भाषणं देऊ लागले. “इतिहासात आपली अनेक मंदिरं मुसलमानांनी भ्रष्ट केली आहे. आपण त्याचा बदला घेतला नाही, म्हणूनच साक्षात देवानेच बदला घेतला आहे. आता ही मशीद ही मशीद न राहाता मंदीर बनलं आहे. आम्हाला निवडून दिलं, तर आम्ही या मंदिरावर कळस चढवू. दीपमाळ बांधू.” हिंदू नेते तावातावाने भाषणं देत होते. आपल्या पाठिंब्यासाठी हिमालयातील साधू संन्यासी घेऊन आले. हे साधू मशिदीत शिरले. भिंतीवरील गणपतीला शेंदूर फासला. बाहेर येऊन ही मशीद आता हिंदूंची झाल्याची ग्वाही देऊ लागले. हे संन्यासी कुठल्याही सामान्य माणसाला अपल्या जवळही येऊ देत नव्हते. फक्त शौकतच्या पान-बिडी शॉपवरून चलीम भरून घेतली, आणि महायज्ञ करण्यासाठी तीर्थक्षेत्री रवाना झाले.

आज भिंतीला चुना फासण्यात येणार असल्याची आवई हिंदू वस्तीत उठली. भिंतीला शेंदूर फासल्याची बातमी मोहल्ल्यात याधीच पसरली होती. मशीद जर पाक राहिली नसेल, तर ती नेस्तनाबूत करण्याचा सल्ला काहीजण देऊ लागले. आता या मशिदीत मुस्लिमांना प्रवेश वर्ज्य करण्यात आला. मुस्लिमांनी या मशिदीत शिरू नये, यासाठी हिंदू तरुण दारात उभे राहू लागले. आयतंच मंदिर बनलंय, ते कशाला सोडा? शेंदूर फासल्याने तो आकार कायमस्वरुपी एका रात्री मशिदीची जबाबदारी घेतलेल्या हिंदू तरुणांची हत्या झाली. बाहेरून कुमक मागवण्यात आली. मग मात्र गावात रक्ताचा महापूर आला. घरं फोडण्यात आली. वस्त्या जाळण्यात आल्या. शेतांना आगी लावण्यात आल्या. हिंदूंची शेतं जाळणाऱअया मुस्लिमांना हे समजत नव्हतं, की उद्या आपण मजुरी कुणाच्या शेतावर करायची? पोट कसं भरायचं? मौलवींना भोसकण्यात आलं. भटजीबुवांना जिवंत जाळण्यात आलं. त्यांच्या संबंध घरालाच आग लावली गेली. मोहल्ला जाळण्त आला. दिसेल त्या माणसाला मारण्याचं सत्र आरंभलं गेलं. तलवारी, सुरे, खंजीर, त्रिशूळ... सर्वांनाच धार चढली होती. रक्ताची तहान लागली होती. संपूर्ण गाव धुराच्या छायेत धुमसू लागलं आणि त्याच धुरात संपूर्ण गाव अदृश्य होऊन गेलं.

निवडणुकांमध्ये तिसराच पक्ष विजयी झाला. बाकी पक्षांनी पुढील निवडणुकांचे आराखडे बांधायले सुरूवात केली. एक सबंध गावच जागेववर न राहिल्याने एक मतदानपेटी कमी झाली, त्यामुळेच दंगलग्रस्तांना मदत करूनही तेथे जिंकू शकलो नाही, असं डिपॉझिट जप्त झालेले उमेदवार पराभवाचं स्पष्टीकरण देत होते.

अजूनही गावात चार दोन कुटुंब शिल्लक असावीत. त्यांना हा सर्व इतिहास तोंडपाठ असेल. रक्ताने शिंपडलेल्या जमिनीतून खंजिरच जन्म घेणार. येणाऱ्या भावी पिढीचा या इतिहासाशी प्रत्यक्ष संबंध नसेल कदाचित. पण, शहाणपण येण्याइतकी बुद्धी तरी असावी. अन्यथा, रक्ताळलेल्या गर्भातून जन्मलेली पिढी रक्तालाच चटावेल. पुढची पिढी शहरातच स्थायिक होतेय.
निसर्गाने आणलेल्या महापुराच्या आपत्तीने माणसांचं जेवढं नुकसान केलं नव्हतं, तेवढं माणसाने स्वतःहून स्वतःचं केलं. महापुरात एकत्र येऊन, मेहनत करून उभारलेलं गाव, उभारल्याच न गेलेल्या मंदिराच्या कारणावरून जाळून टाकलं. गाव अगदी रांगेत जळालंय. पेटते निखारे विझतील का? निसर्गानेच देव एक असल्याचा साक्षात्कार भिंतीवर घडवायचा प्रयत्न केला असावा. माणसांनी एका भिंतीपायी गावच उध्वस्त केलं. भिंत ना शेंदरी राहिली, ना हिरवी... गाव रक्ताने लाल झालंय. हल्ली या गावात माणसाचा मागमुस सापडत नाही. सर्व घरांचे अवशेष पडून आहेत. एकाच रांगेत विखुरलेत. भिंती ढासळल्या आहेत. धूर येतो आहे. माणूस निसर्गाहूनही विकृत वागू शकतो, याची साक्ष उध्वस्त गाव देतंय.

उध्वस्त गावाच्या भग्न घरांच्या रांगेतून, जरा पुढे, त्याच त्या कोपऱ्यात ‘ती’ भिंत विषण्णपणे उभी आहे. उन्हा-पावसात कणा कणाने ढासळत आहे... निसर्ग नियमानुसार...

First Published: Saturday, November 2, 2013, 19:35


comments powered by Disqus