Last Updated: Monday, March 11, 2013, 18:51
www.24taas.com, पिंपरी-चिंचवडराष्ट्रवादी काँग्रेसकडून 145 जागांवर दावा ठोकणा-या वसंत वाणींना शरद पवारांनी समज दिल्यानंतर त्यांनी आपल्या तलवारी म्यान केल्यात. पण तरीही दादांनी मुख्यमंत्री व्हावं हा आपला आग्रह मात्र त्यांनी कायम ठेवलाय.
राष्ट्रवादीचे नेते वसंत वाणी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस 145 जागांवर दावा सांगणार असं जाहीर करुन एकच खळबळ उडवून दिली होती. इतकंच नव्हे तर अजितदादांनी मुख्यमंत्रीही बनावं अशीही वाणींनी थेट मागणी केली होती. या वक्तव्यांची दखल दस्तुरखुद्द शरद पवारांनी घेत वाणींची योग्य पद्धतीने झाडाझडती घेतली. त्यामुळे वाणींनी तलवार म्यान करत माध्यमांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सावरासावर केलीय.
अध्यक्षांचा शब्द अंतिम असला तरी अजितदादाच मुख्यमंत्री बनावेत हीच आपली इच्छा असल्याचं वाणींचं म्हणणं आहे. निवडणुका अजून वर्षभर लांब असल्या तरी आत्तापासून जागावाटप आणि दाव्यांचं राजकारण रंगू लागलंय...त्यामुळे शाब्दिक टोलेबाजीतून नेमका अर्थ काय काढायचा हे सांगणं सध्या तरी अवघड आहे...
First Published: Monday, March 11, 2013, 18:51