एका झंझावाताची अखेर, Munde died of multiple internal injuries, cardiac arrest, says post-mortem repo

एका झंझावाताची अखेर

एका झंझावाताची अखेर

प्रकाश दांडगे, सिनिअर प्रोड्युसर, झी २४ तास

नाथ्रा ते पुणे एक खडतर प्रवास

बीड जिल्हातील एक छोटसं गाव नाथ्रा ते देशाची राजधानी नवी दिल्ली..
जिल्हा परिषद सदस्य, आमदार, राज्याचा उपमुख्यमंत्री, खासदार आणि अखेर केंद्रीय ग्रामिण विकास मंत्री...
एका गरिब शेतकरी कुटुंबात जन्मलेला मुलगा ते अवघ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला लोकनेता...
हा प्रवास आहे गोपीनाथ पांडुरंगराव मुंडे नावाच्या एका संघर्षमय व्यक्तिमत्वाचा....
हा प्रवास नियतीच्या एका फटक्यानं संपलाय....
एका उमद्या नेत्याची करुण अखेर झालीय....

१२ डिसेंबर १९४९...
नाथ्रा या गावात एका शेतकरी कुटुंबात गोपीनाथ मुंडे यांचा जन्म झाला...
परळी तालुक्यातील हे एक दुष्काळी गाव...
याच गावानं दिला गोपीनाथ मुंडे नावाचा एक झुंझार नेता...
वडिल पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई यांनी परिस्थितीशी संघर्ष करत मुलांना जिद्दीनं शिकवलं... वडिलांचा १९६९ मध्ये मृत्यू झाल्यानंतर मोठे भाऊ पंडितअण्णांनी लहानग्या गोपीनाथला आधार दिला... पुढे शिकवलं...

हाच होता गोपीनाथ मुंडेंचा संघर्षाचा काळ.. याच दिवसांनी त्यांच्यातला लोकनेता घडवला...
सर्वसामान्य कष्टक-याचं दु:ख दुर करण्याची प्रेरणा गोपीनाथ मुंडेंना दिली ती याच संघर्षमय दिवसांनी...
जेमतेम 500 घराचं नाथ्रा गावं...इथल्याच एका झाडाखाली भरणा-या जिल्हा परिषदेच्या शाळेत गोपीनाथ मुंडे शिकले... परिक्षा देण्यासाठी 12 किलोमिटर चालत जावं लागायचं असे ते दिवस गोपीनाथ मुंडेंना नेहमी आठवत असत.. पुढच्या शिक्षणासाठी मग लगानग्या गोपीनाथ मुडेंना परळीच्या जिल्हा परिषद शाळेत पाठवण्यात आलं.. इथं त्याचं अनुभव विश्व अधिक विस्तारलं... परळीच्या आर्य समाज मंदिरात ते नेहमी जात. इथचं विविध धर्मांचा त्यांनी अभ्यास केला. पुस्तकं आणि वर्तमानपत्र वाचनाची गोडी गोपीनाथ मुंडेंना लागली ती परळीतच.

मग मुंडे कॉलेज शिक्षणासाठी अंबाजोगाईत दाखल झाले. इथं ख-या अर्थानं गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाचा जन्म झाला... कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले गोपीनाथ मुंडे विद्यार्थी चळवळीत सक्रीय झाले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी त्यांनी आंदोलनं केली... कॉलेज निवडणुकांमध्येही त्यांनी भाग घेतला पण निवडणुक मात्र लढवली नाही...

अंबाजोगाईतल्या कॉलेज दिवसांमध्येच त्यांची भेट झाली ती प्रमोद महाजन नावाच्या एका उमद्या तरुणाशी... ही साथ पुढे खुप बहरली... प्रमोद महाजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे तालुका सचिव होते... हा काळ होता 1970 चा...प्रमोद महाजन यांच्या आग्रहावरुन गोपीनाथ मुंडे नावाचा तरुण संघ परिवारात दाखल झाला आणि ही साथ अखेरपर्यंत टिकली...
विद्यार्थ्यांची आंदोलनं... ग्रामीण भागातील मुलांसाठी संघर्ष... संघांची शिस्त आणि नेतृत्वाची पायाभरणी... गोपीनाथ मुंडें नावाचा नेता आकाराला येत होता...

1971 च्या लोकसभा निवडणुकीत बीड लोकसभा मतदारसंघात जनसंघाच्या उमेदवारासाठी गोपीनाथ मुंडे प्रचारात उतरले.. ही त्यांच्या राजकीय जीवनाची सुरवात होती...गोपीनाथ मुंडे नावाचा हा उमदा तरुण संघ नेतृत्वानं अचुक हेरला होता...गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाला संघाच्या शिस्तीत आकार यायला लागला होता...

1997 मध्ये पुण्यात ऱाष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिक्षा वर्गात मुंडे गेले. इथंचं संघाची विचारधारा, संघाची शिस्त आणि देशसेवेची दिशा गोपीनाथ मुंडेंना मिळाली....

बीड नंतर पुण्यानं गोपीनाथ मुंडेच्या जडणघडणीत मोठा हातभार लावला.. एका ग्रामीण भागातील तरुणाला पुण्यानं नव्या जगाची ओळख करुन दिली... नेतृत्वाला दिशा दिली....

पुण्यातल्याच आयएलएस लॉ कॉलेजला गोपीनाथ मुंडेंनी प्रवेश घेतला. इथंच त्यांची भेट झाली ती विलासराव देशमुख या लातूर जिल्हातील बाभळगावच्या तरुणाशी... पुढे राजकीय वाटा वेगळ्या असल्या तरी विलासरावांशी कॉलेजमध्ये जुळलेली मैत्री गोपीनाथ मुंडेंनी आयुष्यभर जपली...

पुण्यात कायद्याचे शिक्षण घेत असतांनाच संघाच्या कामात मुंडेंचा सहभाग वाढत होता..पुण्यातील मोतीबाग या संघाच्या पुण्यातील मुख्यालयातही गोपीनाथ मुंडे वर्षभर होते. समर्थ शाखेचे मुख्य शिक्षक आणि नंतर चाणक्य शाखेचे कार्यवाह, संभाजी नगर मंडळ कार्यवाह अशी बढती गोपीनाथ मुंडेंना संघात मिळत गेली. याच काळात गोळवलकर गुरुजी, अटल बिहारी वाजपेयी, श्रीपती शास्त्री यांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्वांचा मोठा प्रभाव गोपीनाथ मुंडेंवर पडला..पुण्यातील महाविद्यालयीत तरुणांचे नेतृत्वही मुंडेंकडे आलं. याच काळात एका नव्या वादळानं गोपीनाथ मुंडेंना झपाटून टाकलं होतं.. 1974 ला जयप्रकाश नारायण यांच्या नवनिर्माण आंदोलनानं देश पेटून उठला होता.. जयप्रकाश नारायण यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध संपूर्ण क्रांतीची देशव्यापी मोहिम उभारली होती..इंदिरा गांधींच्या कारभाराविरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी एल्गार पुकारला होता...

गोपीनाथ मुंडे नावाच्या लढवय्या तरुणानं जयप्रकाश नारायण यांची हाक ऐकली नसती तरच नवलं होतं...जयप्रकाश नारायण पुण्यात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला गोपीनाथ मुंडे पुढे होते.. जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या
आंदोलनात गोपीनाथ मुंडेंनी झोकून दिलं होतं...
गोपीनाथ मुंडेंच्या मनात संपूर्ण क्रांती मशाल जेपींनी चेतवली होती...
वर्ष 1975.. इंदिरा गांधींनी देशात आणिबाणी लागू केली... लोकशाहीची पायमल्ली करणारा कालखंड देशात सुरु झाला होता.. गोपीनाथ मुंडे लॉच्या तिस-या वर्षाला होते... इंदिरा गांधींनी जयप्रकाश नारायणांसह सर्व ज्येष्ठ नेत्यांची धरपकड केली होती...

गोपीनाथ मुंडे यांनी आणिबाणीला प्रखर विरोध करत आंदोलनात उडी घेतली... त्यांना मार्गदर्शनं करत होते संघाचे ज्येष्ट नेते वसंतराव भागवत... प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या झंझावाती भाषणांनी महाराष्ट्र हादरवरुन सोडायला सुरवात केली होती... संघ नेत्यांच्या आदेशानुसार गोपीनाथ मुंडे यांनी औरंगाबादमध्ये आणिबाणीविरोधी आंदोलन तीव्र केलं. याच काळात ते भूमिगतही झाले... प्रमोद महाजन तर संपूर्ण मराठवाडयाचं नेतृत्व करत होते.. इंदिरा सरकारनं दडपशाही करत प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेंसह सर्व ज्येष्ट नेत्यांना अटक केली...

नाशिकचा सेंट्रल जेल हा जणू आणिबाणीविरोधी नेत्यांची पंढरीच बनला होता...
नाशिकच्या सेंट्रल जेलमध्ये काढलेले 16 महिने हा होता गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय जीवनातला टर्निग पाँईंट... जुलमी राजकीय व्यवस्था उलथून टाकण्यासाठी राजकीय जीवनात सक्रीय होण्याचा गोपीनाथ मुंडेंचा निर्धार याच काळात पक्का झाला होता..तुरुंगात संघाच्या सर्व ज्येष्ट नेत्याचं मार्गदर्शन आणि बौद्धिकं यामुळं मुंडेंची राजकीय परिपक्वता वाढली होती.. राज्यभरातून जवळपास 2000 राजकीय कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्याची संधी गोपीनाथ मुंडेंना आणिबाणीतल्या कारावासानं दिली...मोहन धारिया, बाबा भिडे, प्रमोद महाजन, बापुसाहेब काळदाते यांच्यासह कितीतरी कार्यकर्त्यांची गोपीनाथ मुंडेंशी घट्ट जवळिक झाली ती याच काळात...

आणिबाणीतल्या संघर्षानं गोपीनाथ मुंडेचं नेतृत्व घडवलं, अधिक परिपक्व केलं..... लोकनेता गोपीनाथ मुंडेंच्या प्रवासात आणिबाणीतल्या दिवसाचं स्थान महत्वाचं आहे.. कारण याच दिवसांनी घडवला गोपीनाथ मुंडे नावाचा एक आयुष्यभर संघर्ष केलेला नेता...


एका झंझावाताची अखेर

आणीबाणी ते सत्ता
1975 ते 1977 हा होता गोपीनाथ मुंडे यांच्या जडणघडणीचा काळ..आणिबाणीविरुद्ध देश जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आक्रमक झाला होता..अखेर जनतेच्या रेटयासमोर इंदिरा गांधींना नमावं लागलं आणि आणिबाणी मागे घेतली गेली..नाशिकच्या जेलमध्ये अटकेत असलेले गोपीनाथ मुंडे बाहेर पडले तेव्हा एका झंझावाती नेतृत्वाचा जन्म झालेला होता..1977 च्या लोकसभा निवडणुकीत गोपीनाथ मुंडेंनी जनता पार्टीचा प्रचार करत अवघा महाराष्ट्र पिंजुन काढला..इंदिरा काँगेसचा 1977 च्या लोकसभा निवडणुकीत धुव्वा उडाला आणि जनता सरकार सत्तेवर आलं...

रस्त्यावर उतरुन पक्षासाठी संघर्ष करणारा हा नेता लोकांमधून निवडून जायला हवा अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली होती...गोपीनाथ मुंडेंना रेणापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुक लढवण्याचे आदेश 1978 मध्ये पक्षानं दिले... अवघ्या 1100 मतांनी मुंडे ही निवडणूक हरले याची चुटपुट कार्यकर्त्यांना लागून राहिली...

पण विजयाची आनंद व्यक्त करण्याची संधी कार्यकर्त्यांना लगेच मिळाली..1978 ला झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गोपीनाथ मुंडे विजयी झाले... ही पुढच्या विजयी प्रवासाची जणू नांदी होती....
दोनच वर्षांनी 1980 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत रेणापूर मतदारसंघातून गोपीनाथ मुंडे निवडून आले आणि पहिल्यांदा आमदार झाले... राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेत त्यांनी विरोधकांचा पराभव केला होता...
याच काळात भारतीय जनता पार्टीचा जन्म झाला आणि युवा मोर्चाचं राज्य अध्यक्षपद गोपीनाथ मुंडेंना देण्यात आलं...गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाला विस्तारण्यासाठी एक नवं आभाळ मिळालं होतं..पुढे एकापाठोपाठ एक नव्या जबाबदा-या गोपीनाथ मुडेंच्या वाटयाला येत गेल्या..1982 मध्ये राज्य भाजपच्या सचिवपदाची जबाबदारी गोपीनाथ मुंडेंना देण्यात आली.. पुढे महासचिवपदी बढती मिळाली.

1986 मध्ये गोपीनाथ मुंडे राज्य भाजपचे अध्यक्ष झाले...या काळात मुंडे-महाजन जोडीनं महाराष्ट्र पिंजुन काढला. आज राज्यभर विस्तारलेल्या भाजपची पायाभरणी महाजन-मुंडेनी त्यावेळी केलेल्या कामात आहे...वसंतराव भागवत आणि उत्तमराव पाटील यांचं मार्गदर्शन आणि प्रमोद महाजन याचं सहकार्य यामुळं गोपीनाथ मुडेंचं नेतृत्व फुलतं चाललं होतं... शेतकरी शेतमजुराचे प्रश्न, दुष्काळी भागातील जनतेच्या हालअपेष्टा यासाठी गोपीनाथ मुंडे अथक संघर्ष करत होते..आंदोलनं, मोर्चे, बैठका आणि कार्यकर्त्यांशी सतत संवाद...मुंबई, नागपूरपासून गावागावापर्यंत गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष सुरु होता... एक लोकनेता आकाराला येत होता... 1988 ला राज्य भाजपच्या अध्यक्षपदी गोपीनाथ मुंडेंची फेरनिवड करण्यात आली.. राज्य भाजप गोपीनाथ मुंडेंच्या घणाघाती नेतृत्वाखाली आक्रमक होत होता.. गोपीनाथ मुंडेंना वेध लागले होते ते राज्यातील सत्ता हाती घेण्याचे...पण राजकीय ध्येयासोबतच गोपीनाथ मुंडेंचं सामाजिक भानही जागृत होतं... मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर असो की प्रादेशिक विकासाचा असमतोल.. गोपीनाथ मुंडे सर्वत्र जनतेसोबत लढण्यासाठी पुढे होते.. राज्यातला प्रत्येक तालुक्यात कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संपर्क असलेला लोकनेता अशी सार्थ ओळख गोपीनाथ मुंडेची झाली होती.

जनतेशी घट्ट नाळ जुळलेला नेता कसा असतो याचं दर्शन महाराष्ट्राला होत होतं...राज्यात भाजपची ताकद वाढत होती. 1990 च्या निवडणुकीत भाजपचे 42 आमदार निवडून आले आणि विधीमंडळात त्याचं नेतृत्व करण्याची जबाबदारी गोपीनाथ मुडेंना देण्यात आली... एक वर्षानंतरच 12 डिसेंबर 1992 ला गोपीनाथ मुंडे विधानसभेतले विरोधी पक्ष नेते झाले... विधीमंडळात आणि विधीमंडळाबाहेर गोपीनाथ मुंडेंचा संघर्ष सुरुच होता...राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण गोपीनाथ मुंडेंनी ऐरणीवर आणलं... याच काळात गोपीनाथ मुंडे विरुद्ध शरद पवार असा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला... शरद पवारांसारख्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध गोपीनाथ मुंडेंनी रान उठवलं.. याच काळात गाजली ती गोपीनाथ मुंडेनी शिवनेरी ते शिवतिर्थ ही राज्यातील 300 तालुक्यांना भेट देणारी संघर्ष यात्रा... राज्यात सत्ताबदल होणार याची ग्वाही देणारी ही यात्रा होती... गोपीनाथ मुंडेंच्या अथक प्रयत्नांनी मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं स्वप्न आवाक्यात आलं होतं...

एका झंझावाताची अखेर

अखेर भगवा फडकला

गोपीनाथ मुंडे यांच्या आयुष्याला कलाटणी देणारं वर्ष म्हणजे 1995....
14 मार्च, 1995...मंत्रालयावर भगवा फडकवण्याचं स्वप्न साकारलं होतं...राज्यात शिवसेना भाजपचं सरकार मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारुढ झालं होतं..
गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते...

शरद पवार विरुद्ध गोपीनाथ मुंडे या सामन्यात गोपीनाथ मुंडे यांची सरशी झाली होती... गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्याविरुद्ध केलेल्या राज्यव्यापी प्रचाराला यश आलं होतं...288 जागांपैकी 148 जागा जिंकत शिवसेना भाजप युती सत्तेत आली होती.. दोन डझन अपक्ष आमदारही युतीसोबत आले होते..काँग्रेसची सत्ता संपली होती... राज्यात भगवे सरकार सत्तेवर आले होते...

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा करिष्मा, अटल बिहारी वाजपेयींच्या सर्वसमावेशक नेतृत्वाची मोहिनी, प्रमोद महाजन यांच्या तुफानी वक्तृत्वाची किमया आणि गोपीनाथ मुंडे यांचा झंझावात यामुळं हे यश मिळालं होतं....
गोपीनाथ मुंडेंसाठी हा स्वप्नपुर्तीचा क्षण होता.. गोपीनाथ मुंडेंचं नेतृत्व झळाळून निघालं होतं...
नाथ्रा गावातील एक गरीब कुटुंबातला तरुण संघर्ष करत मंत्रालयात सत्तेच्या स्थानावर पोहोचला होता...
गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री झाले होते...

युती सरकारच्या काळात उर्जा आणि गृह खात्याचा कारभार आणि उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी गोपीनाथ मुंडेंकडे होती...
शिवसेना-भाजपच्या युतीसरकारमध्ये सत्तेचं एक महत्वाचं केंद्र म्हणजे गोपीनाथ मुंडे होते....
भाजपसाठी नवी दिल्लीत प्रमोद महाजन आणि मुंबईत गोपीनाथ मुंडे यांच्या शब्दाला मान होता..मुंडे-महाजन यांचा तो सुवर्णकाळ होता..

कसा होता गोपीनाथ मुंडे यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ ?
गृहमंत्री म्हणून पोलिस दलाच्या आधुनिकीकरणावर मुंडेंनी भर दिला.. पोलिस दलाला आधुनिक शस्त्र मिळावी म्हणून त्यांनी निधीची तरतूद केली. पोलिस दलाचं मनोधैर्य वाढावं यासाठीही त्यांनी प्रयत्न केले...मुंबईत त्यावेळी गँगवारनं डोकं वर काढलं होतं.. खंडणी आणि धमक्यांचे फोन यांनी थैमान घातलं होतं.. मुंबईत्या रत्यांवर रक्त सांडलं जातं होतं...गोपीनाथ मुंडेंनी गृहमंत्री पोलिस दलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले... पोलिस एन्काऊंटर वाढले आणि गुन्हेगारी विश्वात पुन्हा पोलिसांचा दरारा निर्माण झाला....मुंबईतलं गँगवार मुंडेंनी मोडून काढलं....अर्थात पोलीस एन्काउंटरबद्दल टीकाही झाली...पण मुंडे ठाम होते...

उर्जा मंत्री म्हणून राज्य भारनियमनयुक्त होण्यासाठीही मुंडेंच्या काळात प्रयत्न झाले...गोपीनाथ मुंडे युती सरकारच्या काळात सत्तेचं केंद्र बनले होते.. त्यांच्या राज्यव्यापी नेतृत्वावर शिक्कामोर्तब झालं होतं... राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेला एक लोकनेता अशी त्यांची सार्थ प्रतिमा बनली होती...
सत्तेच्या केंद्रस्थानी असतांनाही गोपीनाथ मुंडेंनी आपल्यातला माणुस हरवू दिलेला नव्हता..सत्तेच्या वलयातही त्यांच्यातला कार्यकर्ता जागता होता..सतत कार्यकर्त्यांच्या गराडयात असलेला जनतेचा नेता हीच गोपीनाथ मुंडे यांची खरी ओळख होती... 1999च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातली सेना भाजप युतीची सत्ता गेली... पण गोपीनाथ मुंडे यांच्याभोवतीची गर्दी कायम होती...

एका झंझावाताची अखेर

गड आला पण सिंह गेला....
हाच तो क्षण ज्याच्यासाठी १४ वर्षांपेक्षा जास्त काळ गोपीनाथ मुंडे यांचा संघर्ष सुरु होता....
१९९९ पासून हुलकावणी देत असलेली सत्ता अखेर २०१४ मध्ये गोपीनाथ मुडेंनी खेचून आणली होती...
२६ मे २०१४ ला नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून गोपीनाथ मुंडेंनी शपथ घेतली...

गोपीनाथ मुंडे यांना पुन्हा मंत्रीपद म्हणजे त्यांच्या कुटुंबियांसाठी आनंदाचा क्षण होता... फक्त कुटुंबियचं नव्हे तर मुंडेंच्या चाहत्यांसाठीही हा आनंदाचा क्षण होता...
केंद्रात ग्रामीण विकास मंत्री म्हणून गोपीनाथ मुंडेंनी पदभार स्विकारला... आपल्याला मिळालेल्या खात्याबद्दल ते समाधानी होते..ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलून टाकायचा असा निश्चय गोपीनाथ मुंडेंनी केला होता.. पण अचानक मृत्यूनं घाला घातला आणि गोपीनाथ मुडेंचं स्वप्न अपुर्णच राहिलं...

१९९९ ते २०१४ हा काळ गोपीनाथ मुडेंसाठी कसोटीचा होता.... १९९९ मध्ये गोपीनाथ मुंडे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते...त्यानंतर सतत विरोधी पक्षात राहून गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला..१९९९ आणि २००४ मध्ये मुंडे आमदार म्हणून निवडून आले. पण या काळात युती सत्तेत नव्हती...विरोधी पक्षात राहून गोपीनाथ मुंडे संघर्ष करत होते.. राज्यातील जनेतेचे विविध प्रश्न विधीमंडळात मांडत होते...सतत कार्यकर्त्यांशी संवाद साधत होते.. राज्यभर फिरत होते.. या काळात त्यांनी सतत जनतेच्या प्रश्नावर विधीमंडळात आणि विधीमंडळाबाहेर रस्त्यावर येऊन आवाज उठवला.. मराठवाडयासह सगळ्या मागास भागाचा विकास व्हावा यासाठी प्रयत्न केले..

२००९ मध्ये गोपीनाथ मुंडे भाजपचे खासदार म्हणून दिल्लीत गेले... संसदेत खासदार म्हणूनही त्यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीनं ठसा उमटवला... भाजपचे लोकसभेतील उपनेते म्हणून त्यांनी आपली छाप पाडली.. महाराष्ट्राच्या प्रश्नांवर मुंडे यांनी नवी दिल्लीत आवाज उठवला..

२०१४ ची लोकसभा निवडणुक म्हणजे गोपीनाथ मुंडेंसाठी एक युद्ध होतं.. कुठल्याही स्थितीत केंद्रात भाजपची सत्ता आणायचीच यासाठी मुंडेंनी कंबर कसली होती... राज्यात महायुती आकाराला येण्यासाठी गोपीनाथ मुंडेंनी घेतलेला पुढाकार महत्वाचा होता. शिवसेना-भाजप या युतीला रामदास आठवले, महादेव जानकर, राजू शेट्टी असा एक एक साथीदार जोडत त्यांनी महायुतीचा आकार दिला....राज्याची सखोल सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जाण असलेला गोपीनाथ मुंडेंसारखा नेता होता म्हणूनच महायुती आकाराला आली.. महायुतीला राज्यात मिळालेल्या यशात नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच गोपीनाथ मुडेंच्या नेतृत्वाचाही मोठा सहभाग आहे...

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रचंड यशानंतर आता महायुतीला राज्य विधानसभेचे वेध लागले असतांनाच गोपीनाथ मुंडें निघून गेलेत... राज्यातही महायुतीचीच सत्ता येणार असं वातावरण असतांना साहजिकच मुख्यमंत्रीपदाचीही चर्चा सुरु होती.. गोपीनाथ मुंडे यांनी पक्ष देईन ती जबाबदारी स्विकारणार असं सांगितलं असलं तरी मुख्यमंत्रीपदासाठी एक सक्षम लोकनेता म्हणून गोपीनाथ मुंडेकडेचं पाहिलं जात होतं....

दीड दशकांपेक्षा जास्त काळ विरोधात संघर्ष केल्यानंतर आत्ता कुठे गोपीनाथ मुंडे केंद्रात मंत्री झाले होते... राज्यात मुख्यमंत्रीपदासाठी त्याचं नाव च्रर्चेत होतं, पण अचानक नियतीनं घात केला. आज गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा विविध समाज घटकांना एकत्र आणणारा नेताच महायुतीत नाही .गोपीनाथ मुंडे याचं जाणं महायुतीत पोकळी निर्माण करणारं आहे....

खूप वर्षानंतर मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामांन्याच्या जीवनात आनंद फुलवण्यासाठी करावा अशी गोपीनाथ मुंडेची इच्छा होती.. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडेंनी पावलंही टाकायला सुरवात केली होती....
पण नियतीच्या मनात काही वेगळचं होतं... उष:काल होता होता काळरात्र झाली आणि एका उमद्या नेत्याची करुण अखेर झाली...

समर्थ लोकनेता उत्कृष्ट वक्ता, राजकारणापलिकडे जात मैत्र जपणारा माणूस हरपला...
आयुष्यभरं मनं जपणारा हा लोकनेता जातांना मात्र चटका लावून गेला...

First Published: Tuesday, June 3, 2014, 18:47


comments powered by Disqus