Last Updated: Tuesday, June 3, 2014, 11:57
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई भाजपचे नेते आणि केंद्रीय ग्रामविकासमंत्री गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधन झाले आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी आठ वाजता अखेरचा श्वास घेतला. भीषण अपघातानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा बळी घेतला. भाजपसह महाराष्ट्राला मोठा हादरा बसला आहे. मुंडे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने दिल्लीतील हक्काचा आवाज आणि जनाधार असलेला नेता हरपला, अशा भावना व्यक्त होत आहे.
मुंडे यांना वाचविण्यासाठी डॉक्टरांच्या पथकाने शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. मुंडे यांच्या निधनाच्या वृत्तामुळे भाजपला मोठा धक्का बसलाय. मुंडे यांना हृद्यविकाराचा झटका आल्याचेही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. डॉक्टरांचे एक विशेष पथक मुंडे यांच्यावर उपचार करत होते. रुग्णालयात दाखल झाले त्यावेळी गोपीनाथ मुंडे बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांचे सकाळी 8 वाजता निधन झाल्याचे गडकरी यांनी सांगितले.
केंद्रीय मंत्रीपदावर विराजमान झालेल्या गोपीनाथ मुंडे यांचा मंगळवारी सकाळी बीड आणि परळी येथे सत्कार करण्यात येणार होता. या कार्यक्रमासाठी मुंडे दिल्लीहून महाराष्ट्रात यायला निघाले होते.
मुंडेचे पार्थिव आधी दिल्लीतील भाजप कार्यालयात नेण्यात येईल. तिथून दुपारी विमानाने लातूर येथे आणले जाईल. दुपारी मुंडे यांचे पार्थिव राज्यात आणले जाणार असून उद्या परळी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. लातूरहून बीड येथील मुंडे यांच्या मूळगावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील असे गडकरींनी सांगितले.
या अपघाताचे वृत्त समजतात राज्यातील भाजपचे नेते दिल्लीच्या दिशेने रवाना झाला असून मुंडे यांचे कुटुंबही दिल्लीच्या रवाना झाले आहेत.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Tuesday, June 3, 2014, 09:30