कशी साजरी कराल दिवाळी...
दिवाळीमध्ये सर्वजण एकमेकांनी सुख, शांती आणि समृद्धीच्या शुभेच्छा देतात. आपल्यालाही देवी लक्ष्मीला खूश करायचं असतं. त्यासाठी हरएक पद्धतीनं प्रयत्न केला जातो. चला तर बघुयात, या दिवाळीमध्ये देवी लक्ष्मीला खूश करण्यासाठी तुम्ही काय काय कराल आणि कोणत्या गोष्टी टाळता येतील... आणि आपल्या घरी आलेल्या सुख आणि समृद्धीला आपल्या पदरात पाडून घेता येईल.
काळ्या रंगाचे कपडे टाळा
दिवाळी प्रकाशाचा सण म्हणून ओळखला जातो. त्यामुळे काळा रंग तुमच्या आवडीचा असला तरी दिवाळीत मात्र तो परिधान करणं टाळाच. देवी लक्ष्मी प्रकाशानं खूश होते, असं समजलं जातं. तर मग तुमच्या वॉर्डरोबमध्ये जितके लाल, गुलाबी, पिवळा, हिरवा, सोनेरी यांसारख्या रंगांचे कपडे असतील त्यातला कोणता ड्रेस तुम्हाला दिवाळीमध्ये घालायला आवडेल त्याची तयारी अगोदरपासूनच करून ठेवा. म्हणजे वेळीच तुमची धांदल उडणार नाही.
मांसाहार वर्ज्य करा
दिवाळीचा महत्त्वाचा भाग म्हणजे आपल्या घरी लक्ष्मीची आणि गणेशाची पूजा केली जाते. घरादाराची भरभराट होण्यासाठी लक्ष्मीची पूजा केली जाते, तर कोणत्याही नवीन गोष्टीची सुरुवात गणेशाच्या पूजेनं होते. तर मग अशावेळेस शाकाहारी पदार्थ आणि दिवाळीचा फराळ उत्तम राहील. मांसाहाराचे तुम्ही भक्त असाल तरी सणांच्या दिवशी मात्र ते टाळणंच योग्य राहील.
घराची साफ-सफाई
घरात जाळं-जळमटं असतील तर ती फटाफट दूर करून टाका. तुम्हीच विचार करा, तुम्ही ज्या लक्ष्मी देवतेची पूजा करताय ती घाणेरड्या घरात का प्रवेश करेल. आपण लक्ष्मी म्हणून फराट्याच्या झाडणीची पूजा करतो, तेही एक साफसफाईचंच प्रतिक आहे की... मग, फटाफट तयार व्हा, आपल्या घराच्या स्वच्छतेसाठी आणि त्यात आपल्या घरातल्या प्रत्येक सभासदालाही सहभागी करून घ्या. हे क्षणही तुम्ही एकत्र खूप एन्जॉय कराल.
नेहमी आनंदी राहा
दिवाळी हा सणच मुळात प्रेमाची आणि शुभेच्छांच्या देवाण-घेवाणीचा. अशावेळी जरी काही ताण असतील तरी ते बाजूला ठेवणचं योग्य नाही का? घरी आलेल्या पाहुण्यांचं हसऱ्या चेहऱ्यानं स्वागत करा. कुटुंबीयांबरोबर घालवलेला प्रत्येक क्षण मजेत घालवा. त्यामुळे तुम्हाला जगण्याचीही एक सकारात्मक ऊर्जा तुमच्या आप्तेष्टांकडून मिळेल. तेव्हा चला तुम्ही कुणाकुणाला कशा मस्त आणि अनोख्या ढंगात शुभेच्छा देणार आहात त्याचा विचार करायला लागा बरं... डोक्याचा ताप बघा कसा पटकन दूर होऊन जाईल.
तुमची आणि तुमच्या आप्तेष्टांची काळजी घ्या...
दिवाळी म्हणजे धम्माल, मस्ती, मजा आणि फराळ... प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. पण, या सगळ्या गोष्टी करताना सुरक्षा बाळगणं मात्र विसरू नका. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांपासून तर आपण लांब राहणार आहोत असं आपण ठरवलंय ना! आपल्या आजूबाजूला असलेली चिल्ली-पिल्ली मुलं जर खूप हट्ट करत असतील तर त्यांचा हिरमोड करू नका पण त्याबरोबरच त्यांच्याबरोबर तुम्हीही सावध राहा आणि नियम जरूर पाळा
/marathi/slideshow/शुभ-दीपावली_163.html/7