पक्षप्रमुखांचा आदेश धुडकावल्याने मनोहर जोशी पायउतार..., manohar joshi slap uddhav thackeray

पक्षप्रमुखांचा आदेश धुडकावल्याने मनोहर जोशी पायउतार...

पक्षप्रमुखांचा आदेश धुडकावल्याने मनोहर जोशी पायउतार...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाबाबत प्रश्न उपस्थित करणा-या मनोहर जोशींना लेखी माफीनामा देण्याचा आदेश मनोहर जोशींनी धुडकावून लावला. मात्र, हा आदेश जोशी सरांनी धुडकावून लावल्यामुळेच त्यांच्यावर दसरा मेळाव्यात व्यासपीठावरून पायउतार होण्याची वेळ आली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

दसरा मेळाव्यात पायउतार व्हावं लागल्यानंतर जोशी सर नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या ओशियाना या निवासस्थानावरून त्यांच्या कोकणातल्या नांदवी गावी गेल्याचं समजत होतं. मात्र आता ते लोणावळ्यात असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, दसरा मेळाव्यातील अपमान नाट्यानंतर मनोहर जोशीं नॉट रिचेबल आहेत. जोशी पुढे काय करणार याची उत्सुकता लागली आहे.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात अपमानित होऊन घरी परतलेले शिवसेना नेते मनोहर जोशी कुठे गेलेत, याचा पत्ता सरांच्या कार्यकर्त्यांनाही नाही. सोमवारी सकाळी ते दादरच्या ओशियाना निवासस्थानातून पत्नीसह बाहेर निघाले. आपल्या गावी नांदवीला ते जात असल्याची माहिती जोशींच्या निकटवर्तियांनी दिली. परंतु ते गावी गेलेले नसल्याने ते नेमके कुठं आहेत, याचा पत्ता कार्यकर्त्यांनाही नव्हता. त्यामुळं मनोहर जोशी गेले कुणीकडे, अशी चर्चा रंगली होती.

मनोहर जोशी शिवसेना सोडणार का, शिवसेना सोडली तर ते कोणत्या पक्षात जातील आणि त्यांची पुढची राजकीय कारकिर्द कशी असेल, याबाबत नानाविध तर्कवितर्क लढवण्यात येत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर केलेली टीका मनोहर जोशींच्या चांगलीच अंगलट आली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसैनिकांनी हुर्यो उडवली तसेच जोशींना लाखोलीही वाहीली. त्यामुळे अपमानित होऊन जोशींना घरी परतावे लागले होते.



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Tuesday, October 15, 2013, 12:44


comments powered by Disqus