राज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”Why Raj Thakre and Udhhav thakre not comment on each other?

राज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”

राज आणि उद्धवची “अळीमिळी, गुपचिळी”
www.24taas.com , झी मीडिया, मुंबई

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात बहुधा अलिखित करार झालाय की काय अशी शंका येऊ लागलीय. एकमेकांना पाण्यात पाहणारे हे दोघे ठाकरे चुलत बंधू सध्या एकमेकांविरूद्ध टीका करणं टाळत असल्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातून विस्तवही जात नाही. त्यामुळं शिवसेना आणि मनसे या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येही तशीच ठसन असते. परळच्या बालेकिल्ल्यातील नरे पार्कच्या मैदानावरून सध्या सेना-मनसेचे कार्यकर्ते आमनेसामने उभे ठाकलेत. त्यामुळं दसऱ्याच्या मुहूर्तावर राज ठाकरे नरे पार्कच्या सभेत शिवसेनेला फटाके लावतील, अशी अपेक्षा होती. परंतु राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांचा पुरता अपेक्षाभंग केला. शिवसेनेविरूद्ध त्यांनी ‘ब्र’ देखील उच्चारला नाहीच. उलट पंगा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं.

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनीही अजित पवारांपासून ते अगदी राहुल गांधींपर्यंत सर्वांवर टीकेची झोड उठवली. परंतु राज ठाकरे यांच्याबाबत मात्र ते काहीच बोलले नाहीत. मनसेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना दसरा मेळाव्यात शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. पण त्या विषयावर भाष्य करणं उद्धव ठाकरेंनी टाळलं.

मनसेचे आमदार शिवसेनेत गेल्याची परतफेड म्हणून शिवसेनेतील दोघे उपनेते संजय घाडी आणि राजा चौगुले यांना पुन्हा मनसेमध्ये प्रवेश देऊन राज ठाकरे यांनी कुरघोडी केली. यावेळी घाडी आणि चौगुले यांनी शिवसेना नेतृत्वावर टीका केली. परंतु मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शिवसेनेवर तोफ डागण्याचा हा मुहूर्तही मिस केला.

राजकीय वातावरण तापलेलं असतानाही, ठाकरे बंधू एकमेकांविरूद्ध बोलणं का टाळत असावेत, असं कोडं सर्वांनाच पडलंय. आता ही वादळापूर्वीची शांतता आहे की भविष्यातील महायुतीची नांदी आहे, असा प्रश्नही अनेकांना पडलाय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Monday, October 14, 2013, 20:51


comments powered by Disqus