भर कॅबिनेटमध्ये उडविली गेली राज ठाकरेंची खिल्ली, cabinet giggle on raj thackeray movement

भर कॅबिनेटमध्ये उडविली गेली राज ठाकरेंची खिल्ली...

भर कॅबिनेटमध्ये उडविली गेली राज ठाकरेंची खिल्ली...
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राज ठाकरे यांच्या आंदोलनाला रस्त्यावर प्रतिसाद मिळाला नाहीच, दुसरीकडे आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही या आंदोलनाची दखल घेतली गेली नाही. उलटपक्षी मंत्रिमंडळ बैठकीत राज ठाकरे यांच्या आंदोलनाची खिल्ली उडवण्यात आली.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मिश्किलपणे राज्यात किती टोल नाके बंद झाले? असा सवाल गृहमंत्री आर. आर. पाटील यांना मंत्रिमंडळ बैठकीत विचारला. त्यावर टोल नाके बंदच झाले नाहीत, असं उत्तर देत राज ठाकरे यांचे रास्ता रोको आंदोलन फसल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितले. राज यांच्या यापूर्वीच्या आंदोलनाबाबत राज्याचे मंत्री गांभिर्याने चर्चा करायचे. मात्र, आजच्या आंदोलनाचा उडालेला फज्जा बघून मंत्रिमंडळानेही याची गांभीर्याने दखल घेतली नाही.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या टोलविरोधातल्या आंदोलनावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केलीय. राज ठाकरेंना आपण चर्चा करण्यासाठी वेळ दिला होता तरी आंदोलन करण्याची गरज काय? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केलाय तर काही राजकीय पक्ष जनेची दिशाभूल करत आहेत, असा टोला अजित पवारांनी मनसेला लगावलाय.

राज ठाकरे यांच्या आंदोलनाची शिवसेना आणि भाजपनंही खिल्ली उडवलीय. राज ठाकरे यांचं आंदोलन म्हणजे महाराष्ट्र सरकारचा `स्पॉन्सर्ड प्रोग्राम` असल्याची टीका भाजप प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी केलीय.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज यांच्या आंदोलनावर टीका केलीय. कायदा हातात धरणाऱ्यांना, जनतेला वेठीला धरणाऱ्यांचं समर्थन होऊ शकत नाही, असं मलिक म्हणालेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 12, 2014, 20:49


comments powered by Disqus