जितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`, jetendra avhad on raj thackeray after andolan failed

जितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`

जितेंद्र आव्हाडांनी काढली राज ठाकरेंची `अक्कल`

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

नक्कल करण्याची अक्कल नसल्यानं राज ठाकरेंच्या आजच्या टोलविरुद्धच्या आंदोलनाची फजिती झाली, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. ते पुण्यात बोलत होते.

नुकत्याच झालेल्या एका जाहीर सभेत राज ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची शाब्दिक नक्कल करून त्यांच्या गळ्याभोवती लपेटलेल्या मफलरची टींगल केली होती. यावरच निशाणा साधत आव्हाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीकेची संधी साधलीय.

`भुजबळ साहेबांची शाब्दिक नक्कल करण्यापेक्षा त्यांच्या आंदोलनाची नक्कल केली असती तर तर सामान्य जनतेनं राज ठाकरेंना डोक्यावर घेतलं असतं... पण नक्कल कशी करावी याची राज ठाकरेंना अक्कल नसल्यानं त्यांच्या आजच्या टोल आंदोलनाचा फज्जा उडाला` असं आव्हाड यांनी यावेळी म्हटलंय.

`ठाकरे कुटुंबीयांचा गेल्या ५० वर्षांचा इतिहास पाहता, राज ठाकरेंनी स्वत: रस्यावर उतरण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे मनसे कार्यकर्त्यांत उत्साह दिसून येत होता. परंतु तुरुंगाची भीती समोर दिसताच राज ठाकरेंनी दुपारीच घरचा रस्ता धरला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांच्या पदरी मात्र निराशाच पडली` असं म्हणतानाच `राज ठाकरे अखेरपर्यंत रस्त्यावर न उतरल्यानं ठाकरे घराण्याचा घरातून राजकारण करण्याचा इतिहास कायम राहिलाय` अशी टिपण्णीही त्यांनी केलीय.

`आजच्या टोल आंदोलनामुळे केवळ नक्कला करणे किती सोपे असते पण प्रत्यक्षात आंदोलन करणं किती कठिण असतं हे राज ठाकरेंना आता कळून चुकलं असावं` असा टोमणा त्यांनी राज ठाकरेंना हाणलाय.

`भुजबळ साहेबांनी बेळगाव सिमाप्रश्नाप्रकरणी आपल्या सहकाऱ्यांसोबत बेळगावमध्ये धडक दिली होती. भुजबळांच्या या आंदोलनाची राज ठाकरेंनी नक्कल केली असती तर बरं झालं असतं` असंही म्हणत आव्हाड यांनी राज ठाकरेंवर वार करण्याची संधी घेतलीय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, February 12, 2014, 22:57


comments powered by Disqus