Last Updated: Monday, August 26, 2013, 17:43
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमहालक्ष्मीच्या शक्ती मिलमध्ये फोटोजर्नलिस्ट तरूणीवर बलात्कार करणारे सर्व आरोपी सज्ञान म्हणजे 18 वर्षांवरील असल्याचे मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी स्पष्ट केलंय. आज पत्रकार परिषदेत मुंबईचे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी मुंबईच्या जनतेचे आभार मानले आहेत. मुंबईच्या जनतेने विश्वास दाखवल्यामुळेच इतक्या तातडीने तपास करता आला, असं डॉ. सिंग म्हणाले.
3 दिवसांत पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, सर्व आरोपी मुंबईतच वाढलेले आहेत. त्यापैकी दोघांविरूद्ध यापूर्वी गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली. बलात्काराच्या वेळी आरोपींनी वापरलेला मोबाईल फोन जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये एक फोटो सापडला आहे. बाकीच्या फोटोंचा शोध घेणे सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. या बलात्कार प्रकरणातील सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, यादृष्टीनं पुरावे गोळा करण्यासाठी पोलिसांच्या 20 टीम कार्यरत होत्या, असे ते म्हणाले.
मुंबईत जवळपास 272 निर्जन ठिकाणे असून, त्याठिकाणी मालकांनी योग्य देखरेख ठेवली नाही असं पोलीस आयुक्तांनी म्हटलं आहे. तसंच संबंधितांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. आरोपींवरील गुन्हे सिद्ध झाल्यास त्यांना कठोरातील कठोर शासन होईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
*
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.*
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
First Published: Monday, August 26, 2013, 17:43