Last Updated: Monday, February 18, 2013, 18:56
www.24taas.com, सोलापूरमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांची नक्कल करत त्यांची टिंगल केली होती. राज ठाकरेंच्या सभांना गर्दीही चांगलीच जमली होती. मात्र गर्दीचं रुपांतर कधी मतांमध्ये होत नसतं अशी टीका आता त्यावर अजित पवारांनी केली आहे.
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात कोल्हापूर येथे सभेत राज ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. आपल्याला शेतीतील अक्कल शिकवू नये, असंही राज ठाकरे अजित पवारांना म्हणत होते. त्यांच्या नकलेवरून जेव्हा अजित पवारांनी टीका केली तेव्हा, आपल्या दुसऱ्या सभेत नक्कल करायलाही अक्कल लागते, असं प्रत्युत्तर राज ठाकरेंनी दिलं होतं. यावर रविवारी सोलापूर येथे सभेत बोलताना अजित पवारांनी राज ठाकरेंचा दौरा भंपक असल्याची टीका केली.
सभेला गर्दी झाली, तरी त्याचं रुपांतर मतांमध्ये कधीच होत नसतं, असंअजित पवार म्हणाले. बाळासाहेब ठाकरेंच्या सभांनाही प्रचंड गर्दी असायची. पण त्यांना कधी सत्ता मिळाली नाही. १९९५ साली त्यांना मिळालेली सत्ता हा एक अपघात होता. त्यासाठी त्यांना बंडखोरांचाच पाठिंबा घ्यावा लागला होता. असं अजित पवारांनी म्हटलं. आपल्या भाषणातून अजितदादांनी शिवसेना आणि मनसे दोन्ही पक्षांना टोला हाणला.
First Published: Monday, February 18, 2013, 16:05