Last Updated: Tuesday, February 12, 2013, 13:02
www.24taas.com, कपील राऊत, ठाणेठाणे महापालिकेच्या सत्ता संघर्षाला एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुन्हा राजकीय भूमिकांमध्ये बदलाचे वारे वाहू लागलेत. मनसेनं राजकीय व्युहरचनेच्या नावाखाली दबावाचं राजकारण सुरु केलंय. तर दुसरीकडे वेगळया गटाची मान्यता मिळण्यासाठी न्यायालयात गेलेल्या काँग्रेसने याचिका मागे घेण्याचा निर्णय घेऊन लोकशाही आघाडी मजबूत करण्याचा निर्णय घेतलाय `हम भी किसीसे कम नही !’ हे दाखवून दिले आहे.
ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीला एक वर्ष पूर्ण होत आले तरी अजूनही महापालिकेच्या परिवहन, शिक्षण मंडळ, वृक्ष प्राधिकरण अशा अनेक समित्यांमधील पदे रिक्त आहेत. ही पदे आपल्या पदरामध्ये पाडून घेण्यासाठी राजकीय हालचालींना वेग आलाय. काँग्रेसने वेगळ्या गटाच्या मान्यतेसाठी सर्वोच्च न्यायालयातील याचिका मागे घेतलीये. याप्रकरणी खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी पुढाकार घेतला होता.
दुसरीकडे मनसेनं नगरसेवकांचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली नसल्याचं म्हटलं आहे. सध्यातरी आपण लोकशाही आघाडीसोबतच असल्याचं पक्षाचे गटनेते सुधाकर चव्हाण यांनी स्पष्ट केलं. मात्र राजकारणात काहीही होऊ शकत असे सांगून मनसेनं संभ्रम कायम ठेवला आहे.
एक वर्षानंतर पुन्हा राजकीय भूमिकांमध्ये झालेल्या बदलांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघालंय. महायुतीला फटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा वेगळा गट ही महायुतीचा शेवटची आशा होती. मात्र काँग्रेसनं याचिका मागे घेतल्यामुळे महायुती गोत्यात आली आहे.
First Published: Tuesday, February 12, 2013, 12:02